कॅनबरा : ऑस्ट्रेलियाची राजधानी. लोकसंख्या १,३०,२५० (१९७०). ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरी ह्या संघीय जिल्ह्यामध्ये, देशाच्या आग्‍नेय भागात, मोलाँग्लो नदीवर, ही सिडनीच्या नैर्ऋत्येस ३०४ किमी., मेलबर्नच्या ईशान्येस ६६९ किमी. आणि ‍‌‍ॲडिलेडच्या पूर्वेस १,२१६ किमी. उभारलेले आहे. कॅनबरासभोवताली पिरॅमिडसदृश डोंगर आहेत. वॉल्टर ग्रिफिन ह्या अमेरिकन वास्तुशिल्पज्ञाच्या योजनेनुसार कॅनबराच्या उभारणीस १९१३ साली सुरुवात झाली आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच शहराचा खरा विकास झाला. कॅनबराची रचना दोन एककेंद्रीय वर्तुळांवर केली असून, एका वर्तुळात शासकीय कार्यालये व इमारती आणि दुसऱ्या वर्तुळात व्यापारउदिमांच्या इमारती ह्यांचा अंतर्भाव करून लहानलहान वर्तुळे मोठ्या वर्तुळांशी सांधलेली आहेत. कॅनबराचे हवामान कोरडे, उपोष्णकटिबंधीय प्रदेशाप्रमाणे असून उन्हाळे उबदार असतात. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६१ सेंमी. असून एप्रिलमध्ये कमाल पाऊस पडतो. रेल्वे, राजमार्ग व हवाई मार्गांनी कॅनबरा ॲडिलेड, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी ह्या ऑस्ट्रेलियातील महत्त्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. कॅनबरा सांस्कृतिक व शास्त्रीय केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. १९२३ मध्ये कॅनबराजवळ मौंट स्ट्रॉमलो वेधशाळा स्थापण्यात आली. १९५५ मध्ये दक्षिण गोलार्धातील अवकाशाचा अभ्यास करणारी प्रमुख वेधशाळा म्हणून तिचा नावलौकिक झाला. याशिवाय येथे विद्यापीठ, ग्रंथालय, विज्ञानसंस्था, संग्रहालये, नाट्यगृहे, ऑपेरा हाऊस अशा विविध संस्था आहेत. शहरातील प्रचंड इमारतींमधील युद्धस्मारके अतिभव्य आहेत. ऑस्ट्रेलियन युद्धस्मारकांतील काचेचे मोझेइक व ऑस्ट्रेलियन-अमेरिकन स्मारकांमधील ७८⋅६ मी. उंचीचा ॲल्युमिनियमचा एक अष्टकोनी बाण व त्यावरील गरुड वैशिष्ट्यपूर्ण आहे. याशिवाय संसदभवन व सेंट जॉन द बॅप्टिस्टचे चर्च (१८४१) ही प्रेक्षणीय आहेत. कॅनबरातच सैनिकी महाविद्यालय, हवाई दल व नाविक संदेशवहनाची केंद्रे आहेत. शहराच्या मध्यभागी अनेक बागा असल्याने कॅनबरास बागबगीच्यांचे शहर म्हणतात.

संसद इमारत, कॅनबरा

गद्रे, वि. रा.