कानाझावा : पूर्वीचे यामाझाकी. जपानच्या मध्य होन्शू बेटातील इशिकावा प्रांताचे मुख्य ठाणे. लोकसंख्या ३,६१,००० (१९७०). १६०३-१८६७ पर्यंत जपानचे पेशवेपद (शोगुनेट) सांभाळणाऱ्या टोकुगावांनी कागा प्रांतासह कानाझावाची जहागिरी श्रीमंत माएदा सरदारांना दिली. तेंव्हापासून तीनशे वर्षे ते या कुटुंबाकडेच राहिले. त्यावेळच्या शहराच्या काही वेशी, कोटाचा भाग व किल्ल्यातील इमारती आजही दिसतात. येथील केनरोकुएन उद्यानाची गणना जपानमधील अत्यंत सुंदर उद्यानात होते.येथील लाखकाम व कुटानी नावाने प्रसिद्ध असलेली चिनी मातीची भांडी सुप्रसिद्ध आहेत. याशिवाय येथे विविध उंची शोभेच्या वस्तू होतात. येथे रेशमी, सुती, लोकरी, रेयॉन व नायलॉन कापडाच्या गिरण्या असल्याने शहराची औद्योगिक केंद्रात गणना केली जाते.
ओक, द. ह.