काफिर – २ : मुहंमद पैगंबरांना विरोध करणारे आणि त्यांच्या मार्फत आलेला ईश्वरी संदेश लोकांपासून दडवून ठेवणार्‍या (कुफ्र) अश्रद्ध मक्कावासी मूर्तिपूजकांसाठी प्रथम ‘काफिर’ हा शब्द वापरात आला. नंतर कुफ्र अल्‌-इन्कार (ईश्वराला न मानणारे) , -जुहूद (ईश्वरास न जुमानणारे),-मुआनद (वरवर ईश्वराला मानणारे, परंतु अश्रद्ध) आणि-निफाक (बाह्यतः  ईश्वराला मानतो असे सांगणारे परंतु खरोखर विश्वास नसलेले) असे काफिरांचे चार प्रकार धर्मशास्त्रात सांगितले गेले, पैगंबरांनी ज्याप्रमाणे मक्कावासी काफिरांविरुद्ध धर्मयुद्ध केले, त्याचप्रमाणे इतर काफिरांशीही लढले पाहिजे आणि त्यांना जिंकले पाहिजे, असे धर्ममत रूढ झाले. परंतु काही प्रमाणात स्वतःचे ईश्वरप्रणीत धर्मग्रंथ असलेल्या ख्रिश्चनांना आणि ज्यूंना, म्हणजे अहल अल्‌-किताबींना, काफिर ही संज्ञा लागू पडत नाही. मुसलमानी राज्यात राहणाऱ्या ज्यूंना आणि ख्रिश्चनांना संरक्षित रहिवासी किंवा धिम्मी म्हणून मान्यता दिली गेली. अर्थात त्यांनी खास कर दिला पाहिजे, ही अट मान्य केली तरच. भारतात सुलतानी साम्राज्य आल्यानंतर मूर्तिपूजक हिंदूंना धिम्मी म्हणून मान्यता द्यावी की नाही, या विषयावर धर्मपंडीत आणि सुलतान यांच्यांत वाद निर्माण झाला होता. परंतु सुलतानांनी धर्मगुरूंचे मत मान्य केले नाही आणि खास कर भरणाऱ्या हिंदूंना धिम्मी म्हणून वागणूक देण्याचा प्रघात पडला.

करंदीकर, म. अ.