कर्णिकार : ( कनकचाफा हिं. कनकचंपा , कथचंपा गु. कनकचंपो क. कनकचंपक लॅ.टेरोस्पर्मम ऍसरिफोलियम कुल-स्टर्क्युलिएसी). सु. १२–१५ मी. उंची व ०⋅९–१⋅२ मी. घेर असलेल्या या सुंदर सदापर्णी वृक्षाचा प्रसार हिमालयापासून ते दक्षिणेस कारवार व कोकण येथील सदापर्णी जंगलांत सर्वत्र असून शिवाय ब्रह्मदेशात व अंदमान बेटांतही आहे. मोठ्या उद्यानांतून व रस्त्यांच्या दुतर्फा शोभेकरिता हा लावलेला आढळतो.साल पातळ , करडी व गुळगुळीत. सर्व कोवळ्या भागांवर तांबूस लव. पाने साधी , एकाआड एक , अखंड किंवा अल्पखंडित , मोठी , विविध आकृतींची व तळाशी हृदयाकृती किंवा छत्राकृती असतात. निबर पाने वरून गुळगुळीत , खालून करडी , लवदार , चिवट सिराविन्यास (शिरांची मांडणी) हस्ताकृती उपपर्णे खंडित व लवकर गळणारी असतात. फुले मोठी , सुगंधी , पांढरी , सच्छदक ( फुले व फुलोरा ज्यांच्या बगलेत येतो अशी पाने असलेली) , कक्षास्थ (बगलेत) , एक ते तीन एकत्र असून उन्हाळ्यात येतात. संदले पाच , लांबट , जाड , चिवट , बाहेरून पिंगट , लवदार व आत फिकट प्रदले (पाकळ्या) पाच , पांढरी व लांबट वंध्य केसरदले पाच जननक्षम केसरदले १५ किंजपुट पंचकोनी व पाच कप्प्यांचा [→ फूल] बीजके प्रत्येक कप्प्यात १२–२० बोंडे लांबट , पंचकोनी व कठीण असून थंडीत येतात. बिया सपक्ष व अनेक.
याचे लाकूड मधे लाल व बाहेर पांढरे , मध्यम कठीण व जड सुतारकामास चांगले व झिलईही चांगली होते. आगकाड्या , आगपेट्या , सजावटी सामान , फण्या , चहाची खोकी इत्यादींस उपयुक्त असते. तंबाखू बांधण्यास आणि बशीप्रमाणे वापरण्यास पाने उपयुक्त असतात. फुले जंतुनाशक , पौष्टिक व कीटकरोधक असतात. पानावरची लव रक्तस्रावरोधक असते .
पहा : स्टर्क्युलिएसी.
जमदाडे , ज. वि.
“