कॅनन, वॉल्टर ब्रॅडफर्ड : (१९ ऑक्टोबर १८७१—१ ऑक्टोबर १९४५). प्रसिद्ध अमेरिकन शरीरक्रियावैज्ञानिक. त्यांचा जन्म विस्कॉन्सिन राज्यातील प्रेअरी ड शीन येथे झाला. १९०० मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठाची वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर ते तेथेच १९०६—४२ या काळात शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक होते. क्ष-किरणांचा पहिल्यांदाच उपयोग करून कॅनन यांनी पचन तंत्राच्या कार्याबद्दल बरीच माहिती उपलब्ध करून दिली. रक्तस्त्रावामुळे वा अभिघातामुळे (आकस्मिक इजेमुळे) होणारा अवसाद (शॉक), शरीरसंरक्षक असे अनुकंपी तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था), शरीरातील द्रव, तापमान, रासायनिक प्रक्रिया इत्यादींतील संतुलन (समतोल) अथवा समस्थिती (होमिओस्टॅसिस) या विषयांवरील त्यांचे संशोधन प्रसिद्ध आहे. तसेच वेदना, भूक, भीती, क्रोध यांमुळे घडून येणाऱ्या शारीरिक बदलांविषयीही त्यांनी संशोधन केले.

मनोभावांसंबंधी शरीरक्रियावैज्ञानिक उपपत्ती मांडून कॅनन यांनी जेम्स, लॅंग आणि वॉटसन या शास्त्रज्ञांचे मनोभावांसंबंधीचे मत खोडून काढले. कॅनन यांच्या उपपत्तीप्रमाणे आणीबाणीच्या परिस्थितीत शरीरातील संरक्षक ग्रंथींचा स्त्राव वाढणे, पचनक्रिया स्थगित होणे इ. प्रकार शरीरातील अनुकंपी तंत्रिका तंत्राद्वारे घडून येतात. मस्तिष्काच्या (मेंदूच्या) तळाशी असलेल्या अभिवाही केंद्राखालील तंत्रिका केंद्राच्या  कार्यामुळे (हायपोथॅलामसच्या उद्दीपनामुळे) स्वायत्त तंत्रिका तंत्र उद्दीपित होते [→तंत्रिका तंत्र]. जेम्स आणि लॅंग या शास्त्रज्ञांच्या मते मनोभावाचा अनुभव हा केंद्रीय तंत्रिका तंत्राच्या भोवतालच्या (पेरिफेरल) तंत्रिका तंत्राशी व तज्‍जन्य वेदने यांच्याशी संबंधित असतो तर कॅनन यांच्या मते तो केंद्रिय तंत्रिका तंत्राशी संबंधित असतो म्हणजे हायपोथॅलामसद्वारा उच्च मस्तिष्ककेंद्राकडे संदेश जाऊन मनोभावनांची व भावनांची जाणीव होते. याचा अर्थ मनोभावाची  जाणीव व प्रतिक्रिया एकाच वेळी होतात तर जेम्स आदींच्या मते ती जाणीव आंतरिंद्रियांच्या (औदरिक अथवा आंतरिक अवयवांच्या) उद्दीपनामुळे होते [→ मनोभाव]. कॅनन यांचे महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : द मेकॅनिकल फॅक्टर्स ऑफ डायजेशन (१९११) ऑटोनॉमिक न्यूरो इफेक्टर सिस्टिम्स (१९३७) द सुपर सेन्सिटिव्हिटी ऑफ डिनर्व्हेटेड स्ट्रक्चर्स (१९४९) बॉडिली चेंजेस इन पेन, हंगर, फीअर अँड रेज (दु. आ. १९२९) द विझडम ऑफ द बॉडी (१९३२). यांशिवाय शरीरक्रियाविज्ञानासंबंधीचे त्यांचे सु. २०० निबंध विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. ते फ्रॅंक्लिन येथे निधन पावले.

ढमढेरे, वा.रा. केळशीकर, शं. हि.