कारंड : रेलिडी या पक्षिकुलातला हा पक्षी आहे. याचे शास्त्रीय नाव प्युलिका ॲट्रा  असे आहे. यूरोप, उत्तर आफ्रिका  आणि आशियाच्या बहुतेक भागांत हा आढळतो. भारतात सगळीकडे आणि हिमालयात सु.२४४० मी. उंचीपर्यंत हा सापडतो. भारताच्या बहुतेक भागांत हा कायम राहणारा आहे, परंतु हिवाळ्यात मध्य आणि पश्चिम आशियातील कारंड स्थलांतर करुन भारतात येतात. म्हणून या ऋतूत यांची संख्या फार वाढते आणि ते सगळीकडे (विशेषतः उत्तर भारतात) मोठ्या प्रमाणात दिसू लागतात.

कारंड पाळीव कोंबडीएवढा असतो. हा बसकट बांध्याचा, काळसर करड्या रंगाचा आणि जवळजवळ शेपटी नसलेला पक्षी आहे. डोके आणि मान जास्त काळसर आणि शरीराची खालची बाजू फिक्कट रंगाची असते. डोळे लाल, चोच पांढरी आणि पाय हिरवट रंगाचे असतात. बोटे लांब असतात त्यांना त्वचेची झालर असून तिच्या पाळी पडलेल्या असतात. चोचीलगत कपाळावर पांढऱ्या रंगाचे कवच असते.

कारंड

रेलिडी कुलातील ⇨पाणकोंबडी  वगैरे पक्ष्यांपेक्षा कारंड हा यथार्थतेने पाणपक्षी आहे. नद्यांपेक्षा सरोवरे, तलाव, तळी ही त्याला जास्त पसंत पडतात. हा प्रामुख्याने शाकाहारी असून पाण्याच्या पृष्ठावरील त्याचप्रमाणे पृष्ठाखाली पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती खातो. पाण्यात बुडी मारून भक्ष्य मिळविण्यात हा पटाईत आहे. मासे, पाणकिडे, गोगलगाई वगैरेही हा खातो. पाण्यातून हवेत उडताना याला कष्ट पडतात. पाण्याच्या पृष्ठीभागावर अर्धवट धावत व पंख फडफडावून अर्धवट उडत हा काही अंतरापर्यंत जाऊन नंतर हवेत उडतो. एकदा हवेत उडाल्यावर हा सहज जोराने उडू शकतो. उडताना मान आणि पाय लांब पसरलेले असतात.

यांचे लहानमोठे थवे असतात व प्रत्येक थवा पाण्याच्या पृष्ठावरील आपल्या प्रदेशाची मर्यादा आखून घेतो. अशा दोन क्षेत्रांमध्ये कित्येक मीटरांचे अंतर असते. एका क्षेत्रातील पक्षी दुसऱ्या क्षेत्रात जात नाहीत.

यांच्या विणीचा हंगाम मुख्यतः जुलै किंवा ऑगस्टमध्ये असतो. घरटे ओबडधोबड व लव्हाळ्यांचे बनविलेले असून लवहाळ्यांच्या जाळीत ते पाण्याच्या पातळीच्या वर असते. मादी सहा—दहा अंडी घालते ती पिवळसर दगडी रंगाची असून त्यांवर तांबूस तपकिरी किंवा काळे ठिपके असतात.

कर्वे, ज.नी.