कँटन : (ग्वांग्जो). दक्षिण चीनमधील ग्वांगटुंग प्रांताची राजधानी. लोकसंख्या १९६५ च्या अंदाजानुसार ३० लक्ष. शहर कँटन (पर्ल) नदीच्या त्रिभुज प्रदेशात असून दक्षिण चीनचे प्रमुख नदीबंदर, आयात-निर्यात व्यापाराचे व उद्योगाचे केंद्र म्हणून अतिशय महत्त्वाचे आहे. येथे जहाजबांधणी, यंत्रे, रेशमी कापड, कागद, सिमेंट व रबराच्या विविध वस्तूंचे कारखाने आहेत. याबंदरात मोठ्या सागरी बोटी येऊ शकत नसल्यामुळे येथून १८ किमी. असलेल्या व्हांपोआ बंदराचा उपयोग मालाच्या चढउतारासाठी होतो. कँटनचा परिसर अत्यंत सुपीक असल्यामुळे शेतमालाची ही मोठी पेठ बनली आहे. इ. स. पू. तिसऱ्या शतकात कँटन चीनच्या साम्राज्यात आले. मध्ययुगात हिंदु, अरब व पारशी व्यापाऱ्यांनी येथे चांगलेच बस्तान बसविले होते. आधुनिक काळात चीनमध्ये पाश्चात्त्य विचारांचे वारे कँटनमार्गेच वाहू लागले व त्यावरून ‘प्रत्येक नव्या गोष्टीची सुरुवात कँटनला होते’ हा चिनी वाक्प्रचार रूढ झाला. चहा, रेशीम, मसाल्याचे पदार्थ व हस्तव्यावसायिक शोभेच्या वस्तूंची निर्यात येथूनच होत असल्याने पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच व डच यांच्यात येथे मोठी स्पर्धा होती. शेवटी पहिल्या अफूच्या युद्धातील १८४२ च्या नानकिंगच्या तहाने चीनमधील कँटनादी पाच बंदरांत पाश्चात्त्य व्यापाऱ्यांनाअनेक सवलती मिळाल्या. काही वर्षांनी चिनी-ब्रिटिश-फ्रेंच स्पर्धेतून संघर्ष उद्भवला व १८५६ मध्येकँटन ब्रिटिश व फ्रेंच सैन्यांनी व्यापले. तेव्हा जवळचे शामीन बेट त्यांना वसाहतीसाठी देऊनतडजोड स्वीकारावी लागली. पाश्चत्त्यांच्या अंमलात शामीनला आधुनिक वैभवसंपन्न नगरीचेस्वरूप प्राप्त झाले. कँटनला अलीकडील चिनी इतिहासातही विशेष महत्त्व आहे. सन यत् सेनच्याक्रांतिकारक चळवळीचे मुख्य केंद्र येथेच होते व चिनी प्रजासत्ताकाची घोषणाही येथेच झाली. १९२०साली चँगकैशेकचे राष्ट्रीय सैन्य येथूनच नानकिंगच्या रोखाने निघाले. अलीकडील कम्युनिस्टराजवटीतही कँटनची पुष्कळच वाढ झाली आहे. १९२४ मध्ये सन यत् सेनद्वारा स्थापित व नंतरत्याचेच नाव मिळालेले येथील विद्यापीठ प्रसिद्ध आहे.
ओक, द. ह.
“