कशाभिका : कित्येक कोशिकांपासून (पेशींपासून) किंवा ऊतकांपासून (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहांपासून) निघालेल्या चाबकाच्या दोरीसारख्या, लांब, नाजूक आणि बारीक जीवद्रव्यीय [सजीवांच्या कोशिकेतील अत्यावश्यक द्रव्याच्या बनलेल्या, →जीवद्रव्य] संरचनांना कशाभिका म्हणतात. कशाभिका सामान्यत: कोशिकेच्या अग्र टोकाजवळ असलेल्या आधारकणिकेपासून (आधार देणाऱ्या बारीक कणापासून) निघते. कशाभिका एकेकच असतात किंवा त्यांचे लहान गट असतात. पुष्कळ एककोशिक (ज्यांचे शरीर फक्त एकाच कोशिकेचे बनलेले असते असे) प्राणी आणि वनस्पती यांत प्रामुख्याने त्या चलनाचे कार्य करतात. प्रोटोझोआ संघातील मॅस्टिगोफोरा वर्गाचे महत्त्वाचे लक्षण कशाभिकांचे अस्तित्व हे होय. या वर्गातील बहुतेक प्राण्यांना १-४ कशाभिका असतात पण काही परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणाऱ्या) जातींत त्या पुष्कळच असतात. स्पंजांचे पोषण आणि श्वसन त्यांच्या कशाभिकायुक्त कोशिकांवर अवलंबून असते. हायड्रामध्ये देहभित्तीच्या (शरीराच्या बाह्यावरणाच्या) अंतस्त्वचेतील कित्येक कोशिकांना कशाभिका असतात. त्यांच्या हालचालींमुळे आंतरगुहिकेतील (सीलेंटरेट प्राण्याच्या शरीरातील पचनासाठीही उपयोगी पडणाऱ्या शरीरातील पोकळीतील) पाणी ढवळले जाते.
बहुतेक प्राण्यांच्या चल युग्मकांची (ज्यांच्या संयोगामुळे प्रजोत्पत्ती होते त्या जनन-कोशिकांची) हालचाल यांच्यामुळेच होते. उदा.,पृष्ठवंशींच्या (पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांच्या) शुक्राणूचे पुच्छ म्हणजे कशाभिकाच असते आणि शुक्राणूचे शीर्ष अंड्याकडे ढकलण्याचे काम ती करते.
वनस्पतींमध्ये कशाभिका बव्हंशी ⇨शैवले आणि जलीय ⇨कवक यांत आढळतात. अलैंगिक बीजाणू (वनस्पतीचा एकलाक्षणिक प्रजोत्पादक भाग), काही एककोशिक वर्धी कोशिकाव प्राय: पुं-युग्मके आणि स्त्री-युग्मके यांत त्या असतात.
कशाभिका बाह्यत: एखाद्या धाग्यासारखी दिसत असली, तरी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने निरीक्षण केल्यावर तिची संरचनाजटिल (क्लिष्ट) असल्याचे दिसून येते कशाभिका आधार-द्रव्यात बसविलेल्या अकरा तंतुकांची (सूक्ष्म तंतूंची) बनलेली असते, यांपैकी नऊ तंतुकांचे मंडल असून त्याच्या केंद्रस्थानी दोन तंतुक असतात.
हे सर्वतंतुक एका लवचिक बाह्य आवरणात बंद असतात. प्रत्येक तंतुकाभोवती आवरण असून तो दोन सूक्ष्मतंतुकांचा बनलेला असतो. सगळ्या प्राणिसृष्टीत आढळणाऱ्या कशाभिकांची संरचना जवळजवळ एकसारखीच असते, पण काही सूक्ष्मजंतू आणि आदिजीव यांत आढळणाऱ्या कशाभिकांमध्ये एकच तंतुक असून तो जीवद्रव्याने वेढलेला असतो.
कशाभिका ही मुख्यत: चलन-अंगके (हालचालीचे अवयव) असली तरी पोषण आणि श्वसन यांकरिताही त्यांचा उपयोग होतो. शरीर स्थिर राखण्याकरिताही एककोशिक प्राणी प्राय: त्यांचा उपयोग करतात.
कशाभिकेच्या वल्हवण्यासारख्या क्रियेने अथवा तरंगी गतीने प्राण्याचे शरीर पुढे जाते अथवा पाण्यातील कण शरीराकडे ओढले जातात. वल्हवण्याच्या क्रियेमध्ये कशाभिका वाकून पाण्याला फटकारे मारते व पुन्हा सरळ होते, या क्रिया आलटूनपालटून चालू असल्यामुळे प्राणी इच्छित दिशेने पुढे जातो. कशाभिकेच्या उगमस्थानापासून उत्पन्न होऊन टोकापर्यंत जाणाऱ्या तरंगांमुळे तरंगी गती उत्पन्न होते. हिच्यामुळे प्राणीपुढे जात असताना पुष्कळदा आपल्याभोवती फिरतो किंवा तो स्थिर असला तर पाण्यात भोवरा उत्पन्न होतो.
कर्वे,ज. नी.
“