कठडा : एक वास्तुरचनाविशेष. विविध अर्थांनी ही संज्ञा वापरली जाते. कठड्याचा सर्वसाधारण उपयोग संरक्षणासाठी असून मानवी देहरचनेच्या प्रमाणानुसार कठड्याची उंची व इतर स्वरूप ठरविले जाते. मोकळ्या जिन्याच्या दोन्ही अंगांस संरक्षक आधार म्हणून कठडा असतो.
चंद्रशाला वा सज्जा यांतही संरक्षणाच्याच दृष्टीने कठड्याची योजना असते. सज्जामध्ये बसून अथवा उभे राहून विहंगमावलोकन करता यावे, म्हणून प्राय: जाळीदार कठडे बांधतात. जाळीदार कठड्याच्या रचनेत भौमितिक वा पानाफुलांचे आकार कलात्मक रीत्या गुंफलेले असतात. त्यामुळे वास्तूवर एक नाजुक लेणे चढविल्यासारखे वाटते.
वास्तुरचनेत मर्यादा दिग्दर्शित करण्यासाठीही कठड्याचे (रेलिंग) आयोजन करण्यात येते. पूर्वी देवालये, नगरे, खेडी यांभोवती कठडे उभारत. संकटनिवारणार्थ या कठड्यांच्या पृष्ठभागांवर विविध सांकेतिक आकारांचे शिल्पांकन करण्यात येई. त्यामुळे यक्ष, किन्नर यांसारख्या देवतांचे शिल्पांकन कठड्यांशी संलग्न झाले. धार्मिक वास्तूंच्या रक्षणासाठी जे कठडे उभारले गेले, त्यांच्या आकारयोजनेत पृथ्वीवरील मर्त्य मानवाने निर्मिलेले अपवित्र वातावरण व धार्मिक वास्तूंत असणारे स्वर्गीय शुध्द वातावरण यांच्या मर्यादा सूचित केलेल्या असतात. सांची येथील स्तूपाचे कठडे या बाबतीत प्रसिध्द आहेत. कठड्यांचे अष्टकोनी उभार व त्यांवर खोदलेली नाग, सूर्यफूल, कमळ, यक्ष, किन्नर यांची शिल्पे आध्यात्मिकतेची सूचक ठरतात.
ज्याकाळी नगरसंरक्षणासाठी कठडे उभारले गेले, त्याकाळी श्वापदांना त्यांवरून उड्या मारून वा त्यांस धडक देऊन नगरात शिरता येऊ नये, म्हणून कठड्यांची उंची व मजबूतपणा यांवर भर देण्यात आला. दुर्गनिर्मितीची प्रथम अवस्था म्हणजे हे कठडे होत. यूरोपात प्रार्थनामंदिरांच्या परिसरांत जे भव्य पुतळे उभारले गेले, त्यांच्याभोवती कठडे उभारण्यात येत. त्यांचे प्रमाण पुतळ्याच्या आकाराशी सुसंगत ठेवले जाई.
वास्तूचे संरक्षण करून तिचे सौंदर्य वाढविणारा हा महत्त्वाचा वास्तुघटक आहे.
गटणे, कृ. ब.
“