कंकर : खडक. मृदेच्या तळालगतच्या भागात आढळणाऱ्या अनियमित थरासारखा किंवा गुठळ्यासारखा आकार असणाऱ्या कॅल्शियम कार्बोनेटच्या (चुनखडीच्या) राशीचे नाव. उष्णकटिबंधातील मॉन्सून जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) असणाऱ्या प्रदेशातील मृदेखाली कंकर तयार होतात. अशा प्रदेशात काही थोडे महिने पावसाळा टिकतो व त्यानंतरचा दीर्घकाळ कोरड्या ऋतूचा असतो. जमिनीत मुरणाऱ्या पाण्यात कॅल्शियम कार्बोनेट विरघळत असते. कोरड्या ऋतूत ते पाणी केशाकर्षणाने (केसासारख्या सूक्ष्म फटींद्वारे वर खेचले गेल्याने) जमिनीच्या पृष्ठाकडे येऊ लागते व ते सुकून त्याच्यात विरघळलेले कॅल्शियम कार्बोनेट हे लवण मृदेच्या तळाशी निक्षेपित होते. ते साचून कंकराचे अनियमित थर वा गुठळ्या (संधिते) तयार होतात. कंकर मुख्यतः कॅल्शियम कार्बोनेटाने बनलेले असते व त्याच्यात लोहाची ऑक्साइडे किंवा हायड्रॉक्साइडे, सिलिका, माती इ. खनिज व क्वचित अपघटित (कुजलेले) जैव पदार्थ हेही कमी अधिक प्रमाणात मिसळलेले असतात. गंगा-सिंधू मैदानातील जुन्या जलोढात (गाळात) व नर्मदेच्या खोऱ्यातही कंकर आढळते. महाराष्ट्रातील चुनखडी ही कंकराचाच एक प्रकार आहे. बांधकामाचा चुना करण्यासाठी कंकराचा उपयोग होतो.
ठाकूर, अ. ना.