कार्लफेल्ट, एरिक : (२० जुलै १८६४—८ एप्रिल १९३१). स्वीडिश भावकवी. स्वीडनमधील डालार्ना प्रांतातील फोकार्ना या गावी त्याचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. अप्साला विद्यापीठातून त्याने तत्वज्ञानाची पदवी घेतली (१८९८). काही काळ तो शिक्षक होता. त्यानंतर त्याने ग्रंथपालाचा व्यवसाय पतकरला.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या स्वीडिश काव्याच्या प्रबोधानाचे नेतृत्व करणाऱ्या भावकवींपैकी तो एक होता. त्याचे बरेचसे काव्य प्रादेशिक स्वरूपाचे आहे. डालार्नाच्या परिसरातील निसर्ग आणि लोकजीवन-विशेषतः कृषिजीवन-त्याने आपल्या कवितेतून जिवंतपणे रंगविले. Feidolins visor (१८९८, इं.शी.द सॉंग्ज ऑफ फ्रिडोलीन) आणि Fridolins lustgard (१९०१, इं.शी. फ्रिडोलीन्स प्लॅझर गार्डन) हे काव्यसंग्रह त्या दृष्टीने उल्लेखनीय ठरतात. त्याच्या उत्तरकालीन कवितेतील चिंतनशीलता, धर्मभावना आणि आत्मपरता विशेष लक्षणीय आहे. उदा., Hosthorn (१९२७) हा काव्यसंग्रह. त्याच्या काही वेचक कवितांचा इंग्रजी अनुवाद सी. डब्ल्यू. स्टॉर्क ह्यांनी केलेला आहे (१९३८).

१९०४ मध्ये स्वीडिश अकॅडमीवर तो निवडून गेला. १९१२ मध्ये तो ह्या अकॅडमीचा स्थायी सचिव झाला. स्टाॅकहोम येथे तो निवर्तला. १९१८ मध्ये देऊ केलेले नोबेल पारितोषिक त्याने नाकारले होते. तथापि १९३१ मध्ये तो बहुमान त्याला मरणोत्तर प्राप्त झाला.

जगताप, दिलीप