कषीका : हा पक्षी रीकर्व्हिरोस्ट्रिडी या पक्षिकुलातला असून त्याच्या चार जाती आहेत त्यांतल्या सामान्य जातीचे प्राणिशास्त्रातील नाव रीकर्व्हिरोस्ट्रा ॲव्होसेटा आहे.
हा पक्षी हिवाळी पाहुणा आहे. सप्टेंबर महिन्यात तो बाहेरून भारतात येतो व मे महिन्यात परत जातो. हिवाळ्यात तो भारताच्या जवळजवळ सगळ्या राज्यांत आढळतो पण आसाममध्ये मात्र नसतो.
समुद्रकिनारा विशेषत: खाड्या, सरोवरे व तलाव यांचे काठ आणि दलदलीच्या जागा या ठिकाणी या पक्ष्यांच्या जोड्या अथवा थवे असतात. कधीकधी शंभर किंवा त्यापेक्षाही जास्त पक्षी एका थव्यात असतात.
याची लांबी (चोचीसकट) ३०–४८ सेंमी. असते. शरीराचे मुख्यतः काळा व पांढरा हे दोन रंग दिसून येतात. पाय लांब व निळसर रंगाचे असतात. पायाची बोटे पातळ कातडीने अंशत: जोडलेली असल्यामुळे जरूर पडेल तेव्हा तो पाण्यात पोहू शकतो. चोच लांब, बारीक, काळी आणि चांभाराच्या आरीसारखी कमानदार असून वर वळलेली असते. मान काहीशी लांब व डोके लहान असते. पंख लांब व टोकदार असतात. उडताना मान किंचित पुढे केलेली असते आणि पाय आखूड शेपटीच्या मागे लोंबत असतात.
हा कर्दमचारी (चिखलमय भागात राहणारा) पक्षी असून दलदलीच्या जागी अथवा उथळ पाण्यातून भक्ष्य शोधण्यासाठी नेहमी हिंडत असतो पाण्यातले किडे, झिंगे, कृमी इ. याचे भक्ष्य होय चोच अर्धवट उघडून तो ती चिखलात खुपसतो व नंतर ती वाटोळी फिरवून चिखल घुसळतो आणि त्यातून भक्ष्य पकडतो.
याची वीण यूरोप आणि आशियाच्या समशीतोष्ण प्रदेशांत होते विणीचा हंगाम एप्रिल व मे हे दोन महिने असतो. भारतात याची वीण फक्त कच्छच्या रणात एप्रिलमध्ये होते. विणीच्या हंगामात या पक्ष्यांचे थवे घरट्यांच्या वसाहतीच तयार करतात. चिखलट अथवा रेताड जागांवर घरटी तयार केलेली असून दोन घरट्यांत सु. ६० सेंमी. अंतर असते. थोडीशी जागा उकरून त्यात थोडा पालापाचोळा घालून घरटे तयार केलेले असते रेताड जागेतील घरट्यात तर पालापाचोळाही नसतो. मादी सामान्यत: चार अंडी घालते. नर आणि मादी दोघेही आळीपाळीने अंडी उबवितात. २२–२४ दिवसांनी पिल्ले बाहेर पडतात. आईबापांच्या देखरेखीखाली ती शिकून तयार होत असतात व सु. अडीच महिन्यांनंतर पूर्णपणे स्वतंत्र होतात.
कर्वे, ज. नी.
“