कानोर: (बंखोर इं. इंडियनहॉर्सचेस्टनट लॅ. एस्क्यूलसइंडिका कुल-सॅपिंडेसी). सु. ३० मी. उंच व ३ मी. घेराचा हा पानझडी, भव्य व शोभिवंत वृक्ष भारतात वायव्येस काश्मीर, पंजाब, उ. प्रदेश (१,२५०-३,१०९ मी. उंचीवर) तसेच सिंधू ते नेपाळ, अफगाणिस्तान या ठिकाणी आढळतो. एप्रिल ते जून या काळात प्रथम कोवळी ताम्रवर्णी पाने व फुलांच्या कळ्या येऊ लागतात नंतर हा वृक्ष भरपूर हिरव्या पानांनी व फुलांनी बहरल्यावर फार सुंदर दिसतो.खोडावरची साल लांब पट्ट्यांनी सोलून निघते. पाने लांब देठाची, संयुक्त, समोरासमोर व हस्ताकृती विभागलेली दले ५-९ सवृंत (देठ असलेली), मोठी, दातेरी, टोकदार, फांद्यांच्या टोकांस परिमंजरीय फुलोरा असून त्यावर एकलिंगी व द्विलिंगी, पांढरी, लालसर व पिवळ्या छटेची, अनियमित फुले येतात. [→ फूल]. फळे (बोंडे) बिनकाटेरी, चिवट व तीन शकलांनी फुटणारी बीजे १-२, मोठी व गडद पिंगट असतात. इतर शारीरिक लक्षणे ⇨सॅपिंडेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. पाने व कोवळ्या फांद्या जनावरे खातात फळे खाद्य असून घोड्यांना पोटशुळा वर देतात. बियांचे तेल संधिवातावर चोळतात. लाकूड हलके, फिकट व नरम असून उघड्यावर टिकाऊ नसते. ते कापण्यास व रंधण्यास सोपे असून त्यास झिलई चांगली होते. बांधकाम, खोकी, पाण्याच्या टाक्या, पिंपे, आगगाड्यांच्या डब्यातील तावदाने इत्यादींकरिता वापरतात.
परांडेकर, शं. आ.
“