कंदुकूरि वीरेशलिंगम्‌ : (१६ एप्रिल १८४८ — २७ मे १९१९). आधुनिक तेलुगू गद्याचे जनक, अष्टपैलू लेखक, पत्रकार व समाजसुधारक. जन्म राजमहेंद्री येथे. त्यांचे वडील सुब्बरायुदू हे काकिनाडा येथे कारकून होते. वीरेशलिंगम्‌ चार वर्षांचे असतानाच ते वारले. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ नोकरी करून पुढे १८७० मध्ये ते मॅट्रिक झाले. त्यांनी दोन इंग्रज अधिकाऱ्यांना तेलुगू शिकविण्याचे काम केले त्यांपैकी बरो यांनी वीरेशलिंगमांना आपल्या शाळेत शिक्षकाची नोकरी दिली. नंतर कारंगी व धवलेश्वरम्‌ येथे ते काही काळ मुख्याध्यापक होते. पुढे राजमहेंद्री येथील सरकारी महाविद्यालयात तेलुगूचे दुय्यम पंडित म्हणून त्यांनी अनेक वर्षे नोकरी केली.

कंदुकूरि वीरेशलिंगम्

वीरेशलिंगम्‌ यांना आधुनिक तेलुगूतील कादंबरी, नाटक, उपरोध, वृत्तपत्र इत्यादींचे जनक मानण्यात येते. भारतीय प्रबोधनकाळात आधुनिकत्वाचे लोण स्वभाषिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते अव्याहतपणे झटले. त्यांनी विपुल गद्यलेखन केले असून त्यांच्या लहानमोठ्या ग्रंथांची संख्या सु. १३० भरते. तर्कशास्त्र, नीतिशास्त्र, ज्योतिष, रसायनशास्त्र,प्राणिशास्त्र, व्याकरण इ. ललितेतर विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत. म्हणूनच त्यांना ‘गद्यतिकन्ना’ आणि ‘गद्यब्रह्म’ ह्या उपाध्या लावल्या जातात.

राजशेखर चरित्र (१८८०) ही त्यांची प्रदीर्घ कादंबरी प्रथम त्यांच्याच विवेकवर्धिनी (१८७४) मासिकात क्रमशः प्रसिद्ध झाली. तेलुगूतील ही आद्य कादंबरी होय. कलात्मकतेपेक्षाही तिच्यात तत्कालीन तेलुगू समाजाचे जे वास्तवपूर्ण दर्शन घडते, ते विशेष महत्त्वाचे आहे. रेव्ह. हचिन्सनने तिचा फॉर्च्यून्स व्हील या नावाने इंग्रजीत अनुवादही केलेला आहे तसेच कन्नडमध्येही तिचा अनुवाद झाला.

कादंबरीप्रमाणेच स्वतंत्र तेलुगू नाटकाचे जनकही वीरेशलिंगम्‌ हेच मानले जातात. ब्रह्म विवाहमु (१८७८) हे त्यांचे पहिले सामाजिक नाटक असून जरठ-कुमारी विवाह हा त्याचा विषय आहे. व्यवहार-धर्मबोधिनी (१८७९) हे त्यांचे दुसरे सामाजिक नाटक असून १८८० मध्ये त्याचा यशस्वी प्रयोगही करण्यात आला. विवेकदीपिका हे त्यांचे सामाजिक नाटक अपूर्ण आहे. त्यांनी पौराणिक कथांवर आधारित पण स्वतंत्र अशी काही नाटकेही लिहिली असून त्यांत प्रल्हाद नाटकमु (१८८५), दक्षिण गोग्रहणमु (१८८५), सत्य हरिश्चंद्र नाटकमु (१८८६) इत्यादींचा अंतर्भाव होतो. यांशिवाय त्यांची अनेक प्रहसनेही संग्रहरूपाने प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या लोकप्रिय नाट्यसाहित्यात समाजातील दांभिकता, कर्मठता, अनीती, अनिष्ट रूढी इत्यादींवर कठोर टीका केलेली आढळते.

वीरेशलिंगम्‌ यांच्या व्यासंगाचे प्रत्यंतर घडविणारा प्रख्यात ग्रंथ म्हणजे आंध्र कवुल चरित्रमु (१८८७). तीन खंडांतील या ग्रंथात आंध्र कवींची चरित्रपर माहिती व त्यांच्या काव्याचे रसग्रहण आहे. तेलुगू साहित्यात हा प्रमाणभूत संदर्भग्रंथ मानला जातो. त्यांनी संपादित केलेल्या उत्तर हरिवंश,नाचन सोमना… इ. ग्रंथांतून त्यांच्या संशोधन-समीक्षणाची योग्यता दिसून येते.

काही संस्कृत व इंग्रजी ग्रंथांचा त्यांनी तेलुगू अनुवाद केला आहे. त्यांपैकी संस्कृतवरून केलेले शाकुंतलमु (१८८३), प्रबोधचंद्रोदयमु (१८८५),नीतिचंद्रिका-संधी (१८८५) इ. अनुवाद उल्लेखनीय होत. गोल्डस्मिथच्या द ट्रॅव्हलरचा पथिक विलासमु (१८९२) हा काव्यानुवाद तसेच शेरिडनच्या द ड्यूनाचा राग मंजरी (१८८५), स्विफ्टच्या गलिव्हर्स ट्रॅव्हल्सचा सत्यराज पूर्वदेश यात्रलु (२ भाग, १८९१, १८९३) आणि शेक्सपिअरच्या काही नाटकांचे गद्य व पद्य अनुवाद त्यांनी केले आहेत.

वीरेशलिंगम्‌ यांनी काही खंडकाव्येही लिहिली आहेत. त्यांचे विषय पारंपरिक आणि वळण पंडिती आहे. त्यांच्या इतर काव्यरचनेत प्राचीन काव्यातील दोषांवर उपरोधपूर्ण टीका (अभाग्योपाख्यानमु, १८७६) तसेच धर्म व नीती हे विषय आले आहेत. यांव्यतिरिक्त त्यांनी केवळ स्त्रियांसाठीही काही ग्रंथ लिहिले आहेत. येशू ख्रिस्त, राजा राममोहन रॉय इत्यादींची चरित्रेही त्यांनी लिहिली. स्वीय चरित्रमु (१९११) हे त्यांचे आत्मचरित्र असून त्यातील सामाजिक दर्शन वस्तुनिष्ठ आहे.

त्यांचे स्फुट लेखन विपुल असून ते ग्रंथरूपाने संकलित केले आहे. त्यात लँबच्या टेल्स फ्रॉम शेक्सपिअरचा तेलुगू अनुवाद, भारतीय संस्थानांचे संक्षिप्त इतिहास, प्रसिद्ध स्त्रियांची चरित्रे, सामाजिक निबंध तसेच त्यांनी दिलेली व्याख्याने यांचा अंतर्भाव होतो.

वीरेशलिंगम्‌ ब्राह्मो समाजाचे अनुयायी होते व त्यांनी धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक सुधारणांसाठी आपल्या वाणीचा व लेखणीचा पुरेपूर उपयोग केला. म्हणूनच केवळ तेलुगू साहित्यातच नव्हे, तर आंध्रच्या सांस्कृतिक परंपरेतही त्यांचे स्थान एका युगप्रवर्तकाचे आहे. त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी होती. ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’च्या सुरुवातीच्या सभासदांपैकी ते एक होते. मद्रास येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : Narla, V. R. Veeresalingam, Delhi, 1968.

टिळक, व्यं. द.