कारब्युरेटर : पेट्रोल एंजिनाला लागणाऱ्या पेट्रोलाचे फवाऱ्याने अगदी लहान कण करुन, हवा व पेट्रोलकण यांचे हव्या त्या प्रमाणाचे मिश्रण बनविण्याचे साधन. शास्त्रीय दृष्टीने हवा व पेट्रोलाचे योग्य मिश्रण, वजनाने १५:१ या प्रमाणात असले पाहिजे, परंतु निरनिराळ्या परिस्थितीत एंजिनाला निरनिराळ्या प्रमाणाच्या हवा-पेट्रोल मिश्रणाची जरूरी असते. उदा., मोटारगाडीत सर्वसाधारण वेगाकरिता हवा-पेट्रोल मिश्रण १५:१ ते १७:१, एकदम वेग वाढविण्यासाठी व चढाव चढताना दाट मिश्रण १२:१ ते १३:१ व काटकसरीसाठी १६:१ ते १७:१ असे प्रमाण ठेवावे लागते.
वर सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या प्रमाणांचे हवा-पेट्रोल मिश्रण आपोआप बनण्याकरिता आधुनिक कारब्युरेटरमध्ये योजना केलेली असते. सर्व आधुनिक कारब्युरेटर पूर्वीच्या साध्या कारब्युरेटराच्याच तत्त्वावर आधारलेले आहेत. साध्या कारब्युरेटराची रचना आ.१ मध्ये दाखविली आहे. या कारब्युरेटरात हवेच्या मुख्य मार्गात निमुळती होऊन पुन्हा उमलणारी एक नळी (व्हेंचुरी) बसवलेली असते. एंजिनाला लागणारे पेट्रोल व्हेंचुरीच्या मध्यभागात ठेवलेल्या मापक प्रोथामधून (ज्यातून पेट्रोलाचा फवारा बाहेर पडतो अशा नळीतून) बाहेर ओढले जाते. कारब्युरेटरामध्ये पेट्रोलची एक लहानशी टाकी असते व तीत एक ठराविक पातळी राखण्यासाठी एक तरणी ठेवलेली असते. तिच्या वर–खाली होण्याने पेट्रोल पुरवठ्याच्या सूची झडपेचे योग्य नियंत्रण होते. एंजिनाच्या चोषण धावेत चोषण झडप उघडी असते व दट्ट्या शीर्ष स्थिर स्थानाकडून (धावेच्या वरच्या टोकाकडून) पाद स्थिर स्थानाकडे (धावेच्या खालच्या टोकाकडे) जातो. त्यामुळे सिलिंडरामध्ये हवेचा दाब कमी होतो व बाहेरील हवा कारब्युरेटरामधून आत ओढली जाते. ही हवा कारब्युरेटराच्या व्हेंचुरीतून येताना पेट्रोलाच्या प्रोथाजवळ तिचा वेग वाढतो व तिचा दाब कमी होतो. या दोन्ही कारणांनी प्रोथातून पेट्रोल बाहेर ओढले जाते व ते फवाऱ्याच्या रूपाने उडून हवेच्या झोतात मिसळते. एंजिनाकडे जाणाऱ्या हवा-पेट्रोल मिश्रणाची राशी नियंत्रित करण्यासाठी एक स्वतंत्र झडप बसवलेली असते. ही नियंत्रक झडप अधिक उघडून एंजिनाचा वेग वाढविता येतो.
या झडपेची उघड वाढवल्याने हवेची राशी व तिचा वेग वाढतो, व्हेंचुरीमधील पेट्रोलाच्या प्रोथातून जास्त जास्त पेट्रोल बाहेर येते व हवा पेट्रोल मिश्रण अधिकाधिक दाट होत जाते. परिणामतः एंजिनाची शक्ती व वेग वाढत जातात.
हवा व पेट्रोल यांचे मिश्रण एंजिनांच्या सर्व वेगांमध्ये जवळजवळ एकाच प्रमाणाचे असले पाहिजे. परंतु साध्या कारब्युरेटरात असे आदर्श मिश्रण एंजिनाच्या फक्त एकाच ठराविक वेगात मिळू शकते. म्हणून सर्व वेगांत मिश्रणाचे प्रमाण सारखे ठेवण्यासाठी संशुध्दी (चुकीची दुरूस्ती करणारा) प्रोथ व हवा निःस्राव किंवा क्रमशः हवा निःस्राव या दोन पद्धतींचा आधुनिक कारब्युरेटरात उपयोग करतात. आ.२ मध्ये संशुध्दी प्रोथ व हवा निःस्राव असलेल्या कारब्युरेटराची रचना दाखविली आहे. पेट्रोलाकरिता एकच प्रोथ वापरुन क्रमाक्रमाने वाढती हवा मिसळण्याची व्यवस्था असलेला क्रमशः हवा निःस्त्राव कारब्युरेटर आ.३ मध्ये दाखविला आहे. यामध्ये मिश्रणाचे प्रमाण सारखे ठेवण्याचे काम प्रोथाच्या खालच्या भागात असलेल्या समक्ष (समान अक्ष असलेल्या) नळ्यांच्या संचामुळे साधले जाते. जसजसा एंजिनाचा वेग वाढतो तसतशी क्ष या छिद्रातून आत घुसणारी हवा वाढत जाते व हवा-पेट्रोल मिश्रणाची प्रमाणबद्धता स्थिर राहते.
एंजिन अगदी हळू चालत असताना इंधन नियंत्रक झडप जवळजवळ बंद असते व कारब्युरेटराच्या व्हेंचुरीमध्ये हवेचा वेग अगदी कमी होतो, त्यामुळे मुख्य प्रोथातून फारसे पेट्रोल बाहेर येत नाही. एंजिन मंद गतीने चालण्यास दाट मिश्रणाची जरूरी असते.
याकरिता एक स्वतंत्र मंद गती प्रोथ बसविलेला असतो व त्यामधून येणाऱ्या पेट्रोलाबरोबर मिसळणारी हवा एका समांतर बारीक मार्गाने आणली जाते (आ.४). या मंदगती प्रोथातून येणाऱ्या पेट्रोलाचे व हवेचे मिश्रण इंधन नियंत्रक झडपेच्या पुढे असलेल्या एका बारीक भोकातून बाहेर येते. इंधन नियंत्रक झडपेच्या मागच्या बाजूसही एक बारीक भोक असते. या भोकातून हवा एका बारीक मार्गाने आत जाते आणि मंद गतीच्या मिश्रणात मिसळते. या वेळी एकंदर मिश्रणाची राशी नियंत्रित करण्यासाठी एक संयोजनक्षम स्क्रू बसवलेला असतो, तो आ.४ मध्ये दाखविला आहे. काही कारब्युरेटरांत हवा आत घेण्याच्या तोंडावर एक हवा झडप बसवितात. एंजिन थंड असताना सुरू करतेवेळी ही झडप जर काही वेळ बंद ठेवली, तर पेट्रोलाच्या प्रोथातून जास्त पेट्रोल शोषले जाते व मिश्रण खूप दाट होते. त्यामुळे एंजिन लवकर सुरू होते. एंजिन सुरू झाल्यावर हवेची झडप पुन्हा पूर्ण उघडून ठेवतात.
काही कारब्युरेटरांत एक प्रवेग पंप बसवलेला असतो. तो मिश्रणराशीचे नियंत्रण करणाऱ्या झडपेलाच जोडलेला असतो. नियंत्रक झडप स्थिर असली तर पंप बंद राहतो. नियंत्रक झडप उघडली जात असतानाच पंपातून पेट्रोल बाहेर उडते व ते एंजिन–सिलिंडराकडे जाणाऱ्या मिश्रणात मिसळते व मिश्रण अधिक दाट होते, त्यामुळे एंजिनाचा वेग वाढतो.
ज्या कारब्युरेटरात पेट्रोल–हवा मिश्रण वरून खाली जाते त्यास ‘उतरत्या झोताचा कारब्युरेटर’ म्हणतात व ज्यात मिश्रण खालून वर जाते त्यास ‘चढत्या झोताचा कारब्युरेटर’ म्हणतात. कारब्युरेटरांच्या वर आलेल्या प्रकारांत व्हेंचुरीचे क्षेत्र कायम असते. इतर काही प्रकारांत हे क्षेत्र कमी जास्त करून मिश्रणराशीचे नियंत्रण करतात. मोटारगाडीतील एंजिनात सामान्यतः झेनिथ, एस-यू, सोलेक्स किंवा स्ट्रॉंबर्ग कारब्युरेटर वापरतात.
पहा : मोटारगाडी
संदर्भ : 1.Newton, K. Steeds, W.The Motor Vehicle, London, 1962.
हाटे, ज.ना.
“