कडूचिंच : (कडू चोंचे हिं. कडू कोष्ट क. तंडासीर गु. कडवी चिंचडी सं. दीर्घचंचु, कटुचंचु लॅ. कॉर्कोरस ट्रायलॉक्युलॅरिस कुल-टिलिएसी). या वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) ⇨ ओषधीचा प्रसार भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, आफ्रिकेतील उष्ण प्रदेश इ. प्रदेशांत आहे. खोड व फांद्या केसाळ पाने साधी, एकाआड एक, दातेरी व दीर्घवर्तुलाकृती फुलोरे आखूड, कुंठित (वल्लरी) व पानांसमोर फुले पिवळी [→ ताग टिलिएसी], लहान आणि सप्टेंबरमध्ये येतात. बोंडे लांबट, त्रिकोनी वा चौकोनी, चोचदार बिया (राजजिरे) काळ्या आणि त्रिधारी. दुष्काळात पानांची भाजी करतात. धाग्यांपासून दोर बनवितात. बिया कडू असून त्यांचा (किंवा पानांचा) फांट (पाण्यात भिजवून काढलेला रस) तापावर देतात आमवातात आणि अर्बुदावरही (गाठीवरही) बिया देतात, खोड व फांद्यांपासून मिळणारे श्लेष्मल (गिळगिळीत) द्रव्य शामक असते.
हेर्लेकर, न. द.