कानवेल : (साकळवेल, करकंडीचा वेल हिं. रायधानी क.कुरियड्डी लॅ. व्हेंटिलॅगो कॅलिक्युलेटा कुल – ऱ्हॅम्नेसी). ही वेल [→ महालता] भारताच्या उष्ण भागातील पानझडी जंगलात सापडते. शिवाय कुमाऊँ, नेपाळ ते भुतान, सिल्हेट, जावा इ. ठिकाणीही तिचा प्रसार आहे. पाने मध्यम आकाराची (५ – १३ x २.५ – ७ सेमी.), दंतुर कोवळी पाने विशेषत: खालून लवदार फुलोरा परिमंजरीय वल्लरी [→ पुष्पबंध] व त्यावर दुर्गंधी, हिरवट, लहान व असंख्य फुले किंजपुट लोमश [→फूल] फळ एकबीजी, सपक्ष, तळाशी संवर्ताने (फुलाच्या सर्वांत बाहेरच्या मंडलाने) अर्धे वेढलेले, कपाली (शुष्क, कठीण व आपोआप न फुटणारे फळ) व त्यात एक कप्पा. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ऱ्हॅम्नेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे साल व कोवळ्या प्ररोहांचा (कोंबांचा) रस हिवतापात होणाऱ्या अंगदुखीवर लावतात.
पहा :खांडवेल.
जोशी, रा. ना.