कँडी नृत्य : श्रीलंकेमधील एक प्रसिद्ध नृत्यप्रकार. श्रीलंकेमधील प्राचीन राज्यकर्त्यांनी या नृत्यकलेस आश्रय देऊन विकसित केले. भगवान बुद्धाच्या पवित्र दाताच्या अवशेषाची प्रतिवर्षी ‘पेरहेर’ म्हणजे मिरवणूक काढण्यासाठी यात्रा भरते. या पेरहेर यात्रेच्या प्रसंगी श्रीलंकेमधील प्रसिद्ध नर्तक मोठ्या उत्साहाने भाग घेतात. कँडी नर्तकांची वेशभूषा पारंपारिक असते. कमरेला पांढरे वस्त्र गुंडाळून त्यावर पांढरेच कापड निऱ्यांप्रमाणे खोचून ते खाली झालरीसारखे सोडलेले असते. मधोमध मोठे पदक असलेली रुंद मेखलाही ते घालतात. ती चांदीची असून लहानलहान गोल चकत्यांनी सजविलेली असते. बाजूबंद व खांद्यावरील आभूषणे चांदीची असतात. गळ्यात मण्याचे पदक असते. ‘वेस’ नावाचे चांदीचे शिरोभूषण किंवा मुकुट हे नर्तक वापरतात. विशिष्ट धार्मिक विधीनंतर गुरुजनांनी नर्तकाच्या डोक्यावर हा वेस ठेवावयाचा असतो. त्यानंतर गुरुजनांच्या सन्मानार्थ नृत्य सादर केले जाते.
कँडी नृत्याचे तंत्र अत्यंत काटेकोर व पद्धतशीर आहे. या नृत्याच्या मूळ पदन्यासांना ‘अडऊ’ व ‘तिरमाण’ असे म्हणतात. पदन्यासाचे पहिले अंगविक्षेप करताना दोन्ही हातांत बांबू घेतात. ‘थै थै थै ताम’ हे बोल पाय आपटून आणि ‘थै किट थै ताम’ हे बोल बाजूस टाचा लांब करून करतात. या वेळी गुडघे वाकलेले असतात. कँडी नृत्यातील मूळ पदन्यासांच्या तालाबोलांचे ⇨ भरतनाट्यम् नृत्यामधील तालाबोलांशी बरेच साम्य आहे.
कँडी नर्तक एकूण अठरा ‘वन्नम्’’ (वर्णम् म्हणजे प्रकार) सादर करतात. या प्रकारांनापशुपक्ष्यांची नावे दिलेली आहेत. प्रत्येक प्रकाराच्या साथीला वर्णनात्मक काव्य असते व नृत्यासाठी दर्शनात्मक तालाच्या बोलांचा समूह असतो. ‘गजग वन्नम्’’ या प्रकारात ‘दोम किट तक दोम नो दोन जिन गटक गगी गट दोम तक’ असेताल बोल असतात. पेरहेर यात्रेत हा प्रकार अत्युत्तम रीतीने सादर केला जातो. त्याला खूप वेळ पर्यंत वाजविल्या जाणाऱ्या ढोलाची साथ असते. ढोलवादक स्थिर उभे राहतात किंवा तालबद्ध हालचाली करीत फिरत असतात. ‘सूरपती वन्नम्’’ या प्रकारातील तालबोल असे : ‘दोम जिंग जिंग तकतदोमतक’. ‘हंस वन्नम्’ या प्रकारातील तालबोल असे : ‘ताम दनम देन तन तनम देन तान ताम देनतने ना’. हे प्रकार सादर करताना संबंधित पशुपक्ष्यांच्या विशिष्ट हालचालींचा अभिनय नर्तक करीत असतो व त्याचबरोबर पदक्षेप आणि उत्प्लवन यांच्या वेगवेगळ्या प्रकारांतून आपली कला आविष्कृत करतो.
‘पंथेरू’ नृत्यात पितळेचे ढोल वापरतात. त्या ढोलांत धातूंचे तुकडे लावलेल्या कड्या अडकविलेल्या असतात. नर्तक तालाबरोबरच एका हातातून दुसऱ्या हातात ढोल फिरवीत असतो व अधूनमधून वाजवीतही असतो. हा समूहनृत्याचा प्रकार आहे.
पार्वतीकुमार
“