कँब्रियन-पूर्व : कँब्रियन कल्प हा सु. साठ कोटींपासून ते पन्नास कोटी वर्षांपूर्वीपर्यंतचा काल होय व कँब्रियन-पूर्व म्हणजे कँब्रियन कल्पाच्या आधीचा काल होय. पृथ्वीचे घन कवच प्रथम तयार झाले तेव्हा तिचा जन्म झाला, असे मानतात. पृथ्वीचे घन कवच तयार होऊन सु. चार अब्ज वर्षे लोटली आहेत. म्हणून कँब्रियन-पूर्व काल चार अब्ज वर्षांपूर्वी सुरू होऊन साठ कोटी वर्षांपूर्वी संपतो. म्हणजे त्याची व्याप्ती पृथ्वीच्या एकूण इतिहासाच्या कालाच्या पाचषष्ठांशा इतकी प्रचंड भरते. एवढ्या कालातील घडामोडींविषयी अगदी तुटपुंजीच माहिती आपणास आहे.

पृथ्वीवरील सर्व खंडांत कँब्रियन-पूर्व खडक आढळतात. उदा., कॅनडाच्या ईशान्येकडचा  बहुतेक भाग, ब्राझील, आफ्रिका, अरबस्तान, भारताचे द्वीपकल्प व ऑस्ट्रेलिया यांचे बरेचसे भाग  कँब्रियन-पूर्व खडकांनी व्यापलेले आहेत. स्वीडन, नॉर्वे, सायबीरिया व युरेशियातील इतर काही  भागांत तसेच खडक आहेत.

कँब्रियन-पूर्व खडकांत सर्व प्रकारचे खडक आढळतात. त्यांपैकी काही गाळाचे खडक आहेत, काही लाव्हे आहेत व काही खडक हे इतर खडकांत घुसलेले अग्निज खडक आहेत. कित्येक  खडकांचे मूळचे स्वरूप फारसे बदललेले नाही. भारतात कडप्पा किंवा गोकाक यांच्याजवळ जे  वालुकाश्म आहेत ते किंचित टणक झाले आहेत, पण त्याखेरीज त्यांच्यात फारसा बदल झालेला  नाही. असेच फारसा फेरफार न झालेले चुनखडक व शेल हे भारतातल्या तसेच इतर देशांतल्या  कँब्रियन-पूर्व खडक असलेल्या क्षेत्रांत सापडतात. तसेच कवचाच्या हालचालींचा दाब पडून ज्यांचे  थोडे फार किंवा अति तीव्र रूपांतरण झाले आहे, असे खडकही कँब्रियन-पूर्वकालीन खडकांत आढळतात. सारांश, नदीनाल्यांनी गाळ वाहून नेणे, तो समुद्रात साचविला जाणे, ज्वालामुखी क्रिया, शिलारसाचे खडकात घुसणे, कवचाची  हालचाल होऊन कवचाला घड्या पडणे व पर्वतरांगा निर्माण होणे, हालचालींच्या दाबामुळे  पर्वतरांगांच्या खडकांचे रूपांतरण घडून येणे इ. घडामोडी पृथ्वीच्या इतिहासातील प्राचीन कालापासून वारंवार होत आलेल्या आहेत, असे कँब्रियन-पूर्व खडकांवरून दिसून येते.

आदिम अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांचे काही थोडे जीवाश्म (शिळारूप अवशेष)  कँब्रियन- पूर्व कालीन खडकांत क्वचित आणि आढळतात. पण ते इतके थोडे आणि तुरळक  आढळतात की, दूरदूरच्या खडकांमधील सहसंबंध (नातेसंबंध) ओळखून काढण्यासाठी त्यांचा  उपयोग होत नाही.

खडकांची निसर्गातील स्थिती लक्षात घेऊन एखाद्या प्रदेशातील काही खडक, काही दुसऱ्या  खडकांपेक्षा अधिक जुने असले पाहिजेत हे कळून येते. पण निरनिराळ्या देशांतील किंवा एकमेकांपासून दूर असलेल्या क्षेत्रांतील खडकांपैकी कोणत्या क्षेत्रातले खडक अधिक जुने आहेत काते समकालीन आहेत, हे जीवाश्मांची कसोटी उपलब्ध नसल्यामुळे सांगता येत नाही. किरणोत्सर्गमापनाने खडकांची वये ठरविण्याच्या पद्धतीचे शोध आता लागलेले आहेत व त्या पद्धती वापरून कँब्रियन-पूर्व खडकांची वये ठरवावी लागतील [→ खडकांचे वय].

कँब्रियन-पूर्व खडकांचे वर्गीकरण करण्याचे प्रयत्न वारंवार झालेले आहेत. त्यांचे विभाग करून त्यांना अशी नावे सुचविण्यात आली होती : (१) उष:कल्प (इओझोइक), (२) आदिकल्प (आर्कीओझोइक), (३) सुपुराकल्प (प्रोटिरोझोइक). पण ही पद्धती समाधानकारक नसल्याचे आढळून आले. कँब्रियन-पूर्व खडकांत जीवाश्म सापडत नाहीत म्हणून त्यांच्या कल्पाला अजीविक (आझोइक) कल्प अशी संज्ञा लाविली जात असे, पण ती उचित नाही. कँब्रियन कल्पाच्या पुष्कळच आधी पृथ्वीवर जीव असले पाहिजेत, ते अर्थात आदिम प्रकारचे असले पाहिजेत. त्यांची आदिम शरीरे जीवाश्मरूपाने टिकून राहणे शक्य नसल्यामुळे कँब्रियन-पूर्व खडकांत जीवाश्म आढळत नसावेत, अशी कल्पना आहे. कोणत्याही प्रदेशातल्या कँब्रियन-पूर्व खडकांपैकी सर्वांत जुन्या पट्टिताश्म, सुभाजा इ. खडकांना आर्कीयन खडक म्हणतात. पण निरनिराळ्या देशांतले आर्कीयन खडक एकाच कालातले असतात असे नाही.

भारतातील कँब्रियन-पूर्व खडकांचे (१) आर्कीयन महाकल्प व (२) पुराण महाकल्प असे दोन विभाग करण्यात आलेले आहेत. आर्कीयन महाकल्पाचे खडक पट्टिताश्म, सुभाजा इ. रूपांतरित खडक असून ते पुराण महाकल्पातील खडकांपेक्षा पुष्कळ जुने आहेत. पुराण महाकल्पातील खडक हे मुख्यत: रूपांतरण न झालेले गाळाचे खडक व लाव्हे यांचे बनलेले आहेत.

पहा : आर्कीयन पुराण महाकल्प व गण.

केळकर, क. वा.