काष्ठशिल्प : लाकडी कलाकृती. शिल्पकलेच्या दगड व धातू या दोन माध्यमांप्रमाणेच लाकूड किंवा काष्ठ हेही एक महत्त्वाचे माध्यमआहे. हस्तव्यवसाय व इतर उपयुक्त कला इत्यादींत जसा लाकूडकामाचा अंतर्भाव होतो, त्याचप्रमाणे उच्च प्रकारची शिल्पकला म्हणूनही काष्ठशिल्प गणले जाते. प्रस्तुत नोंदीत या दृष्टीनेच काष्ठशिल्पाचे स्वरुप दिग्दर्शित केले आहे.
काष्ठशिल्पे अनेक जातींच्या लाकडांमध्ये करतात. काष्ठशिल्पांसाठी भारतात मॅहॉगनी, साग, एबनी, पेरू, शिसवी वगैरे जातींचे लाकूड वापरात आहे. यूरोपमध्ये सीडार, ओक, बाल्सावुड, बॉक्सवुड इत्यादींचे लाकूड वापरले जाते. काष्ठशिल्पे सर्वसाधारणपणे दोन पद्धतींनी करतात. मातीचे किंवा प्लॅस्टरचे आकृतिनिर्देशक असे लहान नमुने तयार करणे आणि त्याप्रमाणे लाकडांमध्ये कोरणे, ही एक पद्धत. अशा शिल्पांत लाकडामधील अंगभूत तंतुरेषा कोठेही येऊ शकतात. कलावंताच्या पूर्वनियोजित कल्पनेनुसार आकृती कोरली जात असल्याने त्यांत मूळ लाकडाच्या पाेताचा वा गुणवत्तेचा विचार केलेला असतो. दुसऱ्या पद्धतीत लाकडाचा ओंडका बारकाईने निरखून त्यातील रेषा व गाठी यांचा अभ्यास करून शिल्पकार त्यात मानवाकृतींचे, प्राण्याचे किंवा अप्रतिरुप आकार उत्स्फूर्तपणे कोरतो. पुष्कळ वेळा लाकडाच्या सालीचाही उपयोग केला जातो. लाकूड जर मध्येच सडलेले किंवा खराब निघाले अथवा दुसरी एखादी अधिक मनोवेधक कल्पना त्या लाकडामध्ये दिसू लागली, तर कलाकार आपली मूळची कल्पना बदलून नवीन घनाकार शोधू लागतो. अशा पद्धतीत तंतुरेषा व गाठी यांच्या आकृतीशी एकजीव साधला जातो.
लाकडाची अंगभूत प्रकृती व कलावंताची कल्पनाशक्ती यांमध्ये असा जिव्हाळ्याचा कल्पनासंवाद साधला जातो. काही शिल्पे अनेक प्रकारचे काष्ठखंड एकत्र साधून तयार केली जातात, तर काही एकाच प्रकारच्या लाकडाचे लहान मोठे आकार एकत्र सांधून केली जातात. काही पुरातन काष्ठशिल्पांमध्ये हस्तिदंत, कवड्या, शिंपले इ. वस्तू लाकडामध्ये कोरून बसविण्यात येतात, तर हल्ली लाकूड व संगमरवरी दगड यांचा मिलाफही करण्यात येतो. काही काष्ठशिल्पांत दोऱ्या किंवा निरनिराळ्या धातूंचे पत्रेही वापरतात. मातीकामामध्ये करावयाच्या आकृतीचा आकार हळूहळू वाढविला जातो. उलट काष्ठशिल्पामध्ये आकृतीचा आकार हळूहळू कोरला जातो. दगडाचे शिल्पकाम करण्याची पद्धती आणि काष्ठशिल्पनाची पद्धत एकच आहे.
काष्ठशिल्पांचा पृष्ठभाग तैलरंगाने मढवितात किंवा तो पॉलिश, लाखरोगण वा मेण यांनी गुळगुळीत करतात. काही शिल्पांचे पोत हेतुपुरस्सर खडबडीत ठेवण्यात येते. काष्ठशिल्पांचा पृष्ठभाग गुळगुळीत,चकचकीत किंवा खडबडीत ठेवणे अथवा त्यास रंग लावणे हे प्रत्येक कलाकाराच्या कल्पनेनुसार ठरते.
काष्ठशिल्पे गुणदृष्टया दोन विभागांत मोडतात : (१) उत्थित काष्ठशिल्पे : यात आकृती एका पायाभूत पृष्ठावरून उठून येणारी म्हणजे उठावाची असते.
(२) त्रिमितीय काष्ठशिल्पे : ही काष्ठशिल्पे सर्व बाजूंनी पहावयाची असतात. त्यांत लाकडाच्या पृष्ठभागाच्या आत आकार कोरले जातात. ह्या पद्धतीस अंतर्तक्षण पद्धत म्हणतात.
काष्ठशिल्पांचा इ.स.पू.सु.२३०० च्या सुमाराचा नमुना कैरो येथील वस्तु संग्रहालयात आहे. ह्या काष्ठशिल्पांला `शेख एल बेलेड’ असे म्हणतात. ह्या पुतळ्याचे डोके, पाय आणि शरीराचा इतर भाग एका मोठ्या लाकडापासून तयार केला असून हात मात्र वेगळ्या लाकडापासून तयार करुन जोडले आहेत. सर्व आकृतीस चुनेगच्चीचा मुलामा देऊन त्यावर रंगकाम केले आहे. प्राचीन निसर्गवादी शैलीचा हा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जातो. विसाव्या शतकातील जगप्रसिद्ध शिल्पकार हेन्ऱी मूर (१८९८ -) आणि बार्बरा हेप्वर्थ (१९०३ -) इत्यादींची काष्ठशिल्पे विख्यात आहेत. भारतामध्ये ना.ग.पाणसरे, शंको चौधरी, श्रीमती पोचखानवाला यांची काष्ठशिल्पे उत्कृष्ट समजली जातात.
पहा : लाकडी कलाकाम.
संदर्भ : 1.Appaswamy, Jaya, An Introduction to Modern Indian Sculpture, New Delhi.
2.Norman, Edward, Sculpture in Wood, 1962.
3.Oughton, Fredric, The History and Practice of Wood Carving, London, 1969.
4.Rich, Jack C.The Materials and Methods of Sculpture, New York, 1949.
खानविलकर, निळकंठ
“