कालगणना, ऐतिहासिक : कालाचे मापन करण्याच्या पद्धतीस कालगणना म्हणतात. हे एक शास्त्र असून इंग्रजीतील क्रॉनॉलॉजी व इरा या दोन शब्दांसाठी कालगणना ही संज्ञा मराठीत रूढ झालेली आहे. कालगणनेचा मूळ हेतू मुख्यतः घडत असलेल्या व घडलेल्या घटनांचा कालानुक्रम सांगणे असा असतो. ऐतिहासिक कालगणनेत गतकालीन घटनांचा कालानुक्रम निश्चित करण्याचा प्रयत्न असतो. अर्थात ही कालगणना करण्याची पद्धत भिन्न प्रदेशांत भिन्न प्रकारची असल्याचे आढळते. विविध काळांतील निरनिराळ्या कालगणनांची, सध्या आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालेल्या, ख्रिस्ती कालगणनेशी सांगड घालून त्यांचा योग्य अर्थ लावणे, ही एक महत्त्वाची व अवघड समस्या आहे. किरणोत्सर्गी कार्बन -१४, पालाश, रासायनिक द्रव्ये इत्यांदीच्या साहाय्याने कालगणनेची समस्या सोडविण्यास मदत होत आहे.
ऐतिहासिक कालगणनांव्यतिरिक्त भूविज्ञानात पृथ्वीचे वय, खडकांचे वय वगैरे भूमीच्या उत्क्रांतीचे मोजमाप करण्याची एक विशिष्ट पद्धत वापरण्यात येते तिला भूकालमापन म्हणतात. ह्याशिवाय विश्वस्थितीशास्त्र, पुराजीवविज्ञान,पुरात्त्वविद्या यांसारख्या शास्त्रांच्याही कालगणनांच्या विशिष्ट पद्धती प्रचारात आहेत.
जगातील खालील ऐतिहासिक कालगणनांचा या लेखात अंतर्भाव आहे :(१) चिनी कालगणना, (२) ईजिप्तमधील कालगणना, (३) बॅबिलोनिया व ॲसिरिया या संस्कृतींमधील कालगणना, (४) ज्यू कालगणना, (५) ग्रीक कालगणना, (६) रोमन कालगणना, (७) मध्य अमेरिकेतील कालगणना, (८) ख्रिस्ती कालगणना व (९) भारतीय कालगणना.
चिनी कालगणना : चीनची कालगणना प्राचीन असून ती विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत प्रचलित होती. तिची इतिहासपूर्व व ऐतिहासिक अशी दोन स्थित्यंतरे झाली. प्राचीन पौराणिक ग्रंथांतून इतिहासपूर्वकालातील कालगणनेविषयी माहिती मिळते, तर इतिहासकालीन कालगणनेसंबंधी जुन्या चिनी वाङ्मयाबरोबरच पुरातत्त्वीय साधनांचाही आधार घ्यावा लागतो.
इतिहासपूर्वकालीन चिनी कालगणना मुख्यत्वे चांद्र कालगणना होती. चांद्र कालगणना जुन्या पिढीच्या चिनी लोकांमध्ये अजूनही प्रचलित आहे. आकाशाचे विभाग ठरवून वार्षिक कालगणना सुरू केल्याची माहिती पौराणिक साहित्यांतून उपलब्ध होते. तत्संबंधी विश्वसनीय पुरावा उपलब्ध नाही. या पुढील काळात (इ.स.पू. २६९८—२३५७) चिनी लोकांनी एक प्रकारची युगात्मक कालगणना प्रचारात आणली. चीनचा पारंपारिक इतिहास इ.स.पू. २६९७ पर्यंत मागे नेण्याची चिनी लोकांची परंपरा आहे. बादशाह ह्वां डी (पीत सम्राट) आणि त्यामागून चीनच्या गादीवर आलेले त्याचे वारस व त्यापुढील ह्स्या (इ.स.पू. २२०५—१७६६), शांग (इ.स.पू. १७६६ — ११२३) आणि जौ (इ.स.पू. ११२२ — २५६) या वंशांच्या कारकीर्दीत चिनी लोक साठ वर्षांचे एक युग मानीत. इ.स.पू. २६३७ हे पहिल्या युगाचे पहिले वर्ष मानण्यात आले होते तर इ.स. १८३५ हे साल पंचाहत्तराव्या युगातील बत्तीसावे वर्ष मानण्यात आले होते. सध्याचे युग १९२४ साली सुरू झाले. प्रत्येक युगाला एक स्वंतत्र नाव असून कोणतेही वर्ष सांगताना अमक्या युगाचे अमके वर्ष, असे सांगण्याची चिनी लोंकांची पद्धत होती. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षाला एका प्राण्याचे नाव देण्यात येत असे. उदा., घोड्याचे वर्ष,सशाचे वर्ष, उंदराचे वर्ष इत्यादी. चिनी पंचांगाप्रमाणे आकाशाची १० बुंधे आणि १२ फांद्या मानण्यात येतात. त्यांपैकी एक बुंधा व एक फांदी एक़त्र करून वर्षांना नावे दिलेली आहेत. चिनी चांद्रमास एकाआड एक असे अनुक्रमे २९ व ३० दिवसांचे असत. चांद्र आणि सौर कालगणनेचा समन्वय सांधण्याकरिता एक अधिक महिना (रुन युए) किंवा तेरावा महिना धरत. त्यांना आठवड्याची कल्पना ठाऊक असावी कारण त्यांचा महिना चार आठवड्यांचा होता. तथापि सर्वसाधारणपणे प्रत्येक महिन्याचे १०-१० दिवसांचे तीन भाग करत असत.
अलीकडे झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनात चिनी कालगणनेविषयी अधिक तपशीलवार माहिती उपलब्ध झाली आहे. ती तज्ञांच्या मते शांग वंशाच्या कारकीर्दीपासूनची असून त्या वंशातील अखेरच्या नऊ राजांच्या (इ.स.पू. १३४२ —११२३) कारकीर्दीत तीत आमूलाग्र बदल झालेले आढळतात. ही सर्व माहिती कौल-अस्थी कोरीव लेखात (ओरॅकल बोन इन्स्क्रिप्शन्स ) असून तीत बारा महिने, तेरावा अधिक महिना, धार्मिक विधी, उत्तरायण आणि दक्षिणायन इत्यादींचा उल्लेख आढळतो. यावरुन सौर वर्षाच्या साह्याने चांद्र वर्ष कसे मोजत होते, याची कल्पना येते. हे चांद्रवर्ष पुढे जौ वंशापासून हंगामाप्रमाणे विभागलेले असून त्याचे चार विभाग केलेले दिसतात. त्या ऋतूंची चिनी भाषेत छ्वुन जी, स्या जी, च्यव जी आणि दुंग जी अशी नावे आहेत. साठ वर्षाचे युग ही कल्पना चालूच होती. या काळातील एका ब्राँझच्या भांड्यावरील लेखात युग, वर्ष, महिना वगैरेंचे उल्लेख आढळतात. ही कालगणना इसवी सनापर्यंत चालू होती. तीत काही किरकोळ फेरफार होऊन तिचे पुढील राजवटीत न्यन हाव हे नाव रूढ झाले. हान वंशातील (इ.स.पू. २०२ — इ.स.८ ) वन राजाने प्रथम हे नाव स्वीकारले.
प्राचीन काळापासून चिनी राजे ज्योतिमर्डंळाकंडन सूर्याच्या उदयास्ताचे काल, ऋतूंचे प्रारंभ काल इत्यादींविषयीचे माहितीपत्रक तयार करुन घेत आणि ते प्रांतोप्रांती जाहीर करीत. याशिवाय बारा पृष्ठांचे एक पंचांग, त्यात प्रत्येक पृष्ठावर महिना, वार, नक्षत्र, ग्रह तसेच स्नान, प्रवास, गृहप्रवेश वगैरे कृत्यांसबंधी शुभाशुभ मुहूर्त वगैरे माहिती दिलेली असे. याव (सु.इ.स.पू. २३५६ ते २२५५) राजाने सूर्याचे संपातबिंदू व आयनांतबिंदू यांचे वेध घेऊन तीही माहिती नोंदवून ठेवण्याची व्यवस्था केली. या राजाच्या नावाने याव संवतही तत्कालीन कालात काही दिवस प्रचारात आला.
पांरपरिक चिनी चांद्रवर्षपद्धती जवळजवळ च्यींग किंवा मांचू (१६४४ —१९१२) वंशापर्यंत रूढ होती. १९१२ मध्ये प्रजासत्ताकाची घोषणा झाल्यानंतर सौरवर्ष स्वीकारण्यात आले, तरीही पुढे १९४९ पर्यंत ती पूर्णतः मागे पडली नाही. मात्र १९४९ मध्ये लाल चीनचे प्रजासत्ताक जाहीर होताच, चीनने अधिकृत रीत्या ही पद्धत बंद करून ग्रेगरीय पंचांग अंमलात आणले. तथापि पारंपरिक सण, नवे वर्ष वगैरे अजूनही जुन्या पंचांगाप्रमाणे साजरे होतात.
ईजिप्तमधील कालगणना : ईजिप्तमधील कालगणनेचे दोन भाग पडतात. एक इतिहास पूर्वकालातील व दुसरा इतिहास कालातील. इतिहास पूर्वकालातील कालगणना ही अतिशय कच्ची आहे. त्या कालगणनेत ईजिप्तमधील विविध राजघराण्यांची सुमेरियन, बॅंबिलोनियन, हिटाइट, कॅसाइट इ. संस्कृतींतल्या राजांबरोबर झालेली युद्धे व तह यांवरून ईजिप्तमधील विविध घराण्यांतील राजांचा काळ ठरविला गेला आहे. पण तो बहुतेक कच्चा आहे.
इतिहासकाळात इ.स.पू. १३२१ हे वर्ष असे आहे, की ज्यापासून बरीचशी पक्की कालगणना सांगता येते. या वर्षी नाईल नदीचा पहिला पूर व सिरीअस (Sirius) तार्याचा उदय, हे एकाच वेळी घडून आले आणि अशी अवस्था प्रत्येक १,४६० वर्षांनी येत गेली व येते अशी समजूत आहे. यामुळे तेथे काही वर्षे १,४६० वर्षांचे एक चक्र मानले गेले. ईजिप्तमधील वर्ष प्रथम ३५४ दिवसांचे, नंतर ३६० दिवसांचे व १२ महिन्यांचे धरले गेले परंतु त्याचा सौर वर्षाशी मेळ बसेना म्हणून त्यात शेवटच्या महिन्याच्या अखेरीस पाच दिवस अधिक घालू लागले. तरीही दरवर्षी १/४ दिवसांची चूक पडू लागली. म्हणून चार वर्षांनी एक दिवस अधिक घालण्याचा उपक्रम केला, पण तोही पुरा पडला नाही. यांच्या बारा महिन्याना प्रथम खास नावे नव्हती. नंतर इ.स.पू. ६०० च्या सुमारास प्रत्येक महिन्यातील एका प्रमुख सणावरून नावे पडली. सात दिवसांचा आठवडा यांस ठाऊक नव्हता. यांचा दिवस व रात्र प्रत्येकी १२ तासांची होती. पण यामध्ये अहोरात्रीची कल्पना नव्हती. दिवस व रात्र जशी लहान मोठी होत, तशी तासांची लांबीही कमीअधिक होई. तेथे इस्लाम धर्माचा प्रसार झाल्यावर हिजरी कालगणना आली व आता तिच्याबरोबर ख्रिस्ती कालगणनाही चालू आहे.
बॅबिलनमध्ये एका सूर्यास्तापासून दुसर्या सूर्यास्तापर्यंत एक दिवस होई. रात्रीचे तीन व दिवसांचे तीन अशा सहा प्रहरांत त्याची विभागणी होई. दिवस व रात्र यांच्या लांबीप्रमाणे प्रहराची लांबी कमीअधिक होई. त्यांचा महिना अमावास्येनंतरच्या पहिल्या चंद्रदर्शनापासून चालू होई व तो २९ किंवा ३० दिवसांचा असे. सु. सहा महिन्यांनी चंद्रग्रहण येते, अशी त्यांची समजूत होती. अशा दोन चंद्रग्रहणांमधील अंतराचे एक वर्ष होई. ही सर्व इतिहास पूर्वकालातील परिस्थिती होती.
बॅबिलोनिया व ॲसिरिया या संस्कृतींमधील कालगणना : इतिहासाच्या प्रारंभिक काळात बॅबिलोनी लोकांत ३५४ दिवसांचे चांद्र वर्ष प्रचारात होते. त्यांच्या १२ महिन्यांची नावे कृषिकार्याशी संबद्ध होती. ऋतूंशी मेळ घालण्यासाठी ते मधूनमधून अधिक महिना वापरीत. पीक तयार झाले असल्यास, अधिक महिना घालून वर्ष पिकाशी जुळवून घेत. सहावा किंवा बारावा महिना अधिक समजण्याची प्रथा होती. पण तो मुख्य महिन्यानंतर येई. बॅबिलन व सुमेर यांचे एकत्रीकरण झाल्यावर बॅबिलोनी मासनामे प्रचारात राहिली. शेकडो वर्षाच्या निरीक्षणानंतर त्यांना दिसून आले की, १९ सौर वर्षे, किंवा २२८ सौर महिने म्हणजे २३५ चांद्र महिने होतात. बॅबिलोनी वर्ष मार्डुक देवाच्या उत्सवापासून चालू होई.
ॲसिरियन वर्षात विविध नावांचे १२ महिने व ३६० दिवस असत. पण सौर वर्षाशी मेळ घालण्यासाठी तीन वर्षांनी १५ दिवस अधिक धरीत. महिन्याचे प्रत्येकी १० दिवसांचे तीन भाग करीत. ७२ महिने व त्यात घालावयाची १५ दिवसांची दुप्पट मिळून ७३ महिन्यांत त्रिगुणित १० दिवसांची ७३ चक्रे पुरी होत. प्रत्येक वर्षाला एखाद्या अधिकार्याचे नाव देत. पहिला टिग्लॅथ पायलीझर याने बॅबिलन जिंकल्यावर हळूहळू बॅबिलोनी कालगणना अधिकाधिक प्रचारात आली आणि शेवटी ॲसिरियन कालगणना लुप्त झाली.
ज्यू कालगणना : यांच्या कालगणनेत वर्ष सौर असून महिने चांद्र असतात. यामुळे यांना अधिक महिना घालावा लागतो. यासाठी यांनी एकोणीस वर्षांचे एक चक्र कल्पिले असून त्यांतील ३,६,८,११,१४,१७,१९ या वर्षी अधिक महिना धरतात. यातील अहोरात्र सामान्यतः सूर्यास्तापासून सूर्यास्तापर्यंत असतो. परंतु रोजच्या व्यवहारात सकाळी सहा वाजता नवा दिवस सुरू होतो. एका तासाचे ते १,०८० भाग करतात. म्हणजे त्याचा एक भाग ३⋅३ सेकंदांचा असतो. त्याचा महिना गणितागत २९ दिवस १२ तास ४४ मिनिटे व ३ १/३ सेकंद एवढ्या अवधीचा असतो. पण व्यवहारामध्ये त्यांचे महिने आलटूनपालटून ३० व २९ दिवसांचे असतात आणि दोन महिने कमीअधिक दिवसांचे असतात. यामुळे त्यांचे वर्ष कधी ३५३ ते ३५५ दिवंसाचे आणि अधिक महिन्याचे वर्ष ३८३ ते ३८५ दिवसांचे असते. यामध्ये २८ वर्षांचेही एक चक्र असते. याशिवाय क्रमाने वर्षावर्षाने वाढत जाणारी वर्षगणना आहे. १९०७०–७१ मध्ये या कालगणनेचे ५,७३१ वर्ष आले. यांच्या महिन्यांची नावे प्राचीन काळी हिब्रू होती. पण आता ती सोडून देऊन बॅबिलोनी घेतली आहेत.
ग्रीक कालगणना : हीमध्ये वर्ष सौर होते, पण महिने मात्र चांद्र होतात. यामुळे सौर वर्षाशी मेळ घालण्यासाठी अधिक महिना धरणे भागच पडे. त्याप्रमाणे प्रथम प्रथम ८ वर्षांत ३ महिने अधिक धरीत आणि पुढे पुढे १९ वर्षांत ७ महिने अधिक धरू लागले. यामुळे १९ वर्षांचे एक चक्र तयार झाले, पण चंद्रसूर्याच्या गतीचा अधिक चांगला मेळ घालण्यासाठी १९ वर्षांच्या ४ चक्रांचे म्हणजे ७६ वर्षांचे एक चक्र कालिपस याने सुरू केले. तरीही चांद्र व सौर वर्षांचा नीट मेळ बसेना, म्हणून हिपार्कस याने ७६ वर्षांच्या ४ चक्रांचे म्हणजे ३०४ वर्षांचे एक चक्र मानण्याची कल्पना काढली. याचा अर्थ हा की, ग्रीसमध्ये सध्यासारखी अनावर्त क्रमाने वाढत जाणारी वर्षगणना चालू नव्हती. त्यांना ७ दिवसांचा आठवडा माहीत नव्हता, ते महिन्याचे प्रत्येकी १० दिवसांचे ३ भाग करीत. सरकारी कामकाजाचा दिवस जरी एका सूर्यास्तापासून दुसर्या सूर्यास्तापर्यंत समजला जात असे, तरी लोक व्यवहारामध्ये उदयापासून उदयापर्यंत दिवस मानीत. त्यांच्या बारा महिन्यांपैकी पॉसेदिऑन हाच महिना नेहमी अधिक धरला जाई. मात्र प्रथम नेहमीचा महिना आणि नंतर अधिक महिना धरीत. नवे वर्ष कर्क संक्रांतीनंतरच्या शुद्ध प्रतिपदेला सुरू होई. महिन्याचे एकाआड एक ३० व २९ दिवस धरीत.
रोमन कालगणना : रोमन लोकांचे वर्ष सौर व महिने चांद्र होते. त्यांचा मेळ घालण्यासाठी चार वर्षांत एकदा किंवा दोनदा अधिक महिने धरीत. हा एक महिना फेब्रुवारी २३ नंतर सुरू होई आणि अधिक महिना संपल्यानंतर फेब्रुवारीच्या २४ ते २८ या तारखा घेत. या गणनेतही अनावर्त व क्रमाने मोठी होत जाणारी वर्षगणना नव्हती. एकंदरीत तेथील कालगणना पुष्कळच घोटाळ्याची होती. याचां आठवडा आठ दिवसांचा असे. यामुळे कालगणनेच्या गोंधळात भरच पडली. तेव्हा ज्युलियस सीझरने इ.स.पू. ४६ मध्ये या कालगणनेत पुष्कळ सुधारणा केली आणि ऑगस्टस याने ते काम पुढे चालविले. यामुळे या दोघांची नावे जुलै व ऑगस्ट या रूपाने दोन महिन्यांना दिली गेली. यांचा वर्षारंभ प्रथम १ मार्च रोजी सुरू होई, पण १५३ या वर्षी तो १ जानेवारीला धरू लागले. एवढ्यानेही गोंधळ संपला नाही. तथापि ज्युलियन कालगणना सदोष असूनही सोळाव्या शतकापर्यंत चालू राहिली. पण १५८२ मध्ये तेराव्या पोप ग्रेगरीने ज्युलियन कालगणनेत आवश्यक ते फेरफार करून तिला शास्त्रशुद्ध कालगणनेचे रूप दिले. तीच कालगणना सध्या चालू आहे.
मध्य अमेरिकेतील कालगणना : या प्रदेशातील विविध कालगणना प्राय :एकरूप आहेत. त्यांतील माया ही प्रमुख आहे. तेव्हा तिच्या वर्णनांत अझटेक, झॅपोटेक इ. लोकांच्या कालगणनांचा समावेश होतो असे समजावे. माया संस्कृतीस १ ते १३ अंक व २० दिननामे ठाऊक आहेत. प्रत्येक दिवसामागे एक अंक व एक दिननाम येई. १३ व २० यांचा लघुतम साधारण विभाज्य २६० येत असल्याने, २६० दिवसांचे एक चक्र होऊन दिननामांचे पुनरावर्तन होई. पण वर्ष ३६५ दिवसांचे असे व महिना २० दिवसांचा धरीत. यामुळे एक वर्ष १८ महिने व दुर्दिन म्हटले जाणारे ५ दिवस एवढ्यांचे बने. शिवाय १३ या आकड्याचे साहचर्य सोडवत नसे. यामुळे ५२ वर्षे किंवा १८,९८० दिवस एवढ्या कालानंतर या कालगणनेतील प्रत्येक जातीची जशीच्या तशी पुनरावृत्ती होत असे. प्रत्येक अंक व दिननाम एकेका देवाचे नाव आहे. त्यांच्या जोडीवरून विशिष्ट दिवस सुदिन किंवा दुर्दिन ठरे. मूल ज्या दिवशी जन्मे त्या दिवसाचे नाव त्या मुलास देत.
ख्रिस्ती कालगणना : ख्रिस्ती कालगणनेची निश्चितपणे केव्हा सुरुवात झाली, ह्याबद्दल तज्ञांत अद्यापि एकमत नाही. तथापि ख्रिस्ती कालाचा शोध इटलीतील डायोनिसिअस एक्झीगस ह्या धर्मगुरुने सहाव्या शतकाच्या सुमारास लावला. त्याची सुरुवात काही लोक रोम शहराच्या उभारणीपासून म्हणजे १ जानेवारी ७५४ ए.यू.सी. (Anno Urbis Conditae) पासून करतात, तर काही येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून, म्हणजे इ.स.पू. २५ डिसेंबरपासून गृहीत धरतात. कालगणना करणारे शून्य इसवी वर्ष सन गृहीत धरण्यास तयार नसून ते कालानुक्रमाच्या मोजमापासाठी इ.स.पू. १ किंवा इ.स. १ जानेवारी १ ही तारीख वा वर्ष मोजण्याच्या सुरुवातीस घेऊन तिथून पुढे ख्रिस्ती वर्ष मोजतात. अर्थात येशू ख्रिस्ताच्या जन्माची तारीखही निश्चित नसल्यामुळे वरील अनुमानेही काहीशी धार्मिक व पारंपारिक तत्त्वांवर आधारित आहेत. तथापि आज जगातील बहुतेक देशांत ही कालगणना रूढ असून तिचा सर्वसामान्यपणे वापर केला जातो.
या कालगणनेतील वर्ष सौर असून त्याची लांबी सूक्ष्म मानाने ३६५ दिवस, ५तास, ४८ मिनिटे, ४५⋅३७ सेकंद एवढी आहे. पण दरवर्षी या वर्षाची लांबी ढोबळ मानाने ३६५ दिवस एवढीच धरीत असल्याने दरवर्षी याचा खरा वर्षारंभ ५ तास, ४८ मिनिटे व ४५⋅३७ सेकंद एवढ्या वेळाने मागे पडतो. हा मागे पडणारा वेळ भरुन काढण्यासाठी दर ४ वर्षांनी ढोबळ मानाने १ दिवस (फेब्रुवारी २९) अधिक धरला जातो. पण यायोगे खरा वर्षारंभ दर ४ वर्षांत सु. ४५ मिनिटे पुढे जातो. ढोबळ वर्ष सूक्ष्म वर्षाच्या जोडीस यावे म्हणून दर १०० वर्षांनी फेब्रुवारीची २९ तारीख धरीत नाहीत. पण यामुळे सूक्ष्म वर्षारंभ १०० वर्षात सु.६ १/४ तास मागे पडतो. हे मागे पडणारे अंतर भरुन काढण्यासाठी दर ४०० वर्षांनी फेब्रुवारीचे २९ दिवस धरावे असे ठरविले आहे. हा सर्व विवेक १५८२ साली करण्यात आला. त्यावेळी सूक्ष्म गणिताने येणारा खरा वर्षारंभ ढोबळ गणिताने येणार्या वर्षारंभाच्या १० दिवस पुढे नेणे आवश्यक झाले. हे अंतर भरुन काढण्यासाठी १५८२ च्या ऑक्टोबर ५ रोजी १५ तारीख मानावी, असा तत्कालीन ख्रिस्ती समाजाचा धार्मिक पुढारी तेरावा पोप ग्रेगरी याने हुकूम काढला. अर्थात नवी कालगणना जुनीच्या दहा दिवस पुढे गेली. या पद्धतीस ‘न्यू स्टाईल’ असे नाव असून जुन्या ढोबळ पद्धतीस ‘ओल्ड स्टाईल’ असे नाव आहे. नव्या पद्धतीची आज्ञा इटली, स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड इ. रोमन कॅथलिक देशांनी मानली आणि इंग्लंडसारख्या देशांनी मानली नाही. जुन्या पद्धतीत १७०० मध्ये फेब्रुवारीचे २९ दिवस धरले गेले. पण नव्या पद्धतीत धरले गेले नाहीत. यामुळे १७०० साली जुनी पद्धत आणखी एका दिवसाने मागे पडून नवी व जुनी पद्धत यांतील अंतर ११ दिवस झाले. ज्युलियन पद्धतीने कालगणना दृक्प्रत्ययाच्या किंवा सूक्ष्मतर गणिताने येणार्या कालाच्या मागे पडली आहे, हे लक्षात आल्यावर १७५२ मध्ये इंग्लंडात पार्लमेंटने कायदा करून या सालच्या सप्टेंबर ३ तारखेस १४ तारीख समजावी असे घोषित केले आणि नवी पद्धत अंमलात आणली. हे सर्व पुढीलप्रमाणे समजावून सांगता येईल : १७०० फेब्रुवारी २८ अखेरपर्यंत जुनी पद्धत + १० दिवस = नवी पद्धत. म्हणून जुन्या पद्धतीची १६५२ ऑक्टोबर २० = नव्या पद्धतीची १६५२ ऑक्टोबर ३० व १७०० मार्च १ पासून पुढे जुन्या पद्धतीची १७३० ऑक्टोबर २० = नव्या पद्धतीची ऑक्टोबर ३१. एवढे झाले, तरी वर्षारंभ कोणत्या दिवशी धरावयाचा हा प्रश्न होताच. १७५२ पर्यंत इंग्लंडात नवीन वर्षारंभ २५ मार्चला होत असे. नंतर वर्षारंभ जानेवारी १ रोजी धरू लागले. म्हणून १ जानेवारी ते २४ मार्च येथपर्यंतच्या तारखांना कोणते वर्ष चालू होते हे निश्चित समजावे, या हेतूने त्यांपुढे जुन्या व नव्या अशा दोन्ही वर्षांचे उल्लेख करीत. उदा., १७२५ फेब्रुवारी २३ ही तारीख १७२४– २५ फेब्रुवारी २३ अशी लिहीत. इंग्रजी महिने सर्वांच्या परिचयाचे आहेत. ते पुढीलप्रमाणे : जानेवारी– ३१, फेब्रुवारी– २८, मार्च– ३१, एप्रिल– ३०, मे– ३१, जून– ३०, जुलै –३१, ऑगस्ट– ३१, सप्टेंबर– ३०, ऑक्टोबर– ३१, नोव्हेंबर– ३० आणि डिसेंबर–३१.
भारतीय कालगणना : वैदिक कालात अहोरात्र पक्ष, चांद्रमास, ऋतु,नक्षत्रे यांचे तत्कालीन लोकांना चांगले ज्ञान झाले असल्याचे दिसते. एवढेच नव्हे, तर सौर मास व चांद्र मास यांचा मेळ घालण्यासाठी लागणाऱ्या अधिक मासाचेही त्यांना आकलन झाले होते. त्याही पुढे जाऊन, वासंतिक व शारद संपात यांचेही त्यांस ज्ञान झाले होते. पण कालगणनेसाठी त्यांना चार किंवा पाच वर्षांचे एक चक्र किंवा युग कल्पावे लागले. याचा अर्थ, ते वर्षगणन पाचाच्या किंवा दहाच्या पुढे नेत असत. पुढे बहुधा चक्रे मोजीत.
काही देशांत १० महिन्यांचे वर्ष समजले जाई. पण भारतामध्ये चंद्राच्या अनुषंगाने होणारे १२ चांद्र महिन्यांचे चांद्र वर्ष आणि सूर्य व तारे यांच्या अनुषंगाने होणारे सौर वर्ष, तसेच त्यांचा मेळ घालण्यासाठी धरावा लागणारा अधिमास, यांबाबतीत वेदकालीन लोक इतरांच्या मानाने बरेच पुढे गेले होते. तथापि २७ नक्षत्रांपासून तयार केलेल्या १२ राशी आणि सूर्यादी सप्त ग्रहांवरून बनविलेले वार, हे भारतीय आर्यांनी ग्रीक लोकांपासून घेतले असे दिसते. राशीवारांचे पश्चिमेकडून भारतात संक्रमण होत असता अरबस्तान, इराण इ. देशांत वार का रुजले नाहीत, हा एक प्रश्नच आहे. अरबी व इराणी संस्कृतींत वारांना ग्रहांवरुन पडलेली स्वतंत्र नावे नाहीत. त्यांमध्ये पहिल्या पांच दिवसांना म्हणजे रविवार ते गुरुवार या पाच वारांना अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा दिवस किंवा यक्शंबा, दूशंबा, सेशंबा, चहारशंबा, पंजशंबा, शुक्रवारला जुमा, आदिना आणि शनिवारला सुबत किंवा शंबा अशी नावे दिली आहेत. यावरून या देशांत वारांची प्रथा रुजली नाही, हे स्पष्ट होते. राशी मात्र भारतात प्रचारात आल्या, तेव्हाच या देशांतही प्रचारात आल्या. अशा रीतीने भारतीय ज्योतिषात कोणता भाग केव्हा व कसा प्रविष्ट झाला हे पाहणे फार उद्बोधक होईल.
भारतात जलद दळणवळणाची साधने नव्हती, तेव्हा काश्मीर ते कन्याकुमारी किंवा प्राग्योतिष ते सिंध हा प्रवास करण्यास काही महिने लागत. अशा वेळी संपूर्ण भारताचा विस्तार केवढा आहे, हे एखाद्याच चिकित्सक विद्वानाच्या ध्यानात येत असेल. पराक्रमी राजे आपल्या राज्याची साम्राज्ये बनवीत. पण तीही जलद दळणवळणाच्या अभावी फार वर्षे टिकत नसत. त्या काळी भारतात लहानलहान राज्ये असणे नैसर्गिक बनले होते. अशा काळात लोकव्यवहारही प्रायः प्रादेशिक असत. प्रदेशा-प्रदेशांत भिन्नभिन्न आचार व व्यवहार चालत. अशा परिस्थितीत व्यवहारांमध्ये भिन्नभिन्न कालगणना उत्पन्न होणे साहजिकच होते व तसे झालेही.
भारतात विविध कालगणना उत्पन्न होण्याचे आणखीही एक कारण आहे. इतिहासाच्या अभ्यासावरून आपणास असे दिसून येते की, अनेक जमाती विविध काळी भारताबाहेरून भारतात आल्या व कायमच्या वस्ती करून राहिल्या. त्यांनी आपल्या बरोबर काही आचार–उच्चार–विचार आणले. त्यांत कालगणनाही होत्या. त्या जमातींपैकी काहींनी आपली राज्ये येथे स्थापन केली. तेव्हा त्यांच्या कालगणनाही येथे प्रचारात आल्या.
विविध कालगणना भारतात चालू होण्याचे तिसरेही एक कारण आहे. येथील हिंदू राजांमध्ये अशी एक कल्पना प्रचलित होती की, अत्यंत पराक्रमी राजा जो कोणी असेल, तो आपली स्वतंत्र कालगणना प्रचलित करीत असे. त्यांना इतिहास ठाऊक नव्हता. पण विक्रमादित्य व शालिवाहन हे मोठे पराक्रमी राजे होऊन गेले व त्यांनी आपल्या कालगणना चालू केल्या. आपण जर त्यांसारखेच पराक्रमी आहो, तर आपणही आपल्या कालगणना का चालू करू नयेत. म्हणून काही राजांनीही आपल्या स्वंतत्र कालगणना चालू केल्या. चालुक्य, सहावा विक्रमादित्य, अकबर, शिवाजी, टिपू इ. अशांपैकीच राजे होत.
सारांश, भारतात गेल्या सु. २,५०० वर्षांत पाच-पंचवीस कालगणना उत्पन्न झाल्या किंवा प्रचलित केल्या गेल्या. यांपैकी काही शुद्ध भारतीय, काही परकीय व काही मिश्र स्वरूपाच्या आहेत. काहींच्या प्रारंभाचा थांगपत्ता लागतो, काहींचा लागत नाही. विविध कालगणनांत वर्षगत दिले आहे की, चालू संवत्सरनाम दिले असल्यास ते वर्षाशी जुळते आहे की नाही, वर्ष चांद्र, सौर किंवा चांद्रसौर आहे, महिने चांद्र अथवा सौर, चांद्र असल्यास अमान्त की पूर्णिमान्त, मुसलमानी महिने असल्यास महिन्यांचे दिवस ढोबळ धरले आहेत की, दृक्प्रत्ययाचे, वारांची नावे कोणत्या प्रकारची आहेत, तारीख व वार सूर्योदयी बदलल्याचे धरले आहे की सूर्यास्ती, इंग्रजी तारीख नव्या पद्धतीची की जुन्या इ. अनेक विकल्प असून ते लक्षात घ्यावे लागतात. या सर्वांचा थोडक्यात उलगडा असा आहे :
खाली दिलेल्या कालगणनांत, त्यांतील महिने, दिवस इत्यादींची माहिती दिली आहे. त्याची अनुक्रमणिका अशी : (१) अमली = कटकी = बंगाली = विलायती, (२) इलाही, (३) कटकी = अमली, (४) कलचुरी, (५) कलियुग, (६) कोल्लम्, (७) गांगेय किंवा गंग-कदंब, (८) गुप्त, (९) ग्रहपरिवृत्ती, (१०) चालुक्य विक्रम, (११) जव्हार, (१२) जुलूस, (१३) तुर्की द्वादशवर्षचक्र व चिनी षष्टिवर्षचक्र, (१४) नेवार (नेपाळ), (१५)पर्गनाती, (१६) पुदुवैप्पु, (१७) फसली, (१८) बंगाली=अमली, (१९) बार्हस्पत्य वर्षचक्र १ व २, (२०) बुद्धनिर्वाण, (२१) भाटिक, (२२) मगी, (२३) मब्लूदी, (२४) मौर्य, (२५) राज्याभिषेक, (२६) लक्ष्मणसेन, (२७) विक्रम, (२८) विलायती= अमली, (२९) वीरनिर्वाण, (३०) शक, (३१) शुहूर, (३२) सप्तर्षी, (३३) सिंह, (३४) सिल्युसिडी, (३५) हर्ष, (३६) हिजरी.
अमली = कटकी = बंगाली = विलायती : या चारही कालगणना मुसलमानी फसली कालगणनेची जवळजवळ रूपांतरेच आहेत. फसली कालगणना सौर असल्यामुळे या सर्व कालगणनाही सौरच आहेत. मात्र यांतील वर्षाचा आंरभ फसलीप्रमाणे मृग नक्षत्राच्या आरंभी होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. तसेच यांतील अमली,कटकी आणि विलायती हे काल बंगाली कालगणनेपेक्षा एक वर्षाने मोठे आहेत. यांतील महिन्यांची नावे सौर वैशाखादी आहेत. यांच्या नवीन वर्षाचा आंरभ निरनिराळ्या वेळी होतो. जसे अमली व कटकी या कालगणनांतील नव्या वर्षाचा आरंभ भाद्रपद शुक्ल द्वादशी या दिवशी होतो. बंगाली कालगणनेचे नवे वर्ष मेष संक्रांतीच्या दुसरे दिवशी सुरू होते आणि विलायती कालगणनेतील नवे वर्ष कन्या संक्रांतीच्या पहिल्या दिवशी सुरू होते. हे नीट ध्यानात यावे म्हणून ही माहिती खालील कोष्टकात दिली आहे.
इलाही : हिजरी कालगणनेस मुसलमानांमध्ये धार्मिक दृष्ट्या कितीही महत्त्व असले, तरी व्यवहाराच्या दृष्टीने ती कालगणना केवळ चांद्रमासाची असल्यामुळे आणि ब्रिटिशपूर्व काळात जमिनीचे उत्पन्न हीच कोणत्याही राज्याच्या उत्पन्नाची मुख्य बाब असून पिके सूर्यमानावर अवलंबून असल्यामुळे झाडून साऱ्या मुसलमानी देशांत नित्य व्यवहारासाठी कोणत्या ना कोणत्या रूपाने सौर मानाचा अंगीकार करण्यात आला आहे. भारतात दिल्लीच्या सुलतांनाच्या काळात कोणत्या प्रकारचे सौरमान धरले होते आणि धरले नसल्यास चांद्रमानाने उत्पन्न होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्याने आपल्या २९ व्या राज्यवर्षी किंवा हिजरी ९९२ (१५८४) या वर्षी तारीख- इ- इलाही किंवा नुसती इलाही या नावाची एक सौर कालगणना चालू केली व ती आपल्या राज्यवर्षाशी जुळवून घेतली. त्याने आपले राज्यवर्षही सौर मानाचे केले. ही कालगणना २९ व्या राज्यवर्षी चालू केली असली, तरी या वर्षापूर्वी झालेल्या सर्व घटनांचे काल या गणनेत द्यावे असे त्याने फर्माविले. अकबर वस्तूतः १४ फेब्रुवारी १५५६ या दिवशी गादीवर बसला, तरीही या वर्षी होणारा इलाही वर्षाचा आरंभ त्यादिवशी न धरता तो इराणी वर्षारंभ दिनी म्हणजे जुन्या पद्धतीप्रमाणे ११ मार्च किंवा नव्या पद्धतीप्रमाणे २१ मार्च १६५६ रोजी झाला. असे धरावयाचे ठरविले. यामुळे या कालगणनेतील प्रत्येक नव्या वर्षाचा पहिला दिवस जुन्या पद्धतीप्रमाणे १०,११,१२ मार्च यांपैकी कोणत्या तरी दिवशी पडू लागला. श्री.वा.सी.बेंद्रे यांच्या तारीख-इ-इलाही या पुस्तिकेत दिलेल्या कोष्टकांप्रमाणे ४,८,१२,१६,२०,२४,२८ या इलाही वर्षांचा आंरभ जुन्या पद्धतीप्रमाणे १२ मार्च रोजी ६५, ६९, ७३, ७७, ८१, ८५, ८९, ९३, ९७, ९८, १०१, १०२, १०५, १०६, १०९, ११०, ११३, ११४, ११७ व ११८ या इलाही वर्षांचा आरंभ १० मार्च रोजी व उरलेल्या इलाही वर्षाचा आरंभ ११ मार्च रोजी झाला असे ठरते. या कालगणनेत महिने सौर होते आणि त्यांचे दिवस अनियमित होते.
या कालगणनेचा वापर अकबराच्या २९ व्या राज्यवर्षापासून ते जहांगीरच्या अखेरपर्यंत फार मोठ्या प्रमाणावर झाला. शाहजहानच्या काळापासून क्रमशः तो कमी होत जाऊन मोगल राजवटीच्या शेवटी शेवटी याचा वापर क्वचितच होत राहिला.
कटकी = अमली.
कलचुरी : यास कलचुरी, चेदी किंवा त्रैकूटक अशा संज्ञा असून याचा प्रयोग प्राचीन काळी दक्षिण गुजरात, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, पूर्व मध्यभारत व छत्तीसगढ या प्रदेशांत होऊन गेलेल्या चालुक्य, सेंद्रक, गुर्जर, त्रेकूटक, कलचुरी, हैहय इ. राजकुलांच्या लेखांत केलेला आढळतो. या कालाचे आंरभीचे लेख नासिक व खानदेशमध्ये सापडले आहेत. शेवटचा ज्ञात लेख ९६९( १२१८ ) सालचा असून तदनंतर हा काल मागे पडला असावा. यांचे महिने सामान्यतः पूर्णिमांत व क्वचित अमान्त असतात. हा काल कोणी व केव्हा सुरू केला, याविषयी विविध मते असली, तरी तो बहुधा आभीर नृपती ईश्वरसेन याने सुरू केला असावा.
कलियुग: भारतीय युद्ध चालू असता द्वापरयुग संपून कलियुगास प्रारंभ झाला. त्याच वर्षी युधिष्ठिर गादीवर आला. यामुळे या गणनेस कलियुग किंवा भारतीय युद्ध अथवा युधिष्ठिर काल अशी नावे आहेत. पण भारतीय युद्ध केव्हा झाले, याविषयी तज्ञांत मतभेद असल्यामुळे याच्या प्रारंभकालाविषयी मतभिन्नता आढळते. ती अशी :
गोव्याच्या कदंबांच्या कित्येक शिलालेखांत या कालगणनेचे निर्देश आले आहेत. हे सामान्यतः शककालापूर्वी ३,१७९ वर्ष हे प्रारंभ वर्ष धरून जुळतात.
कोल्लम् : यास संस्कृत लेखांत कोलंब संवत्, तमिळ लेखांत कोल्लम् आंडु (पश्चिमी वर्ष), मलबारात परशुराम संवत् आणि कधी कधी कोल्लमच्या( क्विलॉन्) उत्पत्तिपासूनचे वर्ष असे म्हणतात. वीर रविवर्मनच्या त्रिवेंद्रम् लेखात कलियुग वर्तमान ४,७०२ ( गत ४,७०१ ) वर्षांच्या संगतीने याचे ७७६ हे वर्ष दिले आहे. गतकाली ४,७०१= श. १५२२, म्हणून श. १५२२ म्हणजे कोल्लम् ७७६ म्हणून गत श. ७४६ मध्ये याचा आरंभ झाला असे ठरते. कोल्लम वर्षात ८२४–२५ मिळवून इ.स. येतो. याची प्रत्येकी एक हजार वर्षांची चक्रे करावयाची असे ठरले होते, पण श. १७४६ मध्ये याची एक हजार वर्षे झाल्यावर नवे सहस्त्र वर्षचक्र चालू न करता १,००१, १,००२ असे दुसरे सहस्त्रक चालू केले.
गांगेय किंवा गंग-कदंब : या कालाचे उल्लेख पूर्वेकडचे गंग आणि त्यांचे मांडलिक कदंब राजे यांच्या लेखांत आढळतात. पाचव्या शतकाच्या अखेरीस गांगेय वंशी राजाने कलिंग देशात राज्य स्थापून हा संवत् चैत्र शुक्ल प्रतिपदा, गत शक ४२० (१४ मार्च ४९८) या दिवशी सुरू केला. याच्या गत वर्षात ४९८-९९ मिळविले म्हणजे इ.स. चे वर्ष येते. या संवताची वर्षे बहुधा गत व क्वचित वर्तमान असतात. याचे महिने बहुधा अमान्त व क्वचित पूर्णिमान्त आढळतात. याचे शेवटचे ज्ञात वर्ष ५२६ (१०२४-२५) हे आहे.
गुप्त : या कालास वलभी असेही नाव आहे. अल्-बीरूनीने श्रीहर्ष संवत् १४८८= विक्रम संवत् १०८८= शक. ९५३ = गुप्त किंवा वलभी ७१२ असे समीकरण दिले आहे. तेव्हा विक्रमातून ३७६ किंवा शतकांतून २४१ उणे केले म्हणजे गुप्तकाल येतो. काठेवाडीतील एका शिलालेखात हिजरी ६६२ = विक्रम १३२० = वलभी ९४५ = सिंह १५१ आषाढ कृष्ण १३ रवि असा काल दिला आहे. येथे विक्रम १३२० हा कार्तिकादी धरला म्हणजे चैत्रादी विक्रम १३२१ येतो. या हिशेबानेही विक्रम संवत्-३७६=गुप्त किंवा वलभी काल हेच समीकरण तयार होते. वर्तमान गुप्त संवत्सरात ३१८–१९ व गत संवत्सरात ३१९–२० मिळविले म्हणजे इ.स. चे वर्ष येते. याचे महिने पूर्णिमान्त असून आरंभ चैत्र शुक्ल प्रतिपदेस होतो. याच्या उल्लेखात प्रायः गत वर्ष येत असून क्वचित वर्तमान वर्ष असते. या कालाचा सर्वप्रथम निर्देश तिसाव्या वर्षाचा असून सर्वोत्तर निर्देश वलभी ९४५ चा आहे. याचा प्रसार नेपाळ ते काठेवाड एवढ्या मोठ्या प्रदेशात झाला, तरी हा कालांतराने लोप पावला.
या कालाचा आरंभ नेमक्या कोणत्या राजाने केला हे समजत नसले, तरी गुप्त वंशातील पहिले दोन राजे श्रीगुप्त व घटोत्कच यांच्या नावांमागे नुसते महाराज असे बिरुद आणि घटोत्कचाचा मुलगा प्रथम चंद्रगुप्त याच्या नावामागे महाराजाधिराज हे उपपद लाविल्याने, तसेच पहिल्या चंद्रगुप्ताचा नातू दुसरा चंद्रगुप्त याच्या कारकीर्दीतील पण गुप्तकालानुवर्तमानसंवत्सरे एकषष्ठे असा निर्देश सापडल्यामुळे असे अनुमान होते की, या कालाचा आरंभ बहुधा पहिला चंद्रगुप्त राज्यावर आला, त्या वर्षापासून होत असावा.
ग्रहपरिवृत्ती: याचे ९० वर्षाचे एक चक्र असून त्याचा आरंभ कलियुग ३०७९(इ.स.पू.२४) पासून झाला असे समजतात. वर्तमान कलियुग वर्षातून १८ उणे करून शेष संख्येस ९० संख्येने भागिले असता, उरेल ती संख्या या कालाच्या चालू वर्षाची निदर्शक असते किंवा वर्तमान शक वर्षात ११ मिळवून येणाऱ्या संख्येस ९० नी भागिले असता उरेल तो आकडा या गणनेच्या चालू वर्षाचा होय. याच्या निर्देशांत ९० वर्षांची किती चक्रे झाली हे येत नसून फक्त चालू चक्राची किती वर्षे संपली एवढेच नमूद असते. याचा प्रचार मुख्यतः पूर्वीच्या मद्रास इलाख्याच्या मदुरा जिल्ह्यात झाला आहे.
चालुक्य विक्रम : यास चालुक्य विक्रमकाल–वर्ष, वीर विक्रमकाल–वर्ष, नुसते विक्रमकाल–वर्ष इ. संज्ञा आहेत. हा काल कल्याणचा चालुक्य सम्राट सहावा विक्रमादित्य याने ‘माझ्यासारख्या महाप्रतापी राजाने शक किंवा विक्रम अगर आणखी कोणा राजाच्या नावाचा काल काय म्हणून चालवावा’, अशा भावनेने शक ९९८ नल किंवा अनल संवत्सरात चालू केला. अर्थात या कालात ९९७ मिळविले असता गत शक येतो. शक ९९८ च्या फाल्गुनात कोरलेल्या वडगेरी लेखात याच्या पट्टबंधानिमित्त केलेली दाने नोंदलेली असल्याने यापूर्वी नुकताच याचा राज्याभिषेक झाला असला पाहिजे. याचे निर्देश असलेले शेकडो लेख उपलब्ध झाले असून त्यांतील विक्रमवर्षे व संवत्सरनामे यांच्या जोड उल्लेखावरून या कालाचे पहिले वर्ष शक ९९८ चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झाले असले पाहिजे, याविषयी शंका उरत नाही. चालुक्य विक्रमवर्षात १०७५–७६ मिळवून इ.स. येतो. हा काल स्वतः विक्रमादित्य व त्यांचे मांडलिक यांनी तर उपयोगात आणलाच, पण याच्या नंतरचा राज्याधिकारी तिसरा जयसिंह व त्याचे सामंत यांनीही हा काल चालू ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. या कालाचा सर्वप्रथम निर्देश श. ९९८ नल किंवा अनल संवत्सर यातील म्हणजे प्रथम वर्षाचा आहे आणि सर्वोत्तर निर्देश श. १०९१ अर्थात चालुक्य विक्रम वर्ष ९४ विरोधी संवत्सर असा आहे.
जव्हार : ही कालगणना जव्हारच्या संस्थानिकानी दिलेल्या सनदापत्रांत किंवा त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांत चालू होती. या कालगणनेचा उल्लेख असलेले फार थोडे कागदपत्र मिळाले आहेत. त्यातही या कालगणनेच्या संगतीने दुसऱ्या एखाद्या मान्य कालगणनेचा उल्लेख असलेले फक्त एकच पत्र मिळाले आहे. त्यातील या कालगणनेच्या उल्लेखांपैकी शेवटच्या आकड्याविषयी संशय आहे. तथापि स. म. दिवेकर यांनी एके ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे याचा आरंभ या संस्थानाच्या धनी वंशापैकी नेमिशाह यास श. १२६५ ज्येष्ठ शु. १२ रोजी शाह हा किताब मिळाला. या घटनेच्या स्मरणार्थ त्या दिवसापासून ही गणना सुरू झाली, असे सध्या गृहीत धरण्यात येते. याच्या एकमेव उल्लेखावरून हा काल वर सांगितल्याप्रमाणे श. १२६५ ज्येष्ठ शुद्ध १२ या दिवशी सुरू झाला असे धरण्यात येते. यांत १२६४ मिळविले असता गत शकवर्ष येते.
जुलूस : प्रचीन मुसलमानपूर्वकालीन राजांपैकी कित्येकांनी स्वतःच्या ताम्रशिलाशासनांत काही वेळा एखाद्या कालगणनेच्या जोडीने तर अगदी थोड्या प्रसंगी कोणत्याही इतर कालगणनेचा उल्लेख न करता, केवळ स्वतःच्या राज्याभिषेकापासून वर्षसंख्या मोजून कालनिर्देश केलेला आढळतो. पण भारतातील मुस्लिम राज्यकर्त्यांतील मोगल राजपुरुषांपैकी बाबर व हुमायून सोडून उर्वरित सर्वांनी आपल्या कागदपत्रांत कालनिर्देशासाठी सामान्यतः केवळ स्वतःच्या राज्याभिषेक वर्षाचा व क्वचित त्याच्या जोडीने हिजरी किंवा इलाही वर्षाचा उल्लेख केला आहे. त्यातही अकबर व जहांगीर यांची राज्याभिषेक वर्षे सौर असल्याने ती इसवी वर्षाच्या एका विशिष्ट तारखेस चालू होतात. प्रतिवर्षी त्याच त्या तारखेस नवीन वर्ष चालू होते. पण पुढील राज्यकर्त्यांनी चांद्र वर्ष स्वीकारल्याने त्यांचे शक किंवा इसवी वर्षात रूपांतर करणे कोष्टकांच्या साह्याने आकडेमोड केल्याशिवाय शक्य होत नाही. तथापि आकडेमोडीने का होईना जुलूस वर्षाचे इष्ट कालगणनेत रूपांतर करता यावे, म्हणून प्रत्येक मोगल बादशाहाच्या पहिल्या जुलूसचा प्रारंभ हिजरी कालाने कोणत्या दिवशी झाला ते येथे दिले आहे :
तुर्की द्वावशवर्षचक्र व चिनी षष्टिवर्षचक्र : नैर्ऋत्य आशियामध्ये इस्लाम धर्माची स्थापना झाल्यानंतर तद्धर्मीय राजांनी धर्मविषयक उत्साहातिरेकाने हिजरी कालगणनेचा राज्यकारभारात उपयोग करण्यास सुरूवात केली. परंतु ती कालगणना चांद्रमानाची असून पिके व त्यापासून येणारा वसूल हा सौर मानावर अवलंबून असल्यामुळे हिजरी कालगणना विशेषतः आर्थिक कारभारात एकसारखी गैरसोयीची वाटू लागली. म्हणून आर्थिक कारभाराच्या सोयीसाठी बहुतेक सर्व मुसलमानी देशांत सत्ताधारी कोणत्या ना कोणत्या रूपांत सौर कालगणना उपयोगात आणू लागले. त्यांपैकी तुर्की द्वादशवर्षचक्र हे एक आहे. यास सनवात-इ-तुर्की, मुचल, दुवा-इदह साल-इ-तुर्की किंवा अय्घूरीसनह अशी नावे असून यांत सौर बारा वर्षांचे एक चक्र मानले आहे. यातील प्रत्येक नवीन वर्ष सूर्याच्या मेष राशीत प्रवेश करण्याच्या वेळी सुरू होत असावे, म्हणून याचा प्रत्येक वर्षाचा आरंभदिन जुन्या पद्धतीने १२ किंवा नव्या पद्धतीने २२ मार्चला पडतो. यातील प्रत्येक वर्षास एका प्राण्याचे नाव दिले असून त्या प्राणिनामापुढे ईल हा तुर्की वर्षदर्शक शद्ब येतो. ही १२ प्राणिनामे अशी : (१) उंदीर, (२) गाय किंवा बैल, (३) चित्ता किंवा वाघ, (४) ससा, (५) सुसर किंवा अजगर, (६) सर्प, (७) घोडा, (८) मेंढा किंवा बकरा, (९) वानर, (१०) पक्षी किंवा कोंबडा, (११) श्वान, (१२) डुक्कर. यांनाच तुर्की नावे : (१) सीच्कान्, (२) उद, (३) बार्स किंवा पार्स, (४) तविश्कान्, (५) लूई, (६) ईलान्, (७) यून्त, (८) कूई, (९) बीची, (१०) तखाकूई, (११) ईत, (१२) तन्गूझ किंवा तन्कूझ. या द्वादशवर्षचक्राचे स्वरूप काय आहे, हे नीट न समजल्यामुळे मराठी-मोडी व फार्सी पत्रांच्या वाचकांनी अनेक प्रकारच्या चुका केल्या आहेत. या वर्षगणनेत महिने कोणत्या प्रकारचे वापरत होते हे आज समजत नाही, पण मूळ पत्रात आलेल्या उल्लेखांवरून असे दिसते की, याचे प्रथम खरीफ व रबी असे, प्रत्येकी सहा महिन्यांचे दोन भाग करीत आणि या प्रत्येक भागाचे पुन्हा सहा भाग कल्पून तसा निर्देश करीत.
हे द्वादशवर्षचक्र मूलतः चीनमधील आहे. पण तेथे आणि चिनी संस्कृतीचा पगडा ज्या देशांवर आहे, तेथे या द्वादशवर्षचक्राशी अग्नी, पृथ्वी, धातू, जल आणि काष्ठ या चिनी पंचतत्त्वांची सांगड घालून साठ वर्षांचे चक्र बनविले गेले. त्याचा अतिपूर्वेकडील अनेक देशांत वापर चालू आहे. उदा., या दोन वर्षचक्रांपैकी कोणते तरी वर्षचक्र भारतात मोगल रियासतीच्या मोडी आणि फार्सी पत्रव्यवहारात चालू होते व तुर्कस्तान, पूर्व तुर्कस्तान, चीन, मंगोलिया, ख्मेर प्रजासत्ताक, व्हिएटनाम, लाओस, थायलंड, जपान इ. देशांत आजही कमी अधिक प्रमाणांत चालू आहे. याचे इसवी वर्षांशी जुळणारे या चक्रातील वर्ष पाहिजे असल्यास इसवी वर्ष संख्येस ६० या संख्येने भागावे आणि उरलेल्या संख्येसमोरचे नाव हे त्या वर्षाचे नाव खालीलप्रमाणे समजावे.
नेवार (नेपाळ) : हा दुसऱ्या ठाकुरी वंशातील राजा जयदेवमल्ल किंवा पहिल्या ठाकुरी वंशांतील राजा राघवदेव याने सुरू केला, अशी दोन मते आहेत. पण पुराव्याचा विचार करता दुसरे मतच ग्राह्य धरले पाहिजे. याच्या पुराव्यांत शक ८११ (८८९) श्रावण शुद्ध ७ ला नेवार शक ९ होता असे सांगितले आहे. अर्थात दोहोंतील अंतर ८०२ येते. नेपाळात मिळालेल्या नवरत्नम् नावाच्या ग्रंथाच्या शेवटी शक १६०७ मार्गशीर्ष वद्य ८, मघा, सोमवार या तपशीलाच्या जोडीने नेपाळ संवत् ८०६ दिला आहे. या हिशेबाने शक–नेपाळ = ८०१ अंतर येते. परंतु डॉ. कीलहॉर्न यांनी नेपाळ संवताच्या सर्व उल्लेखांचा विचार करून असे ठरविले आहे की, याचा आरंभ २० ऑक्टोबर ८७९ अथवा शक ८०१ कार्तिक शुद्ध १ पासून झाला असला पाहिजे. अर्थात गत नेपाळ वर्षात ८७८–७९ मिळविले असता इसवी सन येईल. याचे वर्ष प्रायः गत असून महिने अमान्त असतात. नेपाळात प्रथम गुप्तकाल, नंतर हर्षकाल व त्यामागून प्रस्तुतचा नेपाळ काल प्रचलित होता आणि तेथे १७६८ मध्ये गुरख्यांचे राज्य झाल्यापासून शक काल चालू झाला, पण पुस्तक–लेखक अजूनही याचा उपयोग करतात. याचा लेखात आलेला सर्वप्रथम निर्देश २०३ या वर्षाचा व शेवटचा उल्लेख ९५८ या वर्षाचा आहे. याच्या निर्देशांत कधी नेपाळ शब्द असतो व कधी नसतो, असेही आढळून आले आहे.
पर्गनाती : हा बंगालमधील पूर्वेकडील जिल्हे व पूर्व बंगाल यांत चालू होता. याचा निर्देश अगदी सामान्य व्यवहाराच्याही कायदेशीर कागदांवर येतो. कधी एकाकी तर कधी बंगाली किंवा शक कालाच्या जोडीने येतो. याचे सर्व निर्देश तपासले, तर हा काल ११२४ सौर कार्तिक किंवा तुला संक्रांत = २८ सप्टेंबर १२०२ या दिवशी चालू झाला असे ठरते. याचे महिने सौर म्हणजे संक्रांतीपासून चालू होतात. यांत अर्थात अधिक व क्षय महिने आणि शुद्ध व वद्य पक्ष् नाहीत. यांतील तिथी गणिताप्रमाणे १ ते २९, ३०, ३१, ३२ पर्यंत असतात. या कालाचे नाव पर्गनाह या शद्बावरून बनले आहे तेव्हा हा काल बंगालमध्ये मुसलमानांच्या सत्तासंपादनानंतर चालू झाला असावा.
पुदुवैप्पु : १३४१ मध्ये कोचीनच्या उत्तर भागात सु. २१ किमी. लांब व १.६२ किमी. रुंद एवढा भूभाग समुद्रातून वर आला, त्यास विपिन म्हणतात. या घटनेच्या स्मरणार्थ हा काल चालू केला होता. पुदुवैप्पु याचा अर्थ नवीन वस्ती असा आहे. कोचीनचे राज्य व डच ईस्ट इंडिया कंपनी यांमध्ये झालेल्या तहाची मिती त्याच्या ताम्रपट प्रतीत पुदुवैप्पु संवत् ३२२ मीनम् १४ (२२ मार्च १६६३) अशी दिली आहे. सध्या हा कोठे प्रचलित असल्याचे दिसत नाही. पूर्वी कोचीन राज्यात थोडा प्रचलित होता.
फसली : मुसलमानी राज्यकर्त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने आर्थिक राज्यकारभारात हिजरी या चांद्र कालगणनेचा त्याग करून सौर कालगणना स्वीकारावी लागली. त्यापैकी फसली ही एक आहे. फसल् याचा अर्थ पिकांचा हंगाम, अर्थात या नावावरूनच हे सौर वर्ष आहे हे स्पष्ट होते. हे कोणी सुरू केले याविषयी फार मोठे मतभेद आहेत. ग्रॅंट डफ, प्रिन्सेप, कावसजी पटेल, दीक्षित, सीवेल, यूल, बर्नेल, गौरीशंकर ओझा, जगनलाल गुप्त इत्यादींनी या कालगणनेविषयी निरनिराळ्या प्रकारची आणि क्वचित एकमेकांशी विरोधी माहिती दिली आहे. परंतु मूळ कागदपत्र पाहिले, तर फ. १०२२ वर्षांपूर्वीचा फसली सनाचा उल्लेख अद्याप आढळलेला नाही. या वर्षाचे यापुढील जे उल्लेख आढळतात, त्यांचा विचार केला तर असे दिसते की, याच्या पहिल्या वर्षाचा आरंभही ९६२ मोहरम १ या दिवशी झाला असे धरले असावे. त्यावर्षी फसली सनाचेही ९६२ हेच वर्ष सुरू झाल्याचे मानले असावे. पुढेही १०४४ मध्ये शाहाजहाननेही दक्षिणेतील काही प्रदेश जिंकला. तेव्हा तेथे हिजरी १०४४ म्हणजेच १०४४ असे धरून दक्षिणेत फसली कालगणनेस प्रारंभ केला. येथपर्यंत जुन्या फसली कालगणनेची १०४२ वर्षे झाली होती. यामुळे उत्तरेतील फसली व दक्षिणेतील फसली यांमध्ये दोन वर्षांचे अंतर पडले आहे किंवा दक्षिणेतील फसली काल उत्तरेतील फसलीहून दोन वर्षांनी मोठा आहे. हे सौर वर्ष असल्यामुळे दक्षिणी फसलीचे इसवीत रूपांतर करण्यासाठी त्यात ५९०–९१ वर्षे मिळवावी लागतात. उलट उत्तरी फसलीमध्ये ५९२–९३ वर्षे मिळवावी लागतात. फसली व शुहूर यांचा आरंभ सूर्य मृगनक्षत्रात ज्या दिवशी शिरतो, त्या दिवसापासून धरला आहे. यामुळे एकाच फसली वर्षात दोन इसवी वर्षे येतात. या कालगणनेचा उल्लेख मुख्यतः मोगलांची सत्ता दक्षिणेत स्थापन झाल्यावर त्यांच कागदपत्रांत केलेला आढळतो. येथील मोगल राज्य संपले, तरी निजामाच्या राज्यात ही कालगणना चालू होती. तेथे हिचा वर्षारंभ १ ऑक्टोबर या दिवशी धरत व इंग्रजी महिन्यांना आजूरपासून सुरू होणाऱ्या फार्सी महिन्यांची नावे देऊन इसवी वर्षाशी मेळ घालीत.
बंगाली = अमली.
बार्हस्पत्य वर्षचक्र : (१) याचा संबंध गुरूच्या गतीशी असल्यामुळे यास हे नाव पडले आहे. याचे दोन प्रकार आहेत : (अ) द्वादशवार्षिक व (आ) षष्टिवार्षिक. याचे वर्ष गुरूच्या एका उदयापासून दुसऱ्या उदयापर्यंत धरले जाते. म्हणजे यात सु. ४०० दिवस असतात. यामुळे याचे वर्ष सौर वर्षाहून सु. ३५ दिवसांनी मोठे होते. म्हणून बारा सौर वर्षांत याची अदमासे अकरा वर्षे होतात. पण याचा सौर वर्षाशी मेळ घालणे आवश्यक होते. म्हणून या वर्षचक्राला संवत्सरांची नावे देतांना सु. १२ वर्षांत एक वर्ष म्हणजे एका संवत्सराचे नाव गाळतात. या चक्राचा आरंभ बहुधा महाकार्तिकापासून होत असावा. पण हे सर्व विवेचन गणितागत प्रकारचे आहे. ढोबळ किंवा मध्यमान प्रकारांत बारा वर्षांस बारा नावे देऊन हे चक्र पुरे करतात व तेराव्या वर्षी नवीन चक्र चालू होते.
या संवताच्या वर्षांस १ महाकार्तिक, २ महामार्गशीर्ष, ३ महापौष, ४ महामाघ, ५ महाफाल्गुन, ६ महाचैत्र, ७ महावैशाख, ८ महाज्येष्ठ, ९ महाआषाढ, १० महाश्रावण, ११ महाभाद्रपद, १२ महाआश्विन अशी किंवा क्वचित नुसती कार्तिकादी नावे दिलेली आढळतात.
६०० पर्यंतच्या प्राचीन लेखांत या संवत्सरनामांचा निर्देश आढळतो. पुढे तो प्रायः लुप्त झाला. सध्या उत्तरेतील काही पंचांगांत मात्र याचा निर्देश केलेला असतो.
(२) या कालगणनेचा दुसरा प्रकार साठ वर्षांच्या चक्राचा आहे. या चक्रातील प्रत्येक वर्षाला एक-एक नाव आहे. त्यास संवत्सर म्हणतात. गुरूला एका राशीचे अंतर तोडण्यास जो काळ लागतो तोच याच्या चक्रातील एका वर्षाचा काळ. सूर्यसिद्धांताप्रमाणे एक सौर वर्ष ३६५.२५८७ दिवसांचे आणि एक बार्हस्पत्य वर्ष ३६१.०२६७ दिवसांचे असते. अर्थात कोणत्याही एका वेळी ही दोन्ही वर्षे एकदम चालू झाली तर ८५ किंवा ८६ वर्षांनी असे सौर वर्ष येईल की, त्याच्या आरंभी अगदी संपत आलेले बार्हस्पत्य वर्ष असेल नंतर दोन-तीन दिवसांत नवीन बार्हस्पत्य वर्ष सुरू होईल आणि ते सौर वर्ष संपण्यापूर्वीच प्रत्येक ८५–८६ वर्षांनंतर एका संवत्सर नामाचा क्षय होतो, असे मानून ते गाळण्याची प्रथा चालू झाली. उदा., गत शक १७७८ च्या आरंभी प्रभव नावाचे बार्हस्पत्य संवत्सर सुरू होते. ३.३ दिवसांनी हे संवत्सर संपून विभव नावाचे बार्हस्पत्य वर्ष लागले. हे सौर वर्षारंभापासून ३६४.३ दिवसांनी संपले व शुक्ल नावाचे बार्हस्पत्य वर्ष चालू झाले, याचा अर्थ असा की, गत शक १७७८ सुरू होतांना प्रभव संवत्सर होते आणि गतशक १७७९ सुरू होताना शुक्ल संवत्सर चालू होते. अर्थात विभव संवत्सराचा क्षय झाला मानले पाहिजे.
प्रथम प्रथम उत्तरेत निरपवाद व दक्षिणेत विकल्पाने क्षय संवत्सर मानण्याची पद्धती होती, पण पुढे दक्षिणेत श. ८३० च्या सुमारास ती पद्धती लुप्त होऊन उत्तरेत मात्र चालू राहिली. यामुळे उत्तरेतील संवत्सरनामे व दक्षिणेतील संवत्सरनामे एकमेकांशी जुळत नाहीत. उत्तरेत कोणत्या वर्षी कोणते संवत्सर क्षय धरले गेले, हे सांगणे इतके सोपे नाही. आपल्याकडे निरनिराळ्या वेळी प्रथम आर्य, द्वितीय आर्य, ब्रह्म, मूळ सूर्य, बीज रहित सूर्य, सबीज सूर्य व सिद्धांतशिरोमणी हे सिद्धांत व त्यांत दिलेली स्पष्ट व मध्यम माने यांचा प्रचार असल्यामुळे कोणी, कोणत्या वेळी, कोणता सिद्धांत आणि कोणते मान वापरले यावर ते अवलंबून आहे. साठ संवत्सरांची नावे अशी : (१) प्रभव, (२) विभव, (३) शुक्ल, (४) प्रमोद-दूत, (५) प्रजापती, (६) अंगिरा, (७) श्रीमुख (८) भाव-वा, (९) युवा, (१०) धाता, (११) ईश्वर, (१२) बहुधान्य, (१३)प्रमाथी, (१४) विक्रम, (१५) वृष-भ, (१६) चित्रभानू, (१७) सुभानू, (१८) तारण, (१९) पार्थिव, (२०) व्यय, (२१) सर्वजित्, (२२) सर्वधारी, (२३) विरोधी, (२४) विकृति, (२५) खर, (२६) नंदन, (२७) विजय, (२८) जय, (२९) मन्मथ, (३०) दुर्मुख, (३१) हेमलंब-बी, (३२) विलंब-बी, (३३) विकारी, (३४) शार्वरी, (३५) प्लव, (३६) शुभकृत, (३७) शोभन,(३८) क्रोधी, (३९) विश्वावसु, (४०) पराभव, (४१) प्लवंग, (४२) कीलक, (४३) सौम्य, (४४) साधारण, (४५) विरोधकृत, (४६) परिधावी, (४७) प्रमादी-च, (४८) आनंद, (४९) राक्षस, (५०) नल, अनल, (५१) पिंगल, (५२) कालमुक्ताक्ष, (५३) सिद्धार्थी, (५४) रौद्र, (५५) दुर्मती, (५६) दुंदुभी, (५७) रूधिरोद्गारी, (५८) रक्ताक्ष, (५९) क्रोधन, मन्यु व (६०) क्षय.
बुद्धनिर्वाण : बुद्धाच्या निर्वाणापासून हा काल सुरू झाला असे समजतात. हा बौद्ध ग्रंथ व शिलालेख यांत निर्देशिलेला आढळतो. पण बुद्धनिर्वाण इसवी सनापूर्वी केव्हा झाले, यासंबंधी विद्वानांत मतभेद असल्याने याच्या आरंभवर्षांविषयीही मतभेद आहे. श्रीलंका, ब्रह्मदेश, थायलंड या देशांत यासंबंधी भिन्न मते आहेत.खुद्द भारतात आसामचे राजगुरू (५४४), डॉ. भगवानलाल इंद्रजी व चिनी लोक (६३८), चिनी प्रवासी फाहियान (सु. १०९७), यूआन च्वांग (सु. ३५०), डॉ. ब्यूलर (४८३–२), आणि ४७२–१ यांमध्ये केव्हा तरी, कर्न (३८८), फर्ग्युसन (४८१), कनिंगहॅम (४७८), मॅक्सम्यूलर व मिस डफ (४८२) आणि स्मिथ (४८७ अगर ४८६) या इसवीपूर्व वर्षी बुद्धनिर्वाण झाले असे समजतात. बुद्धनिर्वाण कालाचा उल्लेख असणारा आजवर एकच लेख सापडला असून त्यातही कालनिश्चिती नसल्यामुळे निर्वाणकाल निश्र्चित होऊ शकत नाही. इ. स. पू. ४८७ हे साल त्यातल्या त्यांत गृहीत धरले आहे, पण श्रीलंकेतील मताप्रमाणे निर्वाणकाल इ. स. पू . ५४४ धरला जातो.
भाटिक : या कालाचे अनेक लेख राजस्थानातील पूर्वीच्या जैसलमीर संस्थानात वैष्णव व शैव मंदिरांत सापडले आहेत. त्यांपैकी काही नंतरच्या लेखांत भाटिक कालाबरोबर विक्रम व शक कालाचेही संवत् दिले आहेत. त्यांवरून भाटिक संवत् इ. स. ६२४ मध्ये स्थापिला होता असे दिसते. वर्तमान भाटिक संवत्सरात ६२३ –२४ आणि गत संवत्सरात ६२४–२५ मिळविले म्हणजे इ. स. चे वर्ष येते. या संवताचे ४८ लेख ५३४ (इ. स. ११५६-५८) ते १०७८ (इ. स. १७०२-३) पर्यंत जैसलमीर संस्थानात सापडले आहेत. त्याचा संस्थापक कोणी भट्टि किंवा भट्टिक (भाटी) असावा. प्रतीहारांच्या लेखात भट्टिवंशीय राजांचा उल्लेख येतो.
मगी : हा बंगाली सनाप्रमाणेच आहे. पण अंतर इतकेच की, हा तदनंतर ४५ वर्षांनी सुरू झाला असे समजतात. यामुळे यांत ६३८–६३९ मिळविल्याने इसवी सन येतो. याचा प्रचार बांगला देशातील चितगाव जिल्ह्यात आहे. याला हे नाव का मिळाले याचे कारण नीट समजत नाही. पण इसवीच्या नवव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत चितगावच्या आसपासचे प्रदेशावर आराकानी किंवा मगी राजांचा अंमल असल्यामुळे यास कदाचित मगी हे नाव पडले असेल.
मव्लूदी : ही कालगणना टिपूने चालू केली असून, तीमध्ये हिंदू कालगणना पद्धती व टिपूच्या कल्पना यांचे मिश्रण आहे. तो हि. ११९७ जमादिलाखर, (४ मे १७८३) या दिवशी गादीवर बसला. तेव्हापासून त्याने आपला जुलूस (राज्याभिषेक वर्ष) चालू केला, पण त्यावर्षी ६० संवत्सराच्या चक्रांपैकी ३७ वे शोभन संवत्सर वर्ष चालू होते. त्या संवत्सर संख्येचे नाव त्याने आपल्या जुलूस वर्षाला दिले व हिंदू महिने घेऊन त्यांनाही आपल्या पद्धतीची नावे दिली. ११९७ ते १२०० या हिजरी वर्षाशी जुळणारी संवत्सर वर्षे ३७ ते ४० होत. या संख्या दाखविण्यासाठी अब्जद् (हिब्रू वर्णक्रम) पद्धतीचे शब्द तयार केले व महिने दाखविण्यासाठी ज्यांचे आद्य वर्ण चैत्रादी महिन्यांचा संख्याक्रम दाखवितील अशी नावे तयार केली. पुढे हिजरी १२०० मध्ये त्याच्या मनाने घेतले की, हिजरीकालगणना मुहम्मद पैगंबराच्या मक्केहून मदीनेस पळून जाण्याच्या वर्षापासून चालू होत असल्यामुळे, ती वापरणे नामुष्कीचे आहे. म्हणून त्याने तिचा त्याग केला व मुहम्मदाचे जन्मवर्ष इसवी ५७२ असे कल्पून तेव्हापासून नवी मब्लूदी नावाची कालगणना चालू केली. मब्लूदी शब्दाचा अर्थ जन्मसंबंधी (कालगणना) असा आहे. हिजरी १२९९ (१७८६) पर्यंत त्या कालगणनेची चांद्र-सौर मानाची १२१४ वर्षे होतात. तेव्हा हिजरी १२०० नंतर त्याने या कालगणनेचे १२१५ वे वर्ष चालू झाले असे धरले. मात्र जुलूससाठी पूर्वीचीच संवत्सर संख्या तो धरत गेला. या वेळी त्याने आणखी एक फरक केला. या वेळेपर्यंत त्याने अब्जद् पद्धत सोडून देऊन अरबी वर्णमालेवर आधारलेल्या अब्तस् पद्धतीने जुलूस वर्ष व महिने दाखविण्यास सुरूवात केली. शिवाय मव्लूदी १२२४ ते १२२७ या चार सालांसाठी अलिफ्, बे, ते, से असे चार वर्णही आपल्या नाण्यांवर उपयोगात आणले. टिपूने केलेले हे सर्व उपक्रम त्याची नाणी आणि त्याचे फार्सी व मराठी-मोडी या दोन भाषा व लिपी यांमध्ये लिहिलेले कागद यांत दिसून येतात.
मौर्य : खारवेलच्या हाथीगुंफा लेखांतच काय तो याचा उल्लेख असून तोही खरोखर कालोल्लेख आहे की नाही याविषयी मतभेद आहेत. तेथे मुरियकाल १६५ असा निर्देश असल्यास तो काल बहुधा चंद्रगुप्ताच्या राज्याधिष्ठानापासून चालू झाला असे धरले पाहिजे. चंद्रगुप्तमौर्याचा राज्याभिषेक इ. स. पू. ३२१ च्या सुमारास झाला असल्याने या कालाचा आरंभही तेव्हाच झाला असे समजण्यास हरकत नाही. गोकाक येथे सापडलेल्या देज्ज महाराजाच्या ताम्रपटात आगुप्तायिक राजांच्या ८४५ व्या वर्षाचा उल्लेख आहे. तो मौर्यकालाचा असावा.
राज्याभिषेक : महाराष्ट्रावर अव्याहत ३००—३५० वर्षे राज्य करणाऱ्या निरनिराळ्या मुसलमानी सत्तांशी सु. ३० वर्षे झगडून शिवाजी महाराजांनी स्वतःचे आणि पर्यायाने मराठ्यांचे किंवा हिंदूंचे राज्य स्थापले, ते कोणत्याही संकटाची पर्वा न करता टिकेल, एवढेच नव्हे, तर वाढेल अशी खात्री पटल्यावर वस्तूस्थिती जगजाहीर करण्यासाठी त्यांनी स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि तत्स्मरणार्थ पारंपरिक माहितीप्रमाणे विक्रम, शालिवाहन, चालुक्य, विक्रमादित्य, अकबर इत्यादींच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतःचा राज्याभिषेक काल चालू केला. श. १५९६ आनंद संवत्सर ज्येष्ठ शुद्ध १३ या दिवशी हा राज्याभिषेक झाल्यामुळे, त्या दिवसापासून राज्याभिषेक वर्ष १ सुरू झाले. अर्थात हे वर्तमान वर्ष आहे हे उघड ठरले. याचे शतकांत रूपांतर करावयाचे असल्यास यांत ज्येष्ठ शुद्ध १३ पासून फाल्गुन वद्य ३० पर्यंत १५९५ व चैत्र शुद्ध १ ते ज्येष्ठ शुद्ध १२ पर्यंत १५९६ मिळवावे लागतात. याच्या प्रत्येक निर्देशात संवत्सराच्या नामाचाही समावेश होत असल्यामुळे याचे रूपांतर करण्यास अडचण पडत नाही. हा चालू करण्यामध्ये यापूर्वी लोक उपयोगात आणीत असलेल्या शुहूर, हिजरी वगैरे यावनी गणना मागे पडाव्या असाही हेतू असेल. पण तो मात्र सिद्धीस गेलेला दिसत नाहीत. शिवाजी महाराज निग्रही असल्यामुळे त्यांनी आपल्या हयातीपर्यंत गणनेचा प्रायः सर्वत्र प्रयोग केला. पण संभाजीपासूनच ती प्रथा सुटली आणि केवळ छत्रपतींनी दिलेली दानपत्रे, इनामपत्रे व तद्नंतर पेशवे वगैरे दुय्यम अधिकाऱ्यांना दिलेली संमतिपत्रे यांत मात्र ही गणना तग धरून राहिली. उपर्युक्त मर्यादेतही पेशव्यांचे राज्य जाऊन छत्रपती प्रतापसिंह पदच्युत होईपर्यंत कायम राहिली.
लक्ष्मणसेन : या कालाच्या आरंभाविषयी फार मतभेद आहेत. कीलहॉर्नने एक शिलालेख आणि पाच हस्तलिखिते यांतील लक्ष्मणसेन संवताच्या निर्देशाचे गणित करून असा निष्कर्ष काढला की, तो संवत् श. १०४१ कार्तिक शु. १ यावेळी झाला. म्हणून त्यात १११९ मिळविले म्हणजे इ. स. चे वर्ष येईल. अबुल फज्लच्या अकबर नाम्यातील उल्लेखावरून हाच आरंभकाल येतो.
पण या संवताच्या आरंभीच्या ५१, ७४ व ८३ या वर्षांच्या लेखात लक्ष्मणसेनस्यातीत राज्ये असा विचित्र उल्लेख येतो. यांपैकी पहिले दोन लेख अशोकचल्ल राजाचे बुद्धगया येथील आहेत. याच राजाचा तेथील आणखी एक लेख बुद्ध परिनिर्वाण संवताच्या १८१३ या वर्षाचा आहे (म्हणजे १२६९). लक्ष्मणसंवताचा आरंभ (११६९ मध्ये) व १२६९ मध्येही तो (म्हणजे १०० वर्षे) राज्य करीत होता, असे मानावे लागेल. बुद्धगयेतील तिसरा ८३ संवत्सराचा लेख बुद्धसेनाचा पुत्र जयसेन याचा आहे. बुद्धसेनाच्या कारकीर्दीत तिबेटी भिक्षू धर्मस्वामी १२३४ मध्ये बुद्धगयेस आला होता. लक्ष्मणसेन संवताचा आरंभ काल १११९मानला तर जयसेन १२०१ मध्ये म्हणजे आपल्या पित्याच्या अगोदरल ३३ वर्षे राज्य करीत होता, असे मानावे लागेल. म्हणून १११९ हा या संवताचा आरंभकाल होऊ शकत नाही.
वरील तीन मित्यांतील लक्ष्मणसेनेस्यातीत राज्ये या उल्लेखावरून असे दिसते की, हा संवत् लक्ष्मणसेनाच्या राज्यारंभापासून सुरू झाला नसून सन १२०० च्या सुमारास झालेल्या त्यांच्या राज्याच्या अंतापासून त्याची गणना करण्यात येत होती. मुसलमानांच्या राज्यस्थापनेनंतर त्यांच्या राज्याचा प्रवर्द्धमानविजयराज्ये असा कालनिर्देशाकिरता उल्लेख करणे बिहारातील हिंदू प्रजेला साहजिकच अप्रिय होते. म्हणून तिने शेवटच्या हिंदू राजाच्या (लक्ष्मणसेनाच्या) कारकीर्दीच्या अंतापासून कालगणना करण्यास सुरुवात केली, असे दिसते. लक्ष्मणसेनाचा जन्मकाल सन १११९ मध्ये कल्पून तो त्याच्या संवताचा आरंभकाल मानण्यात आला असे दिसते.
ही कालगणना बंगाल, मिथिला व बिहार यांमध्ये प्रचलित होती. आता फक्त मिथिलेत हिचा प्रसार आहे. तेथे तिचा आरंभदिन माघ शुक्ल प्रतिपदा हा धरतात.
विक्रम : या कालाचा प्रारंभ कलियुगाची ३,०४४ वर्षे क्रमल्यानंतर झाला, अशी कल्पना आहे. याच्या नव्या वर्षाचा आरंभ सध्या उत्तरेत चैत्र शुक्ल १ शुक्र १ (चैत्रादी) व दक्षिणेत कार्तिक शुद्ध १ (कार्तिकादी) या मितीस होत असला, तरी उत्तरेतील इ. स. बाराव्या शतकापर्यंतच्या लेखांत याचे कार्तिकादी निर्देश अधिकतर येतात, तर सोळाव्या शतकापर्यंतच्या लेखांत चैत्रादी निर्देश बहुसंख्य आहेत. चैत्रादी पद्धतीमुळे उत्तरी विक्रम संवत् दक्षिणेतील विक्रमसंवतापेक्षा सात महिने अगोदर सुरू होतो. शकात १३५ मिळविले असता चैत्रादी विक्रम आणि १३४ अगर १३५ मिळविले असता कार्तिकादी विक्रम येतो. या कालाचे दक्षिणेतील महिने अमान्त व उत्तरेतील पूर्णिमान्त आहेत. काठेवाड, गुजरात व राजस्थानचा काही भाग यांत या कालाचा आरंभ आषाढ शुद्ध १ पासून आणि उदेपूर इ. राजस्थानातील संस्थानांत तसेच राजकीय व्यवहारात हा संवत् पूर्णिमान्त श्रावण कृष्ण प्रतिपदेपासून धरतात. पैकी आषाढादी विक्रमाचे उल्लेख शिलालेख व जुने ग्रंथ यांतही आढळतात.
ही गणना प्रथम कोणी सुरू केली, तिचे उल्लेख कसे केले आहेत, तीस विक्रम नाव केव्हा व कसे मिळाले इ. प्रश्र्न विचारणीय आहेत. अकराव्या व बाराव्या शतकातील विक्रम संवत् निर्दिष्ट असलेल्या शेकडा १५ लेखांत या संवताशी विक्रम शब्दाची जोड दिली आहे. बाकीचे कालोल्लेख विक्रम शब्दविरहित आहेत. या कालाचा उल्लेख असलेले दहाव्या शतकातील ३४ लेख असून त्यांपैकी फक्त एकात विक्रमकाल असा स्पष्ट निर्देश व दुसऱ्यात मालवकाल असा पर्यायशब्द प्रयुक्त केला आहे. उरलेल्या लेखांत संवत् शब्दावरच काम भागविले आहे. विक्रमसंवताचे नवव्या शतकातील दहा लेख उपलब्ध असून त्यांपैकी फक्त एकात विक्रमाख्य काल असा स्पष्ट निर्देश आहे, बाकीच्यांत नाही. केवळ संवत् अथवा संवत्सर एवढाच उल्लेख आहे. आठव्या शताद्बीमधल्या काठेवाडातील एका ताम्रलेखत विक्रम संवत्सर असा निर्देश आहे. पण तो ताम्रपट बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. या पूर्वीच्या लेखात या संवताचा निर्देश निराळ्याच शब्दांनी केला आहे. उदा., कणस्वा येथील संवत् ७९५ च्या लेखांत मालवेशानाम् शब्दाने विक्रमसंवताचा निर्देश आहे. मंदसोर येथील संवत् ५८९, ४९३, व ४६१ च्या तीन लेखांत या संवताचा उल्लेख मालवगणस्थिति, मालवानां गणस्थित्या व मालवगणाम्नाते या शद्बांनी आणि नगरी येथील ४८१ च्या लेखात हाच अभिप्राय मालवपूर्वाया शद्बाने व्यक्त केला आहे. उपर्युक्त नगरी लेखात तसेच गंगधार (४८०), विजयगढ (४२८), बर्नाला (३३५, २८४), बडवा (२९५) आणि नांदसा (२८२) या गावी मिळालेल्या व कंसातील कालोल्लेख असलेल्या लेखांत या संवताचा निर्देश कृत या शब्दाने केला आहे. या सर्व निर्देशांवरून ध्यानात येईल की, या गणनेचे प्राचीनतम निर्देश कृत शब्दाने केले आहेत. जयपूर संस्थानातील नगर गावी मिळालेल्या काही नाण्यांवर मालवानां जयः असा लेख असून त्याचा काल इ. स. पू. २५० ते इ. स. २५० पर्यंत केव्हाही असू शकेल. इ. स. ६० च्या सुमारास शकांनी उज्जयिनी हस्तगत केली असता, त्यांना ती लवकर सोडावी लागली असे इतिहास सांगतो.
या सर्वांचा निष्कर्ष असा काढण्यात येतो की, इ. स. पू. ५७ या वर्षी मालव गणातील कृत नावाच्या महायोद्धयाने स्वपराक्रमाने शकांचा पराभव करून त्यांना उज्जयिनीतून हाकून लावले. या प्रसंगाच्या स्मरणार्थ हा काल सुरू करण्यात आला. यामुळे त्यास प्रथम कृत, नंतर मालव व अगदी अखेरीस विक्रम हे नाव मिळाले. त्याचे विक्रम हे नाव उज्जयिनी येथील द्वितीय चंद्रगुप्त-विक्रमादित्याच्या राजवटीच्या स्मरणामुळे दिले गेले असण्याची शक्यता आहे.
विलायती = अमली.
वीरनिर्वाण : तित्थोगाली पइन्नय, जिनसेनाचे हरिवंशपुराण, मेघनंदीचा श्रावकाचार, नेमिचंद्राचे तिलोयसार आणखी एका नेमिचंद्राचे महावीरचरिय, यतिवृषभाची तिलोयपण्णत्ति व स्थविरावली, जिनप्रभसुरीचा पावापुरीकल्प या सर्व ग्रंथांत आलेल्या माहितीचे सार असे की, महावीराच्या निर्वाणानंतर ६०५ वर्षे ५ महिने एवढ्या अवधीनंतर शक राजा झाला किंवा होणार आहे. मेरूतुंगाच्या विचारश्रेणित ग्रंथात वीरनिर्वाण आणि विक्रम या संवतांमधील अंतर ४७० वर्षे सांगितले ओहे. अर्थात शक वर्षात ६०५, विक्रम संवतात ४७० किंवा इसवी सनात ५२७ मिळविले म्हणजे वीरनिर्वाण संवत येतो. याचा प्रयोग मुख्यतः जैन ग्रंथांत आढळत असला, तरी कधी कधी शिलालेखांतही याचा निर्देश असतो.
शक : कलियुगाची ३,१७९ वर्षे झाल्यानंतर हा सुरू झाला असे सध्या समजतात. मलबार आणि तिनेवेल्ली सोडल्यास साऱ्या दक्षिणेत व अंशतः उत्तरेतही याचा प्रचार आहे. महाराष्ट्रात याची गतवर्षसंख्या व तमिळ प्रदेशात याचे चालू वर्ष सांगण्याचा प्रघात असल्यामुळे तमिळ प्रदेशातील याची वर्षसंख्या महाराष्ट्रातील वर्षसंख्येपेक्षा एक वर्षाने पुढे असते. उदा., महाराष्ट्रातील शक १८६९ ला तमिळ प्रदेशात १८७० म्हणतात. यामध्ये ७८ किंवा ७९ मिळविले म्हणजे इसवी सन येतो व १३४ किंवा १३५ मिळविले म्हणजे विक्रम संवत येतो. याचा आरंभ सामान्यतः चैत्र शुद्ध प्रतिपदेस होत असला, तरी केवळ सौर मास चालणाऱ्या प्रदेशांत याचा आरंभ मेषसंक्रांतीच्या आरंभापासून धरतात. दक्षिणेत याचे महिने अमान्त असले, तरी उत्तरेत पूर्णिमान्त असतात. असतात. दक्षिणेतील शिलालेख-ताम्रपट, पोथ्या-पुस्तके व कागदपत्र यांत प्रायः याचाच निर्देश आढळतो. एवढेच नव्हे तर पंचांगे तयार करणारे ज्योतिषी, करणग्रंथांत मुख्यतः याच्याच पायावर ग्रहगणिताची उभारणी करीत असल्याने, आपल्या पंचांगांत याचा उपयोग करतात. यामुळे उत्तरेतही याचा पुष्कळ प्रचार आहे. जन्मपत्रिका वर्षफले इत्यादींत याचा प्रयोग करतातच पण शेकडो उत्तरी ऐतिहासिक लेखांतही याचा निर्देश आहे. जुन्या साधनांत प्रायः याच्या गतवर्षाचा उल्लेख असतो, पण कधीकधी वर्तमान वर्षाचाही प्रयोग आढळतो.
हा काल कोणी, केव्हा व कसा सुरू केला, त्याचा शक, शकनृप् किंवा शालिवाहन यांशी संबंध केव्हा व कसा जोडला गेला इ. प्रश्न विचारणीय आहेत. या कालाचा शालिवहन राजाशी जोडलेला संबंध फार प्राचीन नाही, अशा संबंधाचा सर्वप्रथम उल्लेख यादववंशी कृष्ण राजाच्या शक ११७२ च्या दानपत्रात आणि नंतर विजयानगरच्या राजांच्या अनेक दानपत्रांत येतो. त्यापूर्वीच्या ताम्रशिलाशासनांत शक-शकनृप- शक-नृपति-काल-संवत्-वर्ष-वत्सर इ. प्रकारे या कालाचा निर्देश आढळतो. पैकी श. ५५६ व ५०० या काळातील बदामी चालुक्यांच्या लेखांत `शकानामपि भूभुंजा समासु’ व `शकनृपतिराज्याभिषेकसंवत्सरेषु’ असे उल्लेख आहेत. यापूर्वीच्या त्यांच्या श. ४६५ च्या लेखात शकवर्ष म्हटले आहे. त्या पूर्वीच्या कालनिर्देशाचे शकनृपती शद्बाशी संबंध असलेले सर्व लेख बनावट असल्यामुळे त्यांचा येथे विचार करता येत नाही. वराहमिहिराच्या पंचसिद्धांतिका ग्रंथांत ४२७ शककाल असा निर्देश आहे त्यावरून इ.स. ५०० पासून या पूर्वीचा असा एकही ग्रंथ किंवा लेख आढळत नाही की, जो प्रामाणिक असूनही ज्यातील निर्दिष्ट कालाशी शक-शकनृ शद्बांचा संबंध जोडला आहे. परंतु क्षत्रप, महाक्षत्र व कुशाण वंशीय राजे यांचे असे काही लेख व नाणी मिळतात की, ज्यांवर एका विशिष्ट कालगणनेचे नुसते आकडे (उ. नाण्यांवर) किंवा वर्ष शब्दासह आकडे घातले आहेत. प्रस्तुतचे आकडे राज्याभिषेक वर्षाचे नव्हेत, हे त्या निर्देशांतील संख्या ३ पासून ३१० पर्यंत वाढत गेल्या आहेत, यावरून स्पष्ट होते. हे सर्व आकडे एकाच विशिष्ट कालगणनेतील आहेत, असे धरले तरच सर्व लेख व नाणी यांचा मेळ बसतो. क्षत्रप व महाक्षत्रप हे शक होते, पण सार्वभौम नव्हते. तेव्हा त्यांनी हा काळ सुरू केला असणे संभवत नाही. उलट कुशाणवंशीय कनिष्क, हुविष्क व वासुदेव हेच महापराक्रमी असून सार्वभौमही होते. शिवाय त्यांचे अनुक्रमे ३ ते २४, २८ ते ६० व ७४ ते ९८ पर्यंतचे कालनिर्देश असणारे लेख सापडतात. या तिहींपैकी कनिष्क महाप्रतापी असून त्याच्याच लेखांत प्राचीनतम कालनिर्देश आहेत तेव्हा ही कालगणना कनिष्कानेच सुरू केली असावी. शक हे कुशाणांचे क्षत्रप किंवा प्रांताधिपती होते. त्यांनी दीर्घकाल या संवताचा उपयोग केल्यामुळे कालांतराने या गणनेस शककाल, शक-नृपतिकाल इ. नावे मिळाली. दक्षिणेतील लोकांनी शककालाचे नाते कोणत्या तरी देशी राजाशी जोडावे असे वाटून त्यांनी शालीवाहन राजाशी त्याचा संबंध जोडला असावा.
शुहूर : शुहूर कालगणनेचा आरंभ कोणी व केव्हा केला आणि त्या शद्बाला सौर हा अर्थ केव्हा प्राप्त झाला, हे आज तरी अज्ञात आहे. केवळ गणिताचा विचार करता त्याचा आरंभ हिजरी ७४४ च्या संगतीने झाला असे ठरते. त्यावर्षी शुहूर सनाचे ७४४ वर्ष धरले गेले आणि तेथपासून त्याला शुहूर हे नाव देऊन त्याचे सौर वर्ष चालू झाले, असा आज समज आहे. पण त्यापूर्वी शुहूर शब्द अस्तित्वात असून तो हिजरी कालगणनेस लावला जाई. महंमद तुघलकच्या नाण्यांवर हा शब्द आला आहे.
फसली व इतर सौर कालगणना प्रचारांत आल्या त्याप्रमाणेच शुहूर ही सौर कालगणनाही प्रचारात आली. फसली कालगणनेप्रमाणेच या कालगणनेचेही खानदेशी किंवा फारूकी व दक्षिणी असे दोन भेद झाले. खानदेशात या कालाचा आरंभ हिजरी ८११ या वर्षी झाल्याचे समजून या वर्षी त्याचेही ८११ हेच वर्ष धरले असे दिसते. त्यामुळे खानदेशी शुहूर सन दक्षिणी शुहूर सनापेक्षा दोन वर्षांनी मोठा झालेला आहे. याच्या नवीन वर्षाचा आरंभ सूर्य मृगनक्षत्रात शिरतो, त्या दिवशी होतो असे धरतात. शुहूर हा काल सौर गणनेचा असल्यामुळे याचे इसवी सनात रूपांतर करणे सोपे आहे. दक्षिणी शुहूर मध्ये ५९९–६०० आणि खानदेशी शुहूर मध्ये ५९७–५९८ मिळविले असता इसवी वर्ष येते. दक्षिणेत विशेषतः महाराष्ट्रात मुसलमानी, शिवशाही व पेशवाई या काळांत कालगणनेचा एवढ्या मोठ्या प्रमाणात उपयोग केला गेला आहे की, तिने शक, राज्याभिषेक शक, विक्रमसंवत् फसली इ. सर्व कालगणनांना ग्रासून टाकले होते. या कालगणनेंचा कधी कधी शक, राज्याभिषेक शक, फसली इत्यादींच्या संगतीने निर्देश केलेला आढळतो.
सप्तर्षी : याचा सप्तर्षीशी लावलेला संबंध, शतकाचे आकडे सोडून फक्त शेवटचे दोन आकडे लिहिण्याची पद्धत, ज्योतिषशास्त्रात येणारे याचे उल्लेख, काश्मीर आणि पंजाबातील पहाडी मुलूख यांत याचा असलेला प्रचार इ. कारणांवरून यास सप्तर्षी, लौकिक, शास्त्र, पहाडी किंवा कच्चा संवत् अगर काल अशी नावे मिळाली आहेत. भागवत, विष्णु इ. पुराणे व बृहत्संहितादी ग्रंथ यांत अशी कल्पना सांगितली आहे की, आकाशातील सप्तर्षी तारकांपुंज एकेका नक्षत्रात एकेक शतक राहून २,७०० वर्षांत एक नक्षत्रचक्र पुरे करतो व दुसऱ्या चक्रास सुरुवात होते. वस्तुतः सप्तर्षींना अशा प्रकारची गती नाही हे कमलाकारभट्टादी कित्येक जुन्या विद्वानांनी नमूद करून ठेविले असले, तरी या कालाचा प्रचार अजूनही चालू आहे. व्यवहारात विशिष्ट चक्रातील कितवे वर्ष चालू आहे एवढेच नमूद करीत असले, तरी या ग्रंथांत विशेषतः उत्तरीय पंचांगात याची आरंभापासून विशिष्ट कालापर्यंत किती वर्षे झाली, हे सांगण्याचा प्रघात आहे. काश्मीरमध्ये याचा प्रारंभ कलियुग संवतानंतर २५ वर्षांनी झाला असे मानीत असले, तरी पुराण व ज्योतिष ग्रंथांत याची सुरुवात कलियुग संवतापूर्वी झाली असल्याचे सांगितले आहे. विक्रमसंवत् १८५० च्या पंचांगांत वि. सं. १८५०, शक १७१५ आणि सप्तर्षी संवत् ४८९६ असे आकडे दिले आहेत. अर्थात सप्तर्षी संवतातून ३,१५४ उणे केले असता शक वर्ष येते. सप्तर्षी संवताचे फक्त दोनच आकडे सांगितले असल्यास त्यांतून ५४ उणे केले किंवा ४६ मिळविले म्हणजे शकाचे दोन किंवा तीन आकडे मिळतील. उ.सै.(चंबा पंजाब)येथे मिळालेल्या लेखांत कलियुग ४२७० व शास्त्र वर्ष ४५ असे उल्लेख आहेत. ४२७०-३१७९= १०९१ शक आणि ४५ मधून ५४ उणे केले किंवा त्यात ४६ मिळविले म्हणजे तत्कालीन शक वर्षाचे शेवटचे दोन आकडे ९१ येतात, याचा वर्षारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेस होतो व याचे महिने पूर्णिमान्त असतात. याचे वर्ष बहुधा वर्तमान व क्वचित गत असते. हल्ली याचा प्रचार काश्मीर व त्याचा आसपासचा डोंगराळ प्रदेश यांतच आणि तोही ज्योतिषशास्त्रात आढळतो. अल् बीरुनीच्यावेळी याचा प्रचार मुलतानपर्यत झाला होता असे दिसते. याकालाचा उल्लेख असलेले लेख काश्मीर, चंबा व मंडी ही संस्थाने आणि पंजाबातील कांग्रा जिल्हा यांत सापडले आहेत.
सिंह : हा संवत् कोणी चालू केला याचा नीट पत्ता लागत नाही. त्याविषयी केलेल्या कल्पना तर्कशुद्ध नाहीत. फार तर एवढेच निश्चयाने म्हणता येईल की, कोणी तरी सिंह नामधारी राजाने हा सुरू केला. हा काल व त्याच्या जोडीने इतर काल यांचा निर्देश करणारे फक्त चार लेख मिळाले असले, तरी एकातील निर्देशात काही तरी चूक झाली असल्यामुळे तो निकामी झाला आहे. उरलेल्या तीन लेखांत अनुक्रमे विक्रम १२०२ व सिंह ३२… आश्विन वद्य १३ सोमवार विक्रम १२६६ व सिंह ९६ मार्गशीष शुद्ध १४ गुरुवार आणि विक्रम १३२०,हिजरी ६६२, वलभी ९४५ व सिंह १५१ आषाढ वद्य १३ रविवार असे उल्लेख आले आहेत. तिसऱ्या निर्देशातील विक्रम वर्ष कार्तिकादी धरले तर चैत्रादी किंवा आषाढादी विक्रम १३२१ येईल आणि तिन्ही निर्देशांतील विक्रमकाल व सिंह वर्ष यामधील अंतर ११७० होईल. अर्थात सिंह वर्ण अधिक ११७० म्हणजे चैत्रादी विक्रम काल आणि सिंह वर्ष अधिक १०३५ म्हणजे शककाल येईल. याचा प्रारंभ आषाढ शुद्ध १ या दिवशी होत असावा. याचा प्रचार फक्त काठेवाडात आणि तोही थोड्या प्रमाणात होता. याचा निर्देश असलेले फक्त सात लेख उपलब्ध असून पैकी तिहींवर सिंह संवत् असा स्पष्ट निर्देशही नाही. याचा सर्वप्रथम निर्देश ३१ व्या वर्षाचा व अखेरचा १५१ व्या वर्षाचा आढळतो.
सिल्युसिडी : इ.स.पू.३२३ मध्ये अलेक्झांडर मरण पावल्यानंतर त्याच्या सेनापतींमध्ये अधिकाराविषयी भांडण झाले व सेल्युकस निकेटार याने सिरिया, बॅक्ट्रिया इ. पूर्वेकडील प्रदेशांत आपले राज्ये स्थापन केले. इ.स.पू. १ ऑक्टोबर ३१२ रोजी आपला स्वतंत्र काल चालू केला. हा बॅक्ट्रियात सुरू होता व तेथील ग्रीकांची सत्ता काबूल, पंजाब इ. प्रदेशांवर चालत असल्याने त्या प्रदेशांत उपर्युक्त कालाचा विचार झाला असणे सभंवनीय आहे. विदेशी सत्ताधाऱ्यांचे असे कित्येक खरोष्ठी लेख आहेत की, ज्यांत एका अनोळखी कालाचा उल्लेख असून सिल्युसिडी गणनेतील महिने निर्देशिले आहेत. अर्थात कालही विदेशी असला पाहिजे. मग तो सिल्युसिडी-पार्थियन किंवा आणखी कोणताही असेल.
हर्ष : हा ठाणेश्वर येथील वर्धन वंशी महापराक्रमी राजा श्रीहर्ष याने सुरू केला असे समजतात. पण ज्या लेखात या संवताचा निर्देश आहे असे म्हटले जाते, त्यापैकी एकातही हर्षाचे कालोल्लेखाशी नाव निगडित केल्याचे आढळत नाही असे असले तरी अल् बीरूनी विक्रमादित्यानंतर ६६४ वर्षांनी हर्ष झाला, असे आपण एका काश्मीरी पंचागांत वाचल्याचे सांगतो. नेपाळचा राजा अशुंवर्मन याच्या एका लेखात संवत् ३४ प्रथम पौष शुक्ल २ असा कालनिर्देश आला आहे. अल् बीरूनीच्या मताप्रमाणे वर्तमान विक्रम ६६४ किंवा इ.स. ६०६ मध्ये खरोखरच हर्ष शक सुरू झाला असे गृहीत धरुन उपर्युक्त कालनिर्देश हर्षकालाचा आहे असे मानले आणि ब्रह्मसिद्धांताप्रमाणे गणित करून पाहिले असता इ.स. ६४० मध्ये पौष मास अधिक पडतो असे दिसून आले. तेव्हा इ.स.६०६= ० हर्षकाल हे समीकरण बसले. अर्थात हर्ष कालात ६०६ मिळविले असता इसवी येतो हे उघड झाले. याचा सर्वप्रथम निर्देश एका लेखात संवत् २२ असा आला असून अखेरचा उल्लेख पंजौर लेखात संवत् ५६३ किंवा ५६२ असा केला आहे. तेव्हा साडेपाचशेहून थोडी अधिक वर्ष याचा उपयोग चालू होता असे दिसते. याचा प्रचार नेपाळ, उत्तरप्रदेश, पंजाब, बुंदेलखंड, बिहार, ओरिसा, राजस्थान, आंध्र व बंगाल एवढ्या मोठ्या प्रदेशात झाला होता असे त्या त्या प्रदेशांत मिळालेल्या लेखावरून म्हणता येते.
हिजरी: मुहम्मद पैगंबर मक्केहून मदीनेस पळून आला, त्या वर्षापासून हिजरी कालगणनेचा आरंभ झाला अशी समजूत आहे. ही कालगणना शुद्ध चांद्रमानाची आहे. म्हणजे याचे वर्ष ३५४ १/२ दिवसांचे आहे. या कालगणनेस धर्मदृष्ट्या कितीही महत्त्वाचे स्थान दिले गेले असले, तरी लोक–व्यवहारात त्यामुळे अडचण उत्पन्न झाली. जुन्या काळात कोणत्याही सत्तेचे मुख्य उत्पन्न जमीन महसुलांचे असे. जमीन महसूल पिकांवर अवलंबून, तर पिके सूर्याने उत्पन्न केलेल्या ऋतूंवर अवलंबून असतात. सौर वर्ष सु. ३६५ १/४ दिवसांचे आहे. यामुळे चांद्र वर्षाप्रमाणे ठरविलेले जमीन महसुलांचे दिवस, कधी पिके उभी असताना तर कधी पिके नुकतीच उगवत असताना येऊ लागले. यामुळे धान्यफलोत्पादकांच्या तक्रारी येऊ लागल्या. म्हणून प्रत्येक मुसलमानी देशांत जमीन महसुलाच्या कामासाठी कोणत्या तरी सौर कालगणनेचा उपायोग होऊ लागला. या सौर कालगणनेस भारतात अमली, इलाही, कटकी, तुर्की, पर्गनाती, फसली, बंगाली, मगी, विलायती, शुहूर इ. नावे मिळाली.
हिजरी वर्ष चांद्रमानाचे असल्यामुळे त्यावरून शक किवां इसवी वर्ष सहज काढता येत नाही. त्यासाठी आकडेमोड करावी लागते. त्यातून शकवर्ष चांद्रसौर किंवा भिन्न मानाचे असल्याने आणखी अडचण होते. त्यामानाने इसवी वर्ष शुद्ध सौर मानाचे असल्याने त्याची आकडेमोड सोपी आहे. उदा., कोणत्याही हिजरी वर्षाचे इसवी वर्षात रूपांतर करावयाचे असल्यास त्याच्या वर्षसंख्येत ६२१⋅५४ मिळवावे व दिलेल्या हिजरी वर्षाचा ३/१०० उणे करावा. उत्तर येईल ते दिलेल्या हिजरी वर्षाशी जुळते. इसवी वर्ष पाहिजे असल्यास १३१८ + ६२१⋅५४ = १९३९⋅५४ यातून उणे १३१८/१ X ३/१०० = ३९५४/१०० = ३९⋅५४ म्हणून १९३९⋅५४ – ३९⋅५४ = १९०० हे इसवी वर्ष आले. हीच आकडेमोड १३१८ + ६२१⋅५४ – ३९⋅५४= १९०० अशीही मांडता येईल, पण ही ढोबळ रीत झाली, ही वरून केवळ वर्ष काढता येते. महिना, दिवस काढावयाचे असल्यास हिजरी, वर्ष, महिने, दिवस यांना दशांशाचे रूप देऊन आलेल्या रूपास ९,७०,२२५ नी गुणावे व त्यात ६२१⋅५४ मिळवावे ते इसवी, वर्ष, महिने, दिवस समजावे. पण हीत एक अडचण आहे. मुसलमानी महिन्याचे दिवस ठरलेले नाहीत, ते महिने चांद्र असून त्यांचा आरंभ चंद्रदर्शनावर अवलंबून असतो, यामुळे एकाच महिन्याचे एके वर्षी २९ दिवस तर त्या महिन्याचे पुढील वर्षी ३० दिवस येऊ शकतील किंवा एका मागून एक-दोन महिन्यांचे प्रत्येकी २९किंवा ३० दिवस येऊ शकतील पण हिशेबाच्या सोयीसाठी ते ३०, २९, ३०, २९ असे धरतात तथापि यामुळे एखाद्या दिवसाचा फरक पडतो.
महिने,ऋतू,वार,तिथी इत्यादी : चैत्रादी चांद्र महिने प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पर्यायनामांचाही एक संच आहे. ही पर्यायनामे व ह्यांची सहज लक्षात न येणारी काही अपभ्रष्ट नावे जुन्या पोथ्या व ताम्रपटशिलालेख यात आढळतात. ती अशी : (१) चैत्र-मधु, (२) वैशाख-माधव, (३) ज्येष्ठ-श –शुक्र, (४)आषाढ-शुचि, (५)श्रावण-नभस, सावन, (६) भाद्रपद-नभस्य, प्रौष्ठपद, भादो, कौर (७) आश्विन-इष, आश्वयुज, असोज, कुवार, अशेअश, (८)कार्तिक, ऊर्ज, (९)मार्गशीर्ष-सहस्, अग्रयण,आग्रहायणिक, अगहन, अग्रण, (१०)पौष-सहस्य, तिष्य, (११) माघ-तपस, माह व १२ फाल्गुन-तपस्य, फागन. याशिवाय चांद्र व सौर वर्षांचा मेळ घालण्यासाठी सु. तीन वर्षांनी जो तेरावा महिना येतो, त्यास अधि, अधिक, प्रथम, मल अथवा धोंडा मास म्हणतात आणि त्यापुढील महिन्यास द्वितीय किंवा निज मास ही संज्ञा आहे. तमिळात सौर महिने चालू असताही काही ठिकाणी त्यास मेषादी राशींची आणि काही ठिकाणी अपभ्रष्ठ चैत्रादी नावे देतात, तर बंगालमध्ये एक महिना पुढची म्हणजे वैशाखादी नावे देतात.
ऋतू : दोन दोन महिन्यांचा एकेक ⇨ ऋतू होत असून त्याचीही परिचित व अपरिचित अशी दोन प्रकारची नावे हेत. ती अशी : (१) सत-चैत्र वैशाख, (२) ग्रीष्म-ज्येष्ठ-आषाढ, (३) वर्षा-श्रावण-भाद्रपद, (४)शरद-? आश्विन-कार्तिक (५) हेमंत-मार्गशीर्ष-पौष, (६) शिशिर-माघ-फाल्गुन.
वर ऋतूंची जी पर्यायनामे दिली आहेत, ती खरोखर महिन्याच्या पर्याय नामांच्या जोड्यांपैकी आद्यनामेच आहेत. पण त्यात दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ग्रीष्म ऋतूस शुची हे पर्यायनाम आहे. शुची हे सामान्यतः आषाढ महिन्याचे पर्यायनाम आले आहे. परंतु या काळी ऋतूंची प्रस्तुत पर्यायनामे प्रचारात आली, तेव्हा शुची हे ज्येष्ठ महिन्याचेही पर्यायनामे असावे. महाभारतात तशा अर्थाने याचा प्रयोगही केला आहे. तसेच शरदऋतूस इष हे पर्यायनाम यावयास पाहिजे. पण शरद ऋतूसाठी इष किंवा आणखी कोणतेही पर्यायनाम आढळले नाही. या पर्यायनामांचे अमरकोशात परिगणन नाही. हे प्रथम शाश्वतकोशात केलेले दिसते.
वार : हिंदू,हिंदी मुसलमान व यूरोपीय अशा तिन्ही संस्कृतींत वारांचा प्रचार आहे आणि तिन्ही संस्कृतींतील वारांची संख्या तर जुळतेच, पण हिंदू व यूरोपीय संस्कृतींतील वारांची नावेही जुळत असल्याने परस्परांत उसनवारी झाली असली पाहिजे हे उघड ठरते. सध्या ज्योतिर्विदांचा कयास असा आहे की, वार यूरोपीयांकडून हिंदुस्थानात आले. इराणी व अरबी संस्कृतींत ग्रहांवरून वारांची नावे न बनविता मुख्यतः एक दोन इ. आकड्यांनी तयार केली आहेत. तेव्हा असे वाटते की, त्या संस्कृतीत वारांचे बीज नीट रुजले नाही. गुप्त संवत् १६५ ( इ.स.४८४ – ८५ ) च्या एरण येथील स्तभंलेखात सुरगुरोर्दिवसेगुरुवार असा वारांचा सर्वप्रथम निर्देश आला आहे.
तिथी :हिंदू पद्धतीत महिन्याचे दिवस मोजण्याकरिता प्रथम त्याचे सारखे भाग किंवा पक्ष करुन त्यास अनुक्रमे शुद्ध, शुक्ल किंवा सित आणि वद्य, कृष्ण किंवा बहुल इ. नावे दिली. पुढे प्रत्येक पक्षातील १ ते १४ दिवसांस अनुक्रमे प्रतिपदा, द्वितीया इ. संख्याक्रमवाचक नावे ठेविली. शुद्ध पक्षातील पंधराव्या दिवसास पूर्णमासी, पौर्णिमा इ. नावे देऊन वद्य पक्षातील पंधरावे दिवशी चंद्र व सूर्य एकाच वेळी उगवून मावळत असल्याने अर्थात चंद्राचा सूर्याबरोबर(= अमा) वास होत असल्याने त्या दिवसास अमावासी हे नाव ठेवले [→तिथि ].
राशी : जुन्या साधनांतून ⇨राशींचा वारंवार उल्लेख येतो. त्यांना इंग्रजी,अरबी, फार्सी वगैरे भाषांमध्ये पर्यायी शब्द आहेत. मराठीमध्ये त्या अनुक्रमे मेष, वृषभ, मिथून, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ व मीन अशा परिचित आहेत. [→राशि].
नक्षत्रे : नक्षत्र म्हणजे आकाशाच्या साधारणतः पूर्वपश्चिम परिघावर एकामागून एक येणारे तारकापुंज. हे २७ आहेत अशी कल्पना केली आहे. त्याची नावे अनुक्रमे अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग-शीर्ष, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्व-फाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूल, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, शतभिषज्, पूर्वाभाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती होत.
योग : सूर्य आणि चंद्र यांच्या एकत्रित गतीच्या १३ अंश, २० कला इतक्या भागास योग हे नाव आहे. विष्कंभ, प्रीति, …ऐंद्र, वैधृती वगैरे २७ योग आहेत.
करण : करण म्हणजे अर्धी तिथी, अर्थात ३० तिथीची ६० करणे. पण त्या प्रत्येकास स्वंतत्र नाव नाही. सात करणांचे एक चक्र कल्पून अशी आठ पूर्ण चक्रे ३० तिथींत होतात आणि चार करणे शिल्लक राहतात [→ नक्षत्रे पंचाग].
कालदर्श : आतापर्यंत वर्णिलेल्या कालांचे एकसमयावच्छेदे व एका तुलनेने ज्ञान व्हावें, म्हणून सर्व कालांची यादी त्यांच्या इसवी सनाशी असलेल्या नात्यांसह पुढे देतो. जेथे केवळ महिना, नक्षत्र किंवा राशी यांचा निर्देश आहे, तेथे स्थानभेदानुसार त्यांचा आरंभ किंवा अंत असा अर्थ करावयाचा आहे आणि समतेच्या चिन्हापुढील आकडा मूळ कालसंख्येत मिळविला असता इसवी सन येतो असे दाखवितो.
(१) अमली : भाद्रपद शुद्ध १२ ते डिसेंबर= ५९२, जानेवारी ते भाद्रपद शुद्ध ११= ५९३.
(२) इलाही : मार्च १०–१२ ते डिसेंबर= १५५५, जानेवारी ते मार्च ९- ११= १५५६.
(३) कटकी = अमली.
(४) कलचुरी : कार्तिक ते डिसेंबर = २४८ जानेवारी ते आश्विन २४९.
(५) कलियुग : चैत्र मेष ते डिसेंबर = – ३१०१, जानेवारी ते फाल्गुन मीन = – ३१००.
(६) कोल्लम : सिंह–कन्या ते डिसेंबर ८२४ = जानेवारी ते कर्क सिंह = ८२५.
(७) गांगेय : चैत्र ते डिसेंबर = ४९४ जानेवारी ते फाल्गुन = ४९५
(८) गुप्त : चैत्र ते डिंसेबर = ३१९ जानेवारी ते फाल्गुन = ३२०.
(९) जव्हार : ज्येष्ठ शुद्ध १२ ते डिंसेबर = १३४२, जानेवारी ८ ते ज्येष्ठ शुद्ध ११ = १३४३.
(१०) नेवार : कार्तिक ते डिसेंबर= ८७८ जानेवारी ते आश्विन= ८७९.
(११) पर्गनाती : तुलासंक्रमणारंभ ते डिसेंबर= १२०७, जानेवारी ते कन्यासंक्रमणात = १२०८
(१२) पुदुवैप्पु : मेष ते डिसंबर= १३४०, जानेवारी ते मीन= १३४१.
(१३) फसली (उत्तरी) : सौर मृग ते डिसेंबर = ५९२, जानेवारी ते सौर रोहिणी = ५९३.
(१४) फसली (दक्षिणी): सौर मृग ते डिंसेबर = ५९०, जानेवारी ते सौर रोहिणी = ५९१.
(१५) बंगाली : मेष ते डिसेंबर = ५९३, जानेवारी ते मीन = ५९४.
(१६) बुद्धनिर्वाण : ४८७ (?)
(१७) भाटिक : चैत्र ते डिसेंबर = ६२३, जानेवारी ते फाल्गुन = ६२४.
(१८) मगी : मेघ ते डिसेंबर = ६३८, जानेवारी ते मीन = ६३९.
(१९) मव्लूदी :चैत्र = अहमदी ते डिसेंबर = ५७२, जानेवारी ते फाल्गुन = रब्बानी= ५७३.
(२०) मौर्य := – ३२० (?)
(२१) राज्याभिषेक : ज्येष्ठ शुद्ध १३ ते डिसेंबर=१६७३, जानेवारी ते ज्येष्ठ शुद्ध १२ = १६७४.
(२२) लक्ष्मणसेन : कार्तिक ते डिसेंबर = १११८, जानेवारी ते ज्येष्ठ शुद्ध १२ = १६७४.
(२३) विक्रम : चैत्र-आषाढ-कार्तिक ते डिसेंबर = ५७, जानेवारी ते फाल्गुन ज्येष्ठ आश्विन = ५६.
(२४) विक्रम (चालुक्य) : चैत्र ते डिसेंबर = १०७५, जानेवारी ते फाल्गुन = १०७६.
(२५) विलायती : कन्या ते डिसेंबर = ५९२, जानेवारी ते सिंह = ५९३.
(२६) वीरनिर्वाण : चैत्र ते डिसेंबर = –५२७, जानेवारी ते फाल्गुन= –५२६.
(२७) शक : चैत्र ते डिसेंबर = ७८, जानेवारी ते फाल्गुन = ७९.
(२८) शुहूर दक्षिणी : मृग ते डिसेंबर = ५९९, जानेवारी ते रोहिणी = ६००.
(२९) शुहूर फारुकी : मृग ते डिसेंबर = ५९७, जानेवारी ते रोहिणी = ६००.
(३०) सिंह : चैत्र-आषढ ते डिसेंबर = १११३, जानेवारी ते फाल्गुन ज्येष्ठ = १११४.
(३१) सिल्युसिडी : ऑक्टोबर ते डिसेंबर = –३१२, जानेवारी ते सप्टेंबर = –३११.
(३२) हर्ष : ६०६–६०७.
(३३) हिजरी : हिशेब करुन काढावयाचे.
पहा : काल; कालमापन; पंचांग.
संदर्भः 1. Bhandarkar, D. R. A.List of the Inscriptions of Northern India in Brahmi and its Derivative Scripts from about 200 A. C., Delhi, 1940.
2. Mirashi. V. V. Studies in Indology, 4 Vols., Nagpur, 1960-1966.
3. Poole, R. L. Studies in Chronology and History, London, 1934.
4. Stamp, A. E. Methods of Chronology, London, 1933.
५. खरे, ग. ह. संशोधकाचा मित्र, पुणे, १९५१.
खरे, ग. ह.