कामदेव : हिंदू पुराणकथांत वर्णिलेली, तरूण स्त्री-पुरुषांच्या चित्तांतील प्रेमाची अधिष्ठात्री देवता. कामदेवाचा जन्म प्रथम ब्रह्मदेवाच्या हृदयापासून झाला. तोच पुन्हा श्रीकृष्ण-रुक्मिणी यांच्यापासून प्रद्युम्न नावाने उत्पन्न झाला. मन्मथ, आत्मभू, अनंग, मार, मनसिज, कंदर्प, स्मर, पुष्पधन्वा, पंचशर, रतिपती, मीनकेतन, दर्पक, मदन इ. नावांनीही कामदेवाचा उल्लेख केलेला आढळतो. कामदेवाच्या प्रभावानेच ब्रह्मदेव व त्याची मुलगी संध्या यांच्या चित्तांत परस्परांविषयी कामविकार उत्पन्न झाला. ही गोष्ट पाहून शंकराने ब्रह्मदेवाचा उपहास केला. तेव्हा ब्रह्मदेवाने रागावून कामदेवास शाप दिला. शापानुसार तो शंकराकडू जाळला गेला व अशरीरी झाला. नंतर ब्रह्मदेवाच्या उ:शापाने शंकर-पार्वतीच्या मीलनानंतर तो पुन्हा शरीरधारी झाला. संध्येनेही तपश्चर्या करून विष्णूला संतुष्ट केले आणि ‘जन्मत:च प्राणिमित्रांच्या चित्तांत काम उत्पन्न होऊ नये’ असा वर मागितला. या वरामुळे प्राणी जन्मत:च सकाम नसतात, तर ते तारुण्यात सकाम होतात अशी कथा आहे.
कामदेवाचे धनुष्य व बाण दोन्ही पुष्पमय आहेत. त्याचे धनुष्य इक्षुदंडाचे असल्याचाही उल्लेख आढळतो. रक्तकमल, नीलकमल, आम्रमंजरी, अशोकपुष्प व मोगरा ही पाच पुष्पे त्याचे पाच बाण आहेत.
संमोहन, उन्मादन, शोषण, तापन व स्तंभन यांचाही कामाचे पाच बाण म्हणून उल्लेख आढळतो. बाणांच्या साहाय्याने तो तरुण-तरुणींची हृदये विद्ध करतो. वसंतोत्सवात कामदेवाची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंतऋतू त्याचा मित्र आहे. शुक हे त्याचे वाहन होय. दक्षकन्या ⇨ रती ही त्याची पत्नी. ‘रूपाने अत्यंत सुंदर, अष्टबाहू, चार हातांत शंख, पद्म, धनुष्य व बाण. राहिलेले चार हात रती, प्रीती, शक्ती व उज्ज्वला या चार स्त्रियांच्या स्तनांवर ध्वजावर मकर वा मीन’ असे त्याच्या प्रतिमेचे वर्णन आहे.
जोशी, रंगनाथशास्त्री
“