काल्देरॉन दे ला बार्का, पेद्रो : (१७ जानेवारी १६०० — २५ मे १६८१). स्पॅनिश नाटककार. जन्म माद्रिद येथे. माद्रिद आणि आल्काला येथील जेझुइट शिक्षणसंस्थांतून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर तो सालामांका विद्यापीठातून पदवीधर झाला. त्याने धर्मोपदेशक व्हावे, अशी त्याच्या मातापित्यांची इच्छा होती. तथापि नाट्यलेखन हेच त्याने आपले कार्यक्षेत्र ठरविले. नाटककार म्हणून त्याला स्पेनचा तत्कालीन राजा चौथा फिलिप याच्याकडून आश्रयही मिळाला. राजदरबारासाठी त्याने अनेक नाटके लिहिली. त्याशिवाय दर वर्षी वसंत ऋतूत होणाऱ्या ‘कॉर्पस क्रिस्ती’ ह्या धर्मोत्सवासाठी तो दोन नाटके लिहित असे. सार्वजनिक रंगभूमीसाठीही त्याने काही नाटके लिहिली. त्याची सु.१२० नाटके आहेत. १६३६ मध्ये राजाने त्याला सरदारपद बहाल केले. १६४० मध्ये कॅटलोनिया आणि पोर्तुगाल ह्या देशांनी स्पेनच्या सत्तेविरुद्ध बंड उभारले, तेव्हा तो सैन्यात शिरला. तेथे सु.दीड वर्ष राहिल्यानंतर प्रकृती बिघडल्यामुळे तो निवृत्त झाला. १६४५ मध्ये तो `डयूक ऑफ आल्बा’ च्या आश्रयास गेला. १६५० मध्ये वैचारिक परिवर्तन होऊन त्याने धर्मोपदेशक होण्याचा निर्णय घेतला व त्यानंतर त्याने सार्वजनिक रंगभूमीसाठी नाटके लिहिणे सोडून दिले. मात्र दरबारासाठी आणि `कॉर्पस क्रिस्ती’ साठी तो नाटके लिहीत राहिला. माद्रिद येथेच तो निधन पावला.
त्याच्या काही उल्लेखनीय नाटयकृती अशा : El astrologo fingido (सु.१६२४, इं.शी.द मॉक अस्ट्रॅालॉजर), El principe constante (१६२९ , इं.शी. द कॉन्स्टंट प्रिन्स), La dama duende (१६२९ , इं,शी,द फेअरी लेडी), Peor esta que estaba (१६३० , इं.शी.इट इज वर्स दॅन इट वॉज), Mejar esta que estaba (१६३१ इं.शी.इट इज बेटर दॅन इट वॉज), La devocion de la cruz (सु.१६३३, इं.शी.द डिव्होशन ऑफ द क्रॉस), El medico de su honra (१६३५ , इं.शी.द फिजिशिअन ऑफ हिज ओन ऑनर), El mayor encanto amor (१६३५ , इं.शी.नो मॅजिक लाइक लव्ह), La vida es sueno (१६३५ , इं.शी.लाईफ इज अ ड्रीम), El magico prodigioso (१६३७ , इं.शी.द माय्टी मॅजिशिअन), El alcalde de Zalamea (सु.१६४२, इं.शी.द मेयर ऑफ झालामिआ), El gran teatro del mundo (सु.१६४५, इं.शी.द ग्रेट भिएटर ऑफ द वर्ल्ड).
स्पॅनिश साहित्याच्या सुवर्णयुगातील (१५९८—१७००) काल्देरॉन हा अखेरचा नाटककार होय. ⇨लोपे दे व्हेगा ह्या त्याच्या समर्थ पूर्वसूरीने प्रयोगशील दृष्टिकोन ठेवून स्पॅनिश रंगभूमीचा आणि नाट्यलेखनाचा विकास घडवून आणलेला होताच. उत्कृष्ट भावकाव्याची आणि तत्त्वचिंतनाची त्याला जोड देऊन काल्देरॉनने त्यात भर घातली. लोपे दे व्हेगाने आकारास आणलेल्या खास स्पॅनिश सुखात्मिकांचा प्रकार त्याने समृद्ध केला तसेच उत्कृष्ट `auto sacramentales’ किंवा एकांकी आणि रूपकात्मक धार्मिक नाटके लिहिली. ह्या नाटकांचा इतिहास मध्ययुगापासूनचा आहे तथापि काल्देरॉनने त्यांचा कलात्मक उत्कर्ष साधला. त्याशिवाय काही शोकात्मिका, संगीतिका आणि `क्लोक ऍंड सोर्ड’ पद्धतीची सुखात्म नाटके लिहिली. त्यांतील प्रणयी युगुले, त्यांच्या मार्गातील अडचणी, त्या निवारण्यासाठी तलवारींची द्वंद्वयुध्दे इत्यादींमुळे हा प्रकार ⇨रोमान्सला विशेष जवळचा आहे.
लेपे दे व्हेगाची अनेक कथानके काल्देरॉनने आपल्या नाट्यकृतींसाठी वापरली परंतु त्यांतील प्रत्येकाला त्याने नवे कलात्मक रूप दिले. वास्तवाशी जवळचे नाते जोडणाऱ्या लोपे दे व्हेगाच्या नाट्यकृतींपेक्षा काल्देरॉनच्या नाट्यकृतींचे स्वरूप वेगळे वाटते. अतिशय अलंकृत भाषा, नृत्य-संगीतावरील भर, वास्तवापासून दूर जाऊन अतिनाट्याच्या पातळीवर येण्याची प्रवृत्ती यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे त्याचे नाट्यलेखन `बरोक’ शैलीच्याच जवळपास येऊन ठेपते. त्याची बरीचशी नाटके राजाश्रयाने लिहिली गेली असल्यामुळे दरबारी अभिरुचीचा त्यांवर परिणाम होणे अपरिहार्य होते. ख्रिस्ती तत्त्वज्ञानाचा पगडा हे त्याच्या नाटकांचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. त्याच्या लौकिक विषयांवरील नाटकांपेक्षा धार्मिक विषयांवर आधारलेल्या नाटकांची संख्याच अधिक आहे. अत्यंत गुंतागुंतीची कथानके बांधेसूदपणे उभी करण्याचे रचनाकौशल्य त्याच्या ठायी होते. त्याच्या मृत्यूनंतरही सु.दोनशे वर्षे स्पॅनिश रंगभूमीवर त्याची नाटके लोकप्रिय होती. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस वास्तववादी समीक्षकांनी त्याच्या नाट्यलेखनावर प्रतिकूल टीका केलेली असली, तरी स्पॅनिश रंगभूमीच्या इतिहासातील त्याचे स्थान अनन्यसाधारण आहे.
संदर्भ : 1.Adams, N.B. Kellar, John E. A Brief Survey of Spanish Literature, Paterson (New Dersey), 1962.
2.Brenan, Gerald, The Literature of the Spanish People, Cambridge, 1962.
कुलकर्णी, अ.र.