कझॅन : तातर ह्या रशियन स्वायत्त प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या ८,६९,००० (१९७०) कझांका-व्होल्गा संगमाजवळ, गॉर्कीच्या पूर्वेस ३२० किमी. वसलेले हे औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र अंतर्गत जलवाहतुकीसाठी उत्तम बंदर असून, पूर्व-पश्चिम लोहमार्गावरील एक महत्त्वाचे केंद्र आहे. विमाने, यंत्रे, हत्यारे, रसायने, बंदुकीची दारू, चामड्याच्या वस्तू, तेलशुध्दी, साबण, ग्लिसरीन, सौंदर्यप्रसाधने, फर, तांबे शुध्द करणे, सिगारेट, दारू गाळणे, कापड वगैरे महत्त्वाचे उद्योग येथे आहेत. येथील क्रेमलिन, कॅथीड्रल, मनोरा, मठ इ. जुन्या इमारती अजून प्रेक्षणीय आहेत. १८०४ च्या सुमारास स्थापन झालेले विद्यापीठ, तांत्रिक व इतर विद्यालये येथे आहेत. गोल्डन होर्डच्या खानाने १४३७ मध्ये जुन्या कझॅनजवळ स्थापिलेले हे शहर १५५२ मध्ये इव्हान द टेरिबल याने घेतले. क्रांती व १९२१ – २२ चा दुष्काळ यांचा तडाखा याला बसला. १९१७ मधील तातारांच्या राष्ट्रीय चळवळीचे हे केंद्र होते.
लिमये, दि. ह.