कामशिल्प : सामान्यत: कामवासनेचा आविष्कार करणाऱ्या शिल्पास ‘कामशिल्प’ म्हटले जाते.

विवस्त्रा स्त्री खजुराहो

प्राचीन काळापासून जगातील बहुतेक देशांत आणि कलासंप्रदायात प्रसादांत स्त्रीपुरुष-समागम दाखविणारी चित्रे वा शिल्पे निर्माण झालेली दिसतात. त्यांपैकी बरीचशी एखाद्या विशिष्ट कथानकाचा एक भाग म्हणून अथवा स्वतं‌त्र प्रासंगिक अभिव्यक्ती म्हणून रूपास आली. दंपति-शिल्प, खजुराहोतथापि स्त्रीपुरुष-समागम हाच वर्ण्य विषय घेऊन त्याच विषयाची विविध रूपे दाखविणारी परंपरा व संप्रदाय भारताखेरीज इतरत्र निर्माण झालेला आढळत नाही. मेसोपोटेमियन, ग्रीक, रोमन तसेच भारतीय सिंधू संस्कृतीत शृंगारिक वा उत्तान शिल्पे आढळतात परंतु ती प्रतीकात्मक असून त्यांना विशिष्ट कलासंप्रदायाचे स्वरूप प्राप्त झालेले दिसत नाही. प्रजोत्पादन आणि सृष्टीची सुफलता या विषयींच्या धार्मिक समजुतींची ती अंगे होत. भारतात कामशिल्पाच्या परंपरेस मोहें-जो-दडो संस्कृतीपासून सुरूवात झाली असावी, असे उत्खनित अवशेषांत सापडलेल्या नृत्यांगणेच्या मूर्तीवरून म्हणावयास हरकत नाही. त्यानंतर मौर्य, शृंग, कुशाण व गुप्तवाकाटक या काळात कामशिल्पाचे नमुने कमीअधिक प्रमाणात सापडतात. शृंगकालीन मृत्तिकाशिल्पांत समागमाची दृश्ये आहेत मद्यपी स्त्रीपुरुषांच्या आकृत्या आहेत. गुप्त-कालीन मंदिरांतील दरवाज्यांच्या चौकटींवर प्रणयी युगुले कोरण्यात आलेली आहेत. अजिंठा, वेरूळ येथे शृंगारिक शिल्पे विपुल दिसतात. मात्र दहाव्या-बाराव्या शतकांत ओरिसा व ईशान्य मध्यभारत या भागांत हा संप्रदाय अधिक बहरलेला दिसतो. यापुढील काळातील मंदिरांत सर्व माध्यमांचा (दगड, लाकूड, विटा) उपयोग करून कामशिल्पे कोरण्यात आली. परंतु कलात्मकता व सांप्रदायिक विचारकल्पनांची अभिव्यक्ती या बाबतींत मोढेरा, खजुराहो व कोनारक येथील कामशिल्पे अद्वितीय आहेत. येथील मंदिरांच्या कामशिल्पाची विपुल व भरघोस अभिव्यक्ती मंदिरांतूनच का झाली असावी, या प्रश्नाला अद्यापि पूर्णपणे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. परंतु तत्संबंधी अनेक निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत. प्राचीन भारतीयांच्या आचारविचारांत तसेच साहित्यात व धार्मिक विधींत लैंगिक समागमास कोणतेही विवक्षित बंधन आढळत नाही. उलट कामशास्त्राच्या शास्त्रशुद्ध अभ्यासास उत्तेजन दिलेले आढळते आणि काम म्हणजे एक धार्मिक विधीच आहे, असे प्रतिपादिलेले दिसते. त्यामुळे त्याचा आविष्कार तत्कालीन विविध कलांतून दृष्टोत्पत्तीस येतो. कामशास्त्रावरील विचारांबरोबरच भारतात मध्ययुगात शाक्त, कोल, कापालिक इ. वामाचारी पंथ निर्माण झाले. जगताच्या उत्पत्तीस कारणीभूत असे पुरुषप्रकृतिमीलन, स्त्रीपुरूषसमागमामुळे येणारी अत्युच्च आनंदाची अनुभूती व त्यातून लाभणारी मुक्ती वगैरे कल्पनांमुळे तसेच इतर वामाचारी पंथांनी प्रतिपादलेल्या चक्रपूजा, पंचतत्त्वे व विविध धार्मिक विधी यांमुळे तत्कालीन प्रचलित धर्मांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ही शिल्पे मंदिरांवर कोरली गेली असावीत. काहींच्या मते ह्या उत्तुंग भव्य वास्तूंना दृष्टबाधा किंवा पिशाचबाधा होऊ नये, म्हणून लावलेले ते गालबोटच आहे. मंदिराच्या प्राकारात फिरणाऱ्या माणसाला या जगतातील ऐहिक सुखाचा परमोच्च बिंदू कोणता हे सर्व प्रकारे दाखवावयाचे आणि नंतर लगेच त्याला मंदिराच्या गाभाऱ्यात नेऊन सोडावयाचे.

मिथुनशिल्प, खजुराहो

तेथील शांत, उदात्त व पवित्र वातावरणामुळे ऐहिक व पारमार्थिक यांतील भेद त्यास तीव्रतेने जाणवून देणे, हादेखील कामशिल्पांमागील एक हेतू असावा. मध्ययुगातील सरंजामशाहीच्या ऐदी, विलासी व काहीशा विकृत मनोविकारांचे हे प्रतिबिंब असावे. त्यांतून भारतील शिल्पकलेची अवनत अवस्था सूचित होते, असाही एक तर्क केला जातो. कामशिल्पांचे प्रयोजन व अर्थ स्पष्ट करणारा कोणताही प्राचीन ग्रंथ वा शिलालेख उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत त्यांविषयी केवळ कल्पना करणेच भाग पडते. तत्कालीन समाजाच्या जीवनमूल्यांच्या एकूण निकषांवर घासून पाहता यांपैकी कोणताच तर्क स्वतंत्रपणे वा ‌एकत्र मिळून, ‘का व कसे’ याचा उलगडा करू शकलेला नाही.

कामातुर नृत्याप्सरा, खजुराहो

तथापि ही शिल्पे कलात्मक दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असून भारत हा त्या बाबतीत अग्रेसर देश म्हणावा लागेल.

एकोणिसाव्या शतकातील सोवळ्या, इंद्रियदमनावर आधारलेल्या नैतिक वातावरणात, कामशिल्प हा अवनत व सुखललोलुप हिंदू मनाच्या विकृतींचा निर्लज्ज आविष्कार आहे आणि तो पराकोटीचा अश्लिल आहे, असे मानले जाणे स्वाभाविक होते. पण आज ह्या दृष्टीकोणात आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. फ्रॉइड, हॅवलॉक एलिस इत्यादींच्या संशोधनामुळे लैंगिक प्रेरणेचे मानवी जीवनातील मूलभूत महत्त्व आज सर्वमान्य झाले आहे. लैंगिक प्रेरणेच्या समाधानाला स्वत:चे असे मूल्य आहे, त्याच्यात पाप तर नाहीच उलट ह्या प्रेरणेला दडपून टाकल्याने मानवी स्वभावाला विकृत वळण लागते, ही कल्पना पाश्चात्त्य जनमानसात रूजली आहे. त्याचबरोबर औद्योगिक समाजात जीवन कृत्रिम, यांत्रिक व म्हणून शुष्क बनते, आपल्या सहजप्रवृत्तींशी इमान राखून त्यांना मोकळेपणाने वाव दिल्याशिवाय माणसाला जीवनातला आनंद अनुभवता येणार नाही व मानसिक आरोग्य टिकविता येणार नाही, ही डी. एच्‌. लॉरेन्स इत्यादींची शिकवणही प्रभावी ठरली आहे. आधुनिक यूरोपीय संस्कृतीला परके असलेला सारे हीन, निकृष्ट मानण्याची प्रवृत्तीही बरीचशी निवळली आहे. त्यामुळे पूर्वग्रह बाजूला ठेवून लैंगिक उपभोगाचा मोकळेपणाने, निर्भरतेने व कलात्मकतेने आविष्कार करणाऱ्या कामशिल्पांचा आदराने आस्वाद घेणे, पाश्चात्त्य मनाला आज शक्य झाले आहे. कामशिल्पाकडे कलाकृती म्हणून आज पाहण्यात येते तसेच औद्योगिक संस्कृतीत आपण हरवून बसलेल्या एका आदिम व म्हणून अधिक निरोगी जीवनाचे प्रतिबिंबही त्यात आढळते.

कामशिल्प हे मानवाच्या सर्जनशील शक्तीचाच कलापूर्ण आविष्कार आहे. म्हणूनच त्याकडे सौंदर्यवादी दृष्टीने पाहणे इष्ट ठरते. अर्थात कोणताही कलाविष्कार कुठल्यातरी रूपाने जीवनाचे दर्शन घडवितोच. कामशिल्पातील जीवनदर्शन निकोपपणे पाहणे आवश्यक आहे. कामशिल्पातील सौंदर्य केवळ उथळ कामवासनेचे प्रतीक नव्हे त्यात वासनेचा रसरशीत आकार व अर्थ आहे.

संदर्भ : 1. Fouchet, Max-Pol Trans. Rhys, Brian, The Erotic Sculpture of India, London, 1960.

2. Lal, Kanwar, The Cult of Desire, Delhi, 1966.

3. Leeson, Francis, Kama Shilpa, Bombay, 1962.

4. Prakash, Vidya, Khajuraho, Bombay, 1967.

5. Shah, A. B., The Roots of Obscenity, Bombay, 1968.

माटे, म. श्री.