कातरा कीड: ह्या किडीच्या अळ्या (ॲमसॅकाच्या जाती) ज्वारी, मका, कपाशी, एरंड इ. पिकांवर व सर्व प्रकारच्या वनस्पतींवर आपली उपजीविका करतात. त्या ३.८-५ सेंमी. लांब असून त्यांच्या सर्वांगावर उदी रंगाचे दाट केस असतात. त्यांच्या पतंगांचे साधरणतः तीन प्रकार दिसून येतात. पहिल्या प्रकारच्या पतंगांचे शरीर किरमिजी रंगाचे असून त्यावर काळे पट्टे व ठिपके असतात. पंखांच्या पहिल्या जोडीच्या बाह्य कडा शेंदरी असतात. दुसऱ्या प्रकारचा पतंग नारिंगी असून त्याच्या अंगावर काळे पट्टे व ठिपके असतात. तसेच पंखांची पहिली जोडी पांढरी व त्यांच्या पुरस्थ (मागील) कडा लाल असतात. पंखांची मागची जोडी पांढरी असून त्यांवर काळे ठिपके असतात. तिसऱ्या प्रकारच्या पतंगाचे शरीर पिवळे असून पंखांच्या पहिल्या जोडीच्या बाह्य कडा पिवळ्या असतात.
त्यांच्या माद्या गवताच्या किंवा झाडाझुडपांच्या पानांच्या खालच्या बाजूवर पिवळसर पांढरी अंडी घलतात. साधारणतः पाच दिवसांत अंडी उबून त्यांतून अळ्या बाहेर पडतात व तेथेच पाने खाऊ लागलात व नंतर पिकांवर आक्रमण करतात.
तीन आठवडयांत त्यांची पूर्ण वाढ होते व त्या जमिनीत शिरुन कोश तयार करतात व पुढील पावसाळ्यापर्यंत सुप्तावस्थेत राहतात. त्यांची वर्षभरात एक पिढी तयार होते. ते फार अधाशीपणाने खातात व सर्व पीक नष्ट करतात. त्यामुळे पुनःपुन्हा पेरणी करावी लागते. या किडीवर निश्चित उपाय माहीत नाहीत. तथापि एक हेक्टर क्षेत्रावर ३.७५-५ किग्रॅ. पायरेथ्रम चारशे लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास उपयुक्त ठरते.
बोरले, मु.नी.
“