कार्लझूए : पश्चिम जर्मनी राष्ट्राच्या बाडेन-वर्टेंबर्ग प्रांतातील औद्योगिक शहर. लोकसंख्या २,५९,०९१ (१९७० अंदाज). हे हायड्लबर्गच्या नैर्ऋत्येस ५३ किमी. ऱ्हाईन नदीजवळ आहे. यूरोपमधील दक्षिणोत्तर रेलमार्ग व पॅरिस-म्यूनिक-व्हिएन्नाकडे जाणाऱ्या ओरिएंटल एक्सप्रेसचा मार्ग हे येथे मिळतात. शहरातील मध्यवर्ती जुन्या किल्ल्यापासून सर्व बाजूंस रेखीव रस्ते गेले आहेत. शहराचा मोठा भाग उद्याने व हिरवळींकरता राखून ठेवलेला आहे. येथे रेल्वे कर्मशाळा असून यंत्रे, गॅस व विजेच्या शेगड्या, वाफेची एंजिने, सायकली, शिवणयंत्रे, यंत्रहत्यारे, साबण, सुवासिक पदार्थ, अन्नप्रक्रिया, दारू गाळणे, कागद छपाई इत्यादींचे कारखाने आहेत. हे अंतर्गत बंदर असून १⋅५ किमी. लांबीच्या कालव्याने ऱ्हाईनला जोडलेले आहे. येथे विमानतळ आहे. येथे जर्मनीतील सर्वात जुनी तंत्रसंस्था होती, तेथे हर्ट्झने रेडिओलहरींचा शोध लावला. दुसऱ्या महायुध्दात याची फार हानी झाली.
शहाणे, मो. शा.