कारेलो-फिनिश राज्य : सोव्हिएट संघराज्यातील १९४०—१९५६ पर्यंतचे एक घटक राज्य. १९५६ नंतर हे संघराज्यातील ‘रशियन’ घटक राज्यात विलीन करण्यात येऊन त्यास रशियन एस्.एफ्. एस्. आर्. मधील स्वायत्त राज्याचा दर्जा देण्यात आला. कारेलिया या नावानेच तो आता रुढ आहे. क्षेत्रफळ १,७२,४०० चौ. किमी. व लोकसंख्या ७,१४,००० (१९७०) असलेल्या या स्वायत्त राज्याच्या पश्चिमेकडील, जवळजवळ निम्म्या भागावर पूर्वी फिनलंडचा ताबा होता. १९२० मध्ये पूर्वेकडील कारेलिया भागाची रशियातील एक स्वायत्त राज्य म्हणून निर्मिती झाली. १९४० मध्ये रशिया–फिनलंड संघर्षात रशियाने फिनलंडचा पश्चिमेकडील कारेलियाचा मुलूख व्यापून त्याचे पूर्व कारेलियात विलिनीकरण केले आणि दोन्हींचे मिळून कारेलोफिनिश राज्य बनविले. दुसऱ्या महायुध्दात काही काळ हा भाग फिनिशांनी पुन्हा घेतला. परंतु १९४६ मध्ये रशियनांनी तो परत मिळविला. १९५६ पासून सर्व राज्य रशियन सोव्हिएट संघराज्यातील एक स्वायत्त राज्य बनविल्याने त्याचे महत्त्व थोडे कमी झाले असले, तरी ७०% जंगलव्याप्त व अभ्रक, जस्त, शिसे, चांदी, तांबे इ.महत्त्वाच्या खनिजांनी युक्त असलेल्या या राज्याला लागूनच फिनलंड असल्याने लष्करी दृष्ट्या त्यास महत्त्व आहे.
शाह, र.रू.