कारेन (कॉथूले) : ब्रह्मदेशाच्या संघराज्यातील एक स्वायत्त राज्य. क्षेत्रफळ २८,८३७ चौ. किमी. लोकसंख्या ६,२७,६०० (१९६२). याच्या पूर्वेस व दक्षिणेस थायलंड असून, उत्तरेस काथा राज्य आणि पश्चिमेस तेनासरीम विभाग आहे. राजधानी बा आन. २४ सप्टेंबर १९४७ रोजी ब्रह्मदेश स्वतंत्र झाला त्याचा कारेन हा एक घटक होता. ब्रह्मदेशात कारेन लोकांची संख्या बारा लाखांहून अधिक आहे. त्यांना ब्रिटिशांऐवजी ब्रह्मी लोकांची सत्ता आली याचा आनंद नव्हता. ब्रह्मी लोक कारेनांना कमी लेखीत. ब्रह्मी भाषेत कारेन म्हणजे रानटी माणूस. कारेनांनी स्वतंत्र राज्यासाठी बंड उभारले. ब्रह्मदेशातील स्वातंत्र्योत्तर अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे बंड फोफावले. कारेनांच्या राष्ट्रीय संरक्षण यंत्रणेने सितांग नदीच्या पूर्वेचा व इतरत्र बहुसंख्य कारेन असलेला भाग व्यापला. अखेर समझोता होऊन १ जून १९५४ रोजी स्वायत्त कारेन राज्य स्थापन झाले. चार पाच वर्षांत हलाइंगब्वे-बा आन डांबरी सडक, विमानतळ, शासकीय कार्यालये, रुग्णालये इ. स्थापन झाली. ३ एप्रिल १९६४ रोजी राज्याचे नामांतर कॉथूले असे झाले. या राज्याचा प्रदेश दक्षिणोतर चिंचोळा असून त्यातून सॅल्वीन नदी जाते. थायलंडच्या सीमेवर उंच, दाट अरण्यमय डोंगराळ प्रदेश असून, बाकीचा भागही कमी उंचीचा उष्णकटिबंधीय वर्षावनांनी भरलेला डोंगराळ प्रदेश आहे. मागासलेल्या लोकांच्या फिरत्या शेतीच्या पद्धतीमुळे बऱ्याच भागांत जंगलांचा नाश झाला आहे. नद्यांच्या काठच्या प्रदेशात भात होते. उंच भागात तीळ, वाटाणे वगैरे होतात. १९६० पासून रबर, ताग, कापूस, कॉफी, ऊस वगैरे पिकांच्या लागवडीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. चा-इन, कॉकरेक, हलाइंगब्वे व बा आन ही मोठी गावे आहेत. बहुसंख्य कारेन लोक बौद्ध धर्मीय असून इतर ख्रिस्ती व जडप्राणवादी आहेत. भाषा मुख्यतः कारेन असून शिक्षणामुळे ख्रिस्ती लोकांचा प्रभाव पडलेला आहे.
ब्रह्मदेशातील सध्याची जनरल ने-विनची लष्करी राजवट उलथून पाडण्याच्या प्रयत्नास मदत करून मोठे स्वतंत्र कारेन राज्य स्थापण्याचा काही लोक प्रयत्न करीत आहेत.
कुमठेकर, ज.ब.