कक्कय्य : (सु. १२ वे शतक). कर्नाटकात होऊन गेलेला एक वीरशैव संत. तो जातीने ढोर असून मूळचा माळव्याचा (मध्य प्रदेश) रहिवासी होता. ⇨बसवेश्वरांच्या वीरशैव पंथाची कीर्ती ऐकून तो बसवकल्याण येथे गेला व ⇨ वीरशैव पंथ स्वीकारून त्याने पंथप्रचाराचे भरीव कार्य केले. वीरशैव पंथात त्याला उच्च स्थान आहे. स्वत: बसवेश्वर त्याला आपला आजोबा मानीत. ‘कायकवे कैलास’ ह्या वीरशैव तत्त्वास अनुसरून बसवकल्याण येथेही तो आपला परंपरागत व्यवसाय करून चरितार्थ चालवी. चेन्नबसवांसोबत उळवीस (जि. कारवार) जात असता,वाटेत कक्केरी येथे त्याने समाधी घेतली. त्याची काही कन्नड ‘वचने’ उपलब्ध आहेत. त्याचे अनुयायी कर्नाटकात व महाराष्ट्रात असून ते ‘कक्कय्य समाज’ या नावाने ओळखले जातात.
पाटील, म. पु.