कटक : ओरिसा राज्याची १९५८ पूर्वीची राजधानी आता कटक जिल्ह्याचे प्रमुख ठाणे, लोकसंख्या औद्योगिक व शासकीय वस्तीविभागांसह २,०५,७५९(१९७१). महानदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या शिखरस्थानी, पाण्याने वेढलेल्या या ठिकाणी, संरक्षक तटबंदी करून अनंगभीमदेव राजाने तेराव्या शतकात येथे बाराबती नावाने प्रसिध्द असलेला किल्ला बांधला. हा किल्ला नऊ मजल्यांचा होता. सध्या तो भग्नावस्थेत असून त्याचे महाद्वार प्रेक्षणीय आहे. तो १८०३ मध्ये इंग्रजांनी भोसल्यांकडून घेतला. याशिवाय येथील लालबाग, राजप्रासाद, जामा मशीद, अमरेश्वर मंदिर, जैन मंदिर, चर्च, बाराबती स्टेडियम व शहीद भवन प्रेक्षणीय आहेत. शहरात उत्कल विद्यापीठ, प्रसिध्द रॅव्हनशा महाविद्यालय (स्था. १८६३), वैद्यक, अभियांत्रिकी व इतर महाविद्यालये असल्याने हे शैक्षणिक केंद्र समजले जाते. ओरिसाचे उच्च न्यायालय येथेच आहे. मद्रास-कलकत्ता राजमार्ग व आग्नेय रेल्वेचा लोहमार्ग कटकवरून जातो. येथून तालचेर कोळसाक्षेत्राकडेही एक फाटा जातो. येथील महानदीवरचा पूल भव्य आहे. कटक महानदी जलमार्गाने चांदबाली आणि फॉल्स पॉइंट बंदरांशी जोडले आहे. आसमंतातील समृध्द भातशेतीमुळे हे तांदळाच्या व्यापारासाठी प्रसिध्द असून येथे भातसंशोधन केंद्र आहे. याशिवाय कटकच्या उत्तरेकडील चौद्वार येथे कापड, कागद व लोखंडी नळ्यांचे कारखाने, दक्षिणेकडील बारांग येथे काचकारखाना आणि खुद्द कटकमध्येच कित्येक छोटे उद्योग आहेत. येथील सोन्याचांदीचे जाळीदार नक्षीकाम आणि लाख व हाडे यांपासून बनविलेल्या वस्तू विख्यात आहेत.
ओक, शा. नि.