काझांटझाकीस, निकोस : ( २ डिसेंबर १८८५-२६ ऑक्टोबर १९५७). आंतरराष्ट्रीय कीर्तीचा अष्टपैलू ग्रीक साहित्यिक. त्याचा जन्म क्रीट येथे झाला. अथेन्स आणि पॅरिस येथे अनुक्रमे कायदा व तत्वज्ञान ह्या विषयांचे शिक्षण त्याने घेतले. विख्यात फ्रेंच तत्वज्ञा बेर्गसॉं हयाच्या हाताखाली शिकण्याची संधी त्याला मिळाली. फ्रेंच, इटालियन यांसारख्या युरोपीय भाषा त्याने आत्मसात केल्या होत्या. अभिजात साहित्यकृतींच्या अनुवादासाठी यूनेस्कोने नेमलेल्या मंडळाचा प्रमुख म्हणून काही काळ त्याने काम केले. त्याच्या आयुष्याचा बराचसा काळ परदेशात – विशेषतः फ्रान्समध्ये (पॅरिस) गेला.
ओडिसी (१९३८, इं.भ.द ओडिसी : अ मॉडर्न सीक्केल) हे त्याचे ३३,३३३ ओळींचे महाकाव्य म्हणजे महाकवी होमरने लिहिलेल्या अभिजात महाकाव्यशैलीचे अनुकरण नाही. उलट ते स्वच्छंदतावादी आणि बरोक परंपरेतले वाटते. विशेषणांचा व उपमा-रुपकादी अलंकारांचा त्याने केलेला वापर केवळ थक्क करणारा आहे. ह्या काव्यातून काझांटझाकीसने आपले तत्वज्ञान मांडलेले आहे. मानवाची तीन कर्तव्ये तो मानतो : पहिले मनाचे, म्हणजे असंगत जीवनावर संगती लादण्याचे दुसरे हृदयाचे, म्हणजे मन आणि जड ओलांडून सत्याची स्पंदने जाणण्याचे आणि तिसरे म्हणजे मन आणि जड ह्यांच्यापासून स्वतःला मुक्त करण्याचे आणि शोकात्म हर्षात जीवनाची विधायक पुनर्रचना करण्याचे. ही तीन कर्तव्ये पार पाडत असताना मानव स्वतःच्या अहंकाराचा शोध घेणे, स्वतःच्या वंशमूलांचा शोध घेणे, सर्व वंशांच्या दुःखात सहभागी होणे व सर्व विश्र्वाशी तादात्म्य पावणे ह्या चार परीक्षांतून पार पडतो. काझांटझाकीसचे हे तत्वज्ञान त्याच्या कादंबऱ्यांतूनही आले आहे. Alexis Zorbas (1946, इं.भा.झोर्षा द ग्रीक), Ho Cristos xanastarvonetai (1954, इं.भा.द ग्रीक पॅशन), Ho telephtaios Peirasmos (1955, इं.भा. द लास्ट टेंप्टेशन ऑफ ख्रा इस्ट) ह्या त्याच्या काही प्रसिध्द कादंबऱ्या.
झोर्बा द ग्रीकमध्ये झोर्बा हा साहसी कलंदर व त्याचा तत्वचिंतक विरक्त मित्र ह्यांच्या स्नेहसंबंधांच्या चित्रणातून मानवी जीवनातील मूलभूत संघर्ष मांडले आहेत. द ग्रीक पॅशन ही कादंबरी ग्रीक शेतकऱ्यांच्या बोलीभाषेत लिहिलेली असून देह व चैतन्य हयांच्यातील संघर्ष हा विचा विषय आहे. द लास्ट टेंप्टेशन ऑफ ख्राइस्टमध्ये त्याने ख्रिस्ताची अतिवास्तव प्रतिमा रेखाटल्यामुळे ती वादग्रस्त ठरली. काझांटझाकीसला साहित्यिक म्हणून मिहालेली आंतरराष्ट्रीय कीर्ती मुख्यतः त्याच्या कादंबरीलेखनामुळेच आहे. अनेक यूरोपीय भाषांत त्याच्या कादंबऱ्यांचे अनुवाद झालेले आहेत.
त्याच्या तत्वज्ञानपर लेखनात नीत्शे व बेर्गसॉं हया दोन तत्वज्ञांवरील प्रबंध आणि Salvatores Dei (1928) हा मार्क्सवादाचे विश्र्लेषण करणारा निबंध विशेष महत्वाचे होत. दान्तेचे दिव्हीना कोम्मेदीआ (डिव्हाइन कॉमेडी), गटेचे फाउस्ट ह्यांसारख्या काही श्रेष्ठ यूरोपीय साहित्यकृतींचे त्याने ग्रीक अनुवाद केले.
जपान, चीन, स्पेन, इंग्लंड ह्यांसारख्या देश्यांची त्याने लिहिलेली प्रवासवर्णने लोकप्रिय ठरली. बायबलमधील कथाभागांवर आधारलेली काही नाटकेही त्याने लिहिलेली आहेत.
जर्मनीतील फ्रायबुर्ग येथे तो निधन पावला.
संदर्भ:1. Kazantzakis, Helen, Nikos Kazantzakis : A Biography Based on His Letters, New York, 1968.
2. Kazantzakis, Nikos Trans. Kimon, Friar, The Odyessey : A Modern Sequel, New York, 1958.
कुलकर्णी, अनिरुध्द