काफिर − १ : (१) अफगाणिस्तानातील एक वन्य जमात. त्यांच्या मूळ स्थानाविषयी निश्चित माहिती नाही. काही तज्ञांच्या मते हे ग्रीस वा इराणमधून आलेले असावेत. ह्यांची लोकसंख्या सु. १,५१,६०० (१९६७) होती. बहुतेक काफिर हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या नुरिस्तान जिल्ह्यात व त्याच्या आसपासच्या प्रदेशात राहतात. हा प्रदेश काफिरीस्तान ह्या नावाने पूर्वी ओळखला जात असे. ‘काफिर’ या शब्दाच्या अर्थ अरबी भाषेत धर्महीन, अश्रद्ध वा इस्लामविरोधी  असा होतो. काहींच्या मते ही मूळची द्रविड जमात असावी, तर काही ती इंडो-आर्यन वंशातील असावी, असे मानतात. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस अफगाणिस्तानच्या अब्दूर रहमान या अमीराने काफिरांना बळजबरीने मुसलमान केले परंतु अद्यापि त्यांनी आपला मूळचा धर्म पूर्णतः सोडलेला नाही. त्यात अग्नीस प्राधान्य अनेक देवदेवता आहेत, तसेच पितृपूजेसही महत्त्व आहे. इम्रा व गीश ह्या देवतांची ते पूजा करतात. इम्रा ही प्रजोत्पादक देवता असून गीश ही युद्धदेवता आहे. कुशुमाई, काईम किंवा कुमाइ ही पशुपालिनी व पारध देवता असून ती शेळीच्या रूपात प्रगट होते. काफिरांचा कातीर, काम व वाई जमातींशी वारंवार संबंध येतो. परंतु त्यांच्या संस्कृतीचा त्यांवर परिणाम झालेला नाही. त्यांच्यात भाषिक अगर सांस्कृतिक एकात्मता दिसत नसली, तरी भारतीय संस्कृतीचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला दिसतो. ते चार भिन्न भाषा बोलतात. त्यांचा आतापर्यंतचा इतिहास लढायांचा व धामधुमीचा असला, तरी एके काळी ही जमात फार सुसंस्कृत असावी, असे तज्ञांचे मत आहे. शरीराने हे रेखीव बांध्याचे असून अत्यंत चपळ आहेत. स्त्रियांना त्यांच्या समाजात फारसा मान नाही. लग्न हा अत्यंत साधा विधी असून स्त्रीचा लिलाव होतो व अधिक किंमत देणाऱ्याची ती पत्नी होते. बहुपत्नीकत्व रूढ आहे.मेंढपाळ, शिकार व शेती हे त्यांचे महत्त्वाचे धंदे असून काही काफिर कलाकुसरींच्या वस्तू तयार करतात. पीटर स्नॉय नावाच्या जर्मन संशोधकांने यांचा अभ्यास करून डाय काफिरेन नावाचे पुस्तक १९६२मध्ये प्रसिद्ध केले.(२) दक्षिण आफ्रिकेतील बांटू भाषा बोलणाच्या निग्रो जमातीस ब्रिटिशांनी दिलेली एक संज्ञा. प्रथम हे ट्रांस्केयन क्षेत्रातील (कफ्रारिया) रहिवाशांना हे नाव देण्यात आले. त्यांतील स्वाझी, पोंडो, फिंगो व झुलू या प्रसिद्ध जमाती होत. अलीकडे सर्व निग्रोंना कमीपणा आणण्याच्या दृष्टीने हा शब्द वापरला जातो. दक्षिण आफ्रिका सरकार काफिर ऐवजी बांटू हा शब्द रूढ करीत आहे. ह्यांची संख्या सु. १० लक्ष (१९६१) होती. 

देशपांडे, सु. र.