कल्पनाशक्ति : एक मानसिक शक्ती किंवा सामर्थ्य. ह्या शक्तीमुळे मनात पूर्वानुभवांच्या प्रतिमा किंवा चित्रे तयार होतात तसेच त्यांच्या पुनर्रचनेतून नावीन्यपूर्ण घडणीच्या मानसिक प्रतिमाही तयार होतात. यांतील पहिल्या प्रकारास पुनर्निर्मितीक्षम कल्पनाशक्ती आणि दुसऱ्या प्रकारास नवनिर्मितिक्षम किंवा सर्जनात्मक कल्पनाशक्ती म्हणता येईल. ललित कलाकृती, नवीन तत्त्वप्रतिपादन व नवे शास्त्रीय शोध यांना कल्पनाशक्ती प्रेरित करते.
प्रथम ⇨टॉमस हॉब्जने त्याच्या ऑफ मून नेचर (१६५०) ह्या ग्रंथात कल्पनाशक्तीचे वर्णन ‘इंद्रियानुभवांच्या अस्पष्ट ठशांना उजळा देणारी शक्ती’ असे केले. त्याच्या मते कल्पनशक्ती एक पुननिर्मितीची प्रक्रिया असून, ती मेंदूत घडते. हीच पुननिर्मिती पुढे ‘मानसिक प्रतिमा’ म्हणून ओळखली जाऊ लागली. इंद्रियवेदनप्रकारांगणिक मानसिक प्रतिमांचेही प्रकार पडतात. उदा., दृक्-प्रतिमा, ध्वनि-प्रतिमा, स्पर्श-प्रतिमा, गंध-प्रतिमा, रुचि-प्रतिमा इत्यादी.
मानसिक प्रतिमांच्या स्वरूपाचा सखोल अभ्यास करून ⇨सर फ्रान्सिस गॉल्टनने (१८२२–१९११) एक प्रश्नावली तयार केली. मानसशास्त्रीय अभ्यासासाठी प्रश्नावली तयार करण्याची पद्धती त्यानेच प्रथम सुरू केली (१८८३). प्रतिमाविषयक प्रश्नावलीच्या आधारे व्यक्तीच्या मानसिक प्रतिमा कितपत सुस्पष्ट आहेत, याचे मापन करता येते. गॉल्टनने मानसिक प्रतिमांच्या आधारे कल्पनाशक्तीबाबत केलेले संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. काही व्यक्तींमध्ये मानसिक प्रतिमांची पुनर्निर्मिती करण्याची अगदीच कुवत नसते तर काही व्यक्तींमध्ये प्रत्यक्ष इंद्रियानुभवांइतक्या सुस्पष्ट प्रतिमांची पुनर्निर्मिती करण्याचे सामर्थ्य असते, असे ह्या प्रश्नावलीमुळे आढळून आले आहे.
स्मृतीचा आणि कल्पनाशक्तीचाही तसा जवळचा संबंध आहे. त्यामुळे अनेक वेळा वास्तव व कल्पित यांत सरमिसळ होऊन गोंधळ होतो. तसेच कल्पित घटनाही वास्तव म्हणून सांगितली जाते किंवा वास्तवाचे अतिशयोक्त कल्पितात वर्णन केले जाते [→ स्मृति व विस्मृति]. मानसिक प्रतिमांच्या क्षेत्रातील गॉल्टनच्या संशोधनास एरिक थेन्श (१८८३–१९४०) या जर्मन मानसशास्त्रज्ञाने आणखी संशोधन करून परिणत स्वरूप दिले. विशद अथवा प्रत्ययप्राय (आयडेटिक) प्रतिमेची त्याने व्याख्या केली. पूर्वीच्या इंद्रियवेदनांची अगदी जशीच्या तशी मनात पुननिर्मिती करता येणे, म्हणजे विशद प्रतिमा, असे तो म्हणतो. गॉल्टनच्या संशोधनामुळे याबाबतचे प्रमाणभूत मानसशास्त्रीय प्रयोग कसे असावेत, याचा पायाही घातला गेला. ज्यांची कल्पनाशक्ती अगदी हुबेहूब प्रतिमा पुन्हा निर्माण करू शकते, अशा व्यक्तींनी केलेल्या कथनाचा व कथापद्धतीचाही त्यामुळे मानसशास्त्रात बराच वापर होऊ लागला.
काही व्यक्तींच्या ध्वनिप्रतिमा रंगात्मक असतात. रंगात्मक-ध्वनिप्रतिमेस गॉल्टनने संश्लिष्ट-प्रतिमेचे उदाहरण म्हटले आहे. संश्लिष्टप्रतिमा म्हणजे प्रत्यक्षात एका इंद्रियवेदनाच्या प्रतिमेसोबतच, त्याच तोलाची पण दुसऱ्या इंद्रियवेदनाचीही प्रतिमा समोर येणे.
नवनिर्मितिक्षम किंवा सर्जनात्मक कल्पनाशक्ती म्हणजे पुर्वानुभवांच्या प्रतिमांचा एक नवीनच व्यूह अथवा रचनाबंध किंवा संघटना करण्याची क्षमता होय. कल्पनाशक्तीच्या मुक्त संचारामुळे काही नव्या प्रतिमा तयार केल्या जातात तसेच संवेदनांचीही समृद्धी होते. प्रथम पूर्वानुभव कमीअधिक प्रमाणात मानसिक प्रक्रियेने जागृत होतात. त्यांतूनच नंतर कल्पनाशक्तीमुळे रचनात्मक मानसिक प्रक्रिया कार्य करू लागते. ह्या कार्यप्रवण झालेल्या मानसिक क्षमतेमुळे गतानुभवांची अभिनव प्रकारे पुनर्रचना होऊ लागते आणि अशा प्रकारे एक सर्वस्वी नवीनच आकारबंध निर्माण होतो. सर्जनशील मनात वर्तमानकालीन साध्या अनुभवास त्याच्या उद्दीपकाने निर्माण केलेल्या स्वतःच्या कक्षेपेक्षाही कितीतरी अधिक व्यापकता आणि समृद्धी प्राप्त होते व तो साधा अनुभव ‘अलौकिक’ ठरतो. त्यांतूनच आणखीही इतर प्रतिसादांची अपेक्षा बाळगण्याची प्रवृत्ती मानवी स्वभावाचे वैशिष्ट्य होय. विकासवादी दृष्टिकोनातून पाहू जाता, सर्जनात्मक कल्पनाशक्तीमुळे केवळ अनुभवच अधिक समृद्ध होतो. इतकेच नव्हे, तर परिस्थितीशी प्रभावी अनुकूलन वा समायोजन करण्यासही व्यक्तीस उत्तेजन मिळते.
आधुनिक संशोधनात सर्जनात्मक कल्पनाशक्तीबाबतच्या दोन घटकांवर लक्ष केंद्रित केलेले आढळते : (१) प्रत्यक्ष सर्जनातील प्रक्रियेचे नेमके स्वरूप आणि (२) कल्पनाजालाचे किंवा दिवास्वप्नांचे स्वरूप. ⇨प्रायोगिक मानसशास्त्राचा उगम शारीरक्रियाविज्ञानातील वेदनेंद्रियांसंबंधीच्या संशोधनातून झालेला असल्यामुळे, कल्पनाशक्तीच्या सर्जनात्मक स्वरूपाच्या उच्चतर मानसिक प्रक्रिया कशा घडून येतात, हे शारीरक्रियाविज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही अभ्यासणे अगत्याचे ठरते. तथापि अशा प्रक्रियांबाबत अद्यापही मानसशास्त्रीय किंवा शारीरक्रियाविज्ञानाचे ज्ञान अपुरे आहे त्याचप्रमाणे कल्पनाजाल अथवा दिवास्वप्ने यांबाबतचेही ज्ञान अद्याप अपुरेच आहे. [→ वेदन कल्पनाजाल].
सर्जनात्मक प्रक्रियेबाबत आधुनिक काळात ⇨ग्रॅहॅम वॉलस (१८५८—१९३२) याने केलेले विश्लेषण प्रमाणभूत मानले जाते. त्याने सर्जनात्मक प्रक्रियेचे चार टप्पे सांगितले : (१) पूर्वतयारी – यात व्यासंगाचा व शिक्षणाचा दीर्घ व परिश्रमयुक्त काल अभिप्रेत असतो. (२) अंत:पोषण – यात सर्जनविषयचा अबोध मनात परिपोष होत असावा असे मानले जाते कारण एखादा विचार वा कल्पना जाणिवेत वा बोधमनात पुनःपुन्हा डोकावून जात असते. (३) प्रदीपन – यात सर्जनविषयाचा गाभा बोधमनात एकाएकी प्रगट होतो. (४) विस्तारण आणि पडताळा – यात सर्जनविषयाची तपशीलवार संपूर्ण मांडणी होणे, ती वारंवार पडताळून पाहणे, तीत आवश्यकतेनुसार फेरफार करणे इ. फार परिश्रमाच्या क्रिया होत असतात. यांतूनच सर्जनविषय अंतिम स्वरूपात आकारास येत असतो.
प्रतिभासंपन्न कलांवत, थोर संशोधक आणि मोठे तत्त्वज्ञ यांसारख्या व्यक्तींच्या मुलाखती आणि आत्मवृत्तांतूनही ग्रॅहॅम वॉलसने केलेल्या विश्लेषणाचे प्रत्यंतर आलेले आहे. वॉलसपूर्वी होऊन गेलेल्या ⇨एच्. हेल्महोल्ट्स (१८२१–१८९४) ह्या मानसशास्त्रवेत्त्याच्या मताचीही वरील विश्लेषणास पुष्टीच मिळते. कॅथरिन पॅट्रिक ह्या विदुषीने अनेक कवींच्या व कलावंतांच्या सर्जनात्मक प्रक्रियांचा अभ्यास व उपयोग करून, साधारण दर्जाचा कलावंत आणि अलौकिक प्रतिभेचा कलावंत यांच्या सर्जनात्मक प्रक्रियेतील फरक दाखवून दिला. वॉलसप्रणीत विश्लेषणाच्या अनुरोधाने, हा फरक केवळ अंशात्मकच असतो, प्रकारात्मक नसतो, असे तिचे म्हणणे आहे.
प्रदीपनाचे चंचल स्वरूप विचारात घेऊनच काही ख्यातनाम लेखकांनी आपल्या दैनंदिनीत किंवा नोंद-वहीत अशा एकाएकी प्रकट झालेल्या कल्पनांचे त्या त्या वेळीच टिपण करून ठेवलेले आढळते. उदा., एमर्सन किंवा नाथॅन्येल हॉथॉर्न यांनी त्यांना प्रदीपन अवस्थेत स्फुरलेल्या गोष्टींचे टिपण ठेवलेले आहे. त्याचा त्यांना नंतरच्या लेखनात चांगलाच उपयोगही झालेला आहे. रॉबर्ट लूई स्टीव्हन्सनला असे प्रदीपन स्वप्नांद्वारे होत असे. हेन्री कौएल ह्या अमेरिकन संगीतकारास नवीन संगीतरचना स्फुरत असताना अचानकपणे आपल्या मनात अतिशय संपन्न नाद उसळ्या मारत असल्याचा विचित्र अनुभव येई. अशा विचित्र अनुभवातून प्रदीप्त झालेले संगीत काही वेळा प्रत्यक्षात स्वरबद्ध केले असता, ते अत्यंत मामुली दर्जाचे, तर काही वेळा अतिशय उच्च दर्जाचे ठरल्याचे त्याने नमूद करून ठेवले आहे.
सर्जनशीलतेस जे घटक पोषक ठरतात, ते शोधून काढण्यावर आधुनिक मानसशास्त्रवेत्ते विशेष भर देतात. अशा मानसशास्त्रवेत्त्यांत ए. एच्. मॅस्लो, कार्ल रॉजर्झ, मायकेल ए. व्हालाक, फ्रँक बॅरन, एरिक फ्रॉम इत्यादींचा प्रामुख्याने समावेश होतो. ह्या मानसशास्त्रवेत्त्यांनी ह्याबाबत संशोधन करून काही घटक सांगितले आहेत. ह्या घटकांबाबत त्यांच्यात एकमत नसले, तरी सर्वसाधारणपणे व्यक्तीतील सर्जनशीलतेचा विकास होण्यासाठी पुढील तीन घटकांवर ते विशेष भर देतानाआढळतात : (१) आत्मविश्वासाची वाढ, (२) कठोर आत्मपरीक्षण व (३) अविरत व्यासंग आणि पूर्वतयारी.
कल्पनाशक्ती ह्या संज्ञेच्या वापरासंबंधी काही दुय्यम स्वरूपाचे मतभेद असले, तरी सर्वसाधारणपणे सर्वच मानसशास्त्रवेत्ते तिच्याबाबत भावात्मक दृष्टिकोन स्वीकारताना दिसतात. मानवेतर प्राण्यांत पुनर्निर्मितीप्रधान कल्पनाशक्ती अल्प प्रमाणात असते तथापि सर्जनशील कल्पनाशक्ती त्यांच्यात असते, असे आतापर्यंतच्या प्रयोगांतून तरी निर्णायकपणे सिद्ध होऊ शकले नाही. म्हणूनच केवळ मानवातील एक उच्चतर मानसिक प्रक्रिया म्हणून कल्पनाशक्तीचा विचार केला जातो.
संदर्भ : 1. Downey, J. E. Creative Imagination, New York, 1929.
2. Furiong, e. J. Imagination, New York, 1961.
3. Koestler, Arthur, The Act of Creation, London, 1964.
4. Levi, A. W. Literature, Philosophy and the Imagination, Bloomington, 1962.
5. Sartre, Jean-Paul Trans. Frechtman, Bernard, The Psychology of the Imagination, New York, 1949.
6. Wallas, Graham, The Art of Thought, New York, 1929.
सुर्वे, भा. ग.
“