कायमीरा : उपास्थिमत्स्यांच्या (ज्यांच्या शरीरातील सांगाडा हाडांचा नसून मऊ, लवचिक पण कठीण उपास्थींचा बनलेला असतो अशा माशांच्या) हॉलोसेफालाय गणातील कायमीरिडी कुलातला मासा. या कुलात कायमीरा, कॅलोऱ्हिंकस आणि हॅरिओट्टा या तीन वंशाच्या जातींचा समावेश होतो. या तिन्ही वंशांच्या माशांना सामान्यतः कायमीरा म्हणण्याचा प्रघात आहे.

कायमीरा वंशात कित्येक जाती आहेत, त्यांपैकी कायमीरा मॉस्ट्रोझा ही सामान्य जाती सगळयांत मोठी आहे. हिची लांबी सु.९० सेंमी. पर्यंत असते. नर मादीपेक्षा पुष्कळ लहान असतो. शरीर दिसायला शार्क माशासारखे असून पुढे जाड आणि मागे निमुळते असते शेपटी जवळजवळ शरीराइतकी लांब व चाबकाच्या दोरीसारखी असते. डोके चेपटलेले असते. तुंड (मुस्कट) बोटके असून मुख त्याच्या मागे अधर (खालच्या) पृष्ठावर असते. नराच्या डोक्यावर एक आत ओढून घेता येणारे गदेच्या आकाराचे ललाट-आलिंगक नावाचे उपांग (अवयव) असून त्याचा उपयोग मादीला आलिंगन देण्याच्या कामी होतो असा समज आहे. जिवंत माशांचे डोळे स्वच्छ पाचूसारख्या हिरव्या रंगाचे असतात. डोक्याच्या दोन्ही बाजूंवर एकेक क्लोम (कल्ल्याचे) छिद्र असते. वरचा जबडा कर्पराशी (मेंदूला वेढणाऱ्या व त्याचे संरक्षण करणाऱ्या कवटीच्या भागाशी) घट्ट सायुज्यित झालेला असून खालचा प्रत्यक्ष कवटीशी सांधलेला असतो. दातांच्या सायुज्यनाने (एकीकरणामुळे) वरच्या आणि खालच्या जबडयांत दंतिनाचे (दाताचा बहुतेक भाग ज्याचा बनलेला असतो त्या कठीण, लवचिक, कॅल्शियमी पदार्थाचे) मोठे, जाड व सपाट पेषण-पट्ट (दळण्याचे पट्ट) बनलेले असतात. त्यांचा उपयोग अन्न दळून बारीक करण्याकरिता होतो. लहान मासे, क्रस्टेशियन (कवचधारी) व मॉलस्क (मृदुकाय) प्राणी आणि कृमी हे यांचे भक्ष्य होय. अंसपक्ष (छातीच्या भागावरील पर म्हणजे हालचालीस वा तोल सांभाळण्यास उपयोगी पडणाऱ्या त्वचेच्या स्नायुमय घड्या) मोठे, पंखांसारखे आणि टोकदार असतात. श्रेणिपक्षही (परांची मागणी जोडी) साधारण मोठेच असतात. पहिला पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) उंच असून त्याच्यापुढे एक मजबूत कंटक (काटा) असतो. या कंटकाचा संबंध विषयग्रंथीशी असल्यामुळे याने होणाऱ्या जखमा विषारी असतात. पुच्छपक्षाचे जवळजवळ सारख्या आकारमानाचे दोन खंड असून एक शेपटीच्या वर आणि दुसरा तिच्या खाली असतो. श्रोणिपक्षांच्या मागे त्यांच्या काही भागांच्या परिवर्तनाने तयार झालेले दोन अलिंगक असतात. यांचा उपयोग मैथुनाच्या वेळी अंतःक्षेपी अंग म्हणून होतो आणि त्यांचे मुख्य कार्य म्हणजे मादीच्या अंडवाहिनीत शुक्राणू सोडणे हे होय.

कायमीरा : (१) ललाट-आलिंगक, (२) मुख, (३) प्रच्छद

कायमीरा मॉस्ट्रोज्ञा ही जाती यूरोपच्या किनाऱ्यावर नॉर्वेपासून पोर्तुगालपर्यंत, भूमध्य समुद्रात, अझोर्स बेटांपासून दक्षिणेकडे गुड होप भूशिरापर्यंत आणि पूर्वेकडे जपानच्या आसपास आढळते. मादी समुद्राच्या तळाशी अंडी घालते अंडयाच्या भोवती चिवट शृंगमय पदार्थाचा कोश असून याच्या एका टोकाला लांब प्रवर्घ (वाढ) असतो तो चिखलात खुपसलेला असल्यामुळे अंडे एके ठिकाणी राहू शकते.

कॅलोऱ्हिंकस वंशात कॅलोऱ्हिंकस अंटार्क्टिकस ही एकच जाती असून ती दक्षिण ध्रुव-दोणात आणि दक्षिण पॅसिफिक महासागरात आढळते. या जातीच्या माशाच्या तुंडापासून एक विचित्र भाग पुढे आलेला असून त्याच्या टोकावर खाली वळलेला त्वचेचा झोल असतो. हे महत्त्वाचे स्पर्शग्राही (स्पर्शाला संवेदनशील असणारे) इंद्रिय असते.

हॅरिओट्टा वंशाची हॅरिओट्टा रॅलीआना ही जाती उत्तर अटलांटिक महासागरात आढळते. या माशाचे तुंड खाली दबलेले, लांब आणि चोचीसारखे असते. नराला ललाट-आलिंगक नसतो.

कायमीरा कॉलिआय या जातीचा संभाव्य अपवाद सोडला, तर बाकीच्या सर्व जाती खोल पाण्यात राहणाऱ्या आहेत म्हणूनच तुलनात्मक दृष्टीने त्या दुर्मिळ आहेत आणि त्यांच्या सवयी व एकंदर वर्तन यांविषयी काहीही माहिती नाही. अंडकोश क्वचितच मिळतात आणि तेही खोल पाण्यातून मिळवावे लागतात. यावरुन या माशांचे प्रजोत्पादन खोल पाण्यातच होत असावे असा निष्कर्ष काढणे चूक ठरणार नाही.

कायमीरा काही दृष्टींनी महत्वाचा आहे. पुराजीव कालात (सु.६०–२४·५ कोटी वर्षापूर्वी) ब्रॅडिओडोंट हा एक महत्त्वाचा माशांचा समूह होता. या समूहापैकी जे थोडे मासे जिवंत राहिले त्यांपैकीच हल्लीचा कायमीरा मासा होय. या माशाची संरचना आदिम (आद्य) असून याचे स्थान शार्क मासे आणि अस्थिमत्स्य यांच्या मध्ये आहे. याचा अंतःकंकाल (आतील सांगाडा) उपास्थींचा (कुर्चाचा) बनलेला असला, तरी याच्या पृष्ठवंशामध्ये (पाठीच्या कण्यामध्ये) कॅल्सीभूत (कॅल्शियमी लवणांनी युक्त) अस्थिसदृश पदार्थ उत्पन्न झालेला आढळतो. हा पदार्थ खरी अस्ती नव्हे पण तो अगदी तिच्यासारखा असतो.

कर्वे, ज.नी.