औषधिकल्प: आयुर्वेदीय साहित्यात एकंदन ७३ कल्पांचा उल्लेख आढळतो. सुलभता व सुबोधता ह्या दृष्टिकोनातून यांची विभागणी १३ गटांत केली आहे. ह्या कल्पांची यादी प्रथम अकारविल्हे दिली असून त्या त्या कल्पापुढे त्याचा गट क्रमांक दिला आहे. ह्या योजनेमुळे कल्प सहज सापडणे व समजणे अशी दुहेरी सोय साधली गेली आहे.

गट क्रमांक १ : (१) कल्क : ओले द्रव्य पाट्यावरवंट्यावर चटणीप्रमाणे वाटून तयार केलेला गोळा. (२) पुटपाक : कमळ, कुडा, जांभूळ, वड इ. वृक्षांच्या ताज्या जाड व मऊ पानांत कल्क गुंडाळावा व तो दोऱ्याने बांधावा. नंतर त्यावर ओल्या कणकेचा चिकट जाड लेप द्यावा आणि मग त्यावर चिखल लिंपावा. हा ओला गोळा रानशेणीच्या विस्तवात लाल होईपर्यंत भाजावा व लागलीच तो गोळा बाहेर काढून त्यावरील कणीक, माती व पाने ही दूर करावीत. ह्यास पुटपाक म्हणतात. (३) स्वरस : ओल्या वनस्पतीमधील द्रवभाग अलग करतात तो स्वरस होय. (४) रस : वनस्पतीचे कोरडे सूक्ष्म चूर्ण समभाग पाण्यात चोवीस तास भिजत घालून मग ते चांगले कुसकरून त्यातील द्रवभाग अलग करतात त्याला रस म्हणतात. (५) हिम : वनौषधीची भरड पूड सहापट पाण्यात सायंकाळी भिजत घालावी व ते रात्रभर झाकून ठेवावे. सकाळी ते मिश्रण चांगले कुसकरून घुसळून त्यातील द्रवभाग अलग करावा. ह्या द्रवास शीत, शीतकषाय अथवा हिम म्हणतात. (६) फांट : काष्ठौषधी द्रव्याची ४ तोळे भरड पूड एका भांड्यात ठेवावी. तीवर उकळते पाणी १६ तोळे ओतावे व त्या भांड्यावर लागलीच झाकण ठेवावे. पाणी निवले अथवा द्रव्य तळाशी बसले की, हलक्या हाताने वरचा निवळ द्रवभाग अलग करावा. ह्या द्रवास फांट म्हणतात. (७) मंथ : सोळा तोळे थंड पाण्यात औषधाचे सूक्ष्म चूर्ण ४ तोळे घालावे व ते मातीच्या भांड्यात घुसळून त्यातील द्रवभाग बाजूस करावा. ह्या द्रवास मंथ म्हणतात. (८) कषाय : वनस्पतीची भरड पूड रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी यथोचित पाण्यात, अपेक्षित द्रवभाग शिल्लक राहीपर्यंत उकळून, त्यातील गाळून घेतलेल्या द्रवास कषाय किंवा काढा म्हणतात. (९) प्रमथ्या : आठपट पाण्यात कल्क उकळून त्यातील इष्ट द्रव भाग गाळून घेतात, तो प्रमथ्या होय. (१०) उदक : (अ) नारिकेलोदक – नारळातले पाणी. (आ) हंसोदक – अगस्ति नक्षत्र उगवल्यानंतरचे पावसाचे पाणी. (इ) आरोग्यांबु – आटवून चतुर्थांश उरविलेले पाणी. (ई) उष्णौदक – अष्टमांश उरविलेले पाणी. (उ) तंडुलोदक – आठपट पाण्यात तांदूळ घालून कुसकरून गाळून घेतलेले पाणी. (ऊ) तुत्थोदक – 5 तोळे पाण्यात दोन गुंजा मोरचूद विरवून तयार केलेले पाणी. (ए) चूर्णोदक – ५ तोळे पाण्यात 2 गुंजा चुना विरवून तयार केलेले पाणी. (ऐ) सुगंधी उदक – कापूर, वाळा, पाटलपुष्प इ. सुगंधी पदार्थांचा वास लावून तयार केलेले पाणी. (ओ) शर्करोदक – साखरपाणी. (औ) गुडोदक – गूळपाणी. (अं) मधूदक – मधपाणी. (अ:) षंडगोदक – नागरमोथा, चंदन, सुंठ, पिवळा वाळा, पित्तपापडा व काळा वाळा ह्या सहा औषधांनी सिद्ध केलेले पाणी. हे ज्वरात देतात. (११) रसक्रिया : स्वरस, रस, हिम, कषाय इत्यादींपैकी कोणताही द्रव मंद विस्तवावर आटवून तयार केलेल्या घन व शुष्क कल्पास रसक्रिया म्हणतात. (१२) मंड : तयार झालेल्या पदार्थावरील निवळीस मंड म्हणतात. उदा., घृतमंड, दधिमंड, सुरामंड, लाजामंड इत्यादी.

क्र. 

नाव 

गट क्रमांक 

क्र. 

नाव 

गट क्रमांक 

क्र. 

नाव 

गट क्रमांक 

१. 

अगद 

२ 

२७. 

तुषांबु 

८ 

५३. 

वटिका 

२ 

२. 

अंजन 

२ 

२८. 

द्राव 

४ 

५४. 

वटी 

२ 

३.

अभ्यंजन

२९.

द्रुती

११

५५.

वर्ती

४.

अयस्कृती

३०.

धूम

५६.

वलय

१३

५.

अरिष्ट

३१.

पर्पटी

१०

५७.

वारुणी

६.

अर्क

३२.

पाक

५८.

शलाका

१२

७.

अवलेह

३३.

पुटपाक

५९.

सत्व

 

८.

आरनाल

३४.

पेटिका

१३

 

(उद्भिज्ज)

९.

आसव

३५.

पोट्टली

१०

६०.

सत्व

 

१०.

उदक

३६.

प्रमथ्या

 

(खनिज)

११

११.

उद्वर्तन

३७.

प्राश

६१.

सांडगे

 

१२.

उपनाह

३८.

फांट

 

(संडाकी)

१३.

कज्जली

१०

३९.

भस्म

११

६२.

सार

१४.

कल्क

४०.

मंड

६३.

सिद्धशर्करा

१५.

कषाय

४१.

मंडूर

६४.

सिद्धस्नेह

१६.

कांजी

४२.

मंथ

६५.

सिद्धक्षीर

१७.

खंड

४३.

मधुशुक्त

६६.

सीधू

१८.

खल

४४.

मधू

६७.

सुधारस

१९.

खल्वीरस

१०

४५.

मुद्रिका

१३

६८.

सुरा

२०.

गुग्गुलू

४६.

मोदक

६९.

सूक्त

२१.

गुटिका

४७.

रस

७०.

सौवीर

२२.

गुटी

४८.

रसक्रिया

७१.

स्वरस

२३.

गुड

४९.

रससिंदूर

१०

७२.

हिम

२४.

चुक्र

५०.

लेप

७३.

क्षार

२५.

चूर्ण

५१.

लेह

 

२६.

जलौका

१३

५२.

वटक

 


गट क्रमांक २ : (१) चूर्ण : अत्यंत कोरड्या पदार्थांची वस्त्रगाळ पूड. दुसरी नावे रज, क्षोद. (२) गुटिका इत्यादी : चूर्णात द्रव घालून ते पाट्यावरवंट्यावर वाटून त्याच्या तयार केलेल्या गोल आकाराच्या गोळ्या. दुसरी नावे गुटी, वटी, वटिका, वटक. (३) गुटिका : लहान पण गोल आकार. गुटी : जरा मोठी पण गोल आकार. वजन – एक गुंज. (४) वटिका : अर्धगोल पण चापट–वालुगुंजेप्रमाणे आकार (टिकडी). (५) वटी : अर्धगोल पण चापट – वालुगुंजेप्रमाणे आकार, पण आकार जरा मोठा. (६) वटक : लोडाप्रमाणे (दंडगोल) आकाराचा. (७) वर्ती : वर्ती म्हणजे वात. ही लांबट व गोल असते. हिची दोन्ही टोके निमुळती असतात व मध्यभाग जाड असतो. (८) अगद : विषनाशक योग. हे चूर्ण अथवा गुटी स्वरूपातही असते किंवा मणी, मंत्र, एकेरी वनस्पती इ. स्वरूपांतही अगदयोग असू शकतो. (९) अंजन : द्रव, घन, चूर्ण, गुटी, वटी, वर्ती, काजळ स्वरूपातील डोळ्यांत घालण्याचे औषध. (१०) लेप : द्रवात अगर तुपात उगाळून अगद मिसळून त्वचेवर लावावयाचा औषधी शुष्क योग. हा चूर्ण, गुटी इ. स्वरूपांत असू शकतो. (११) गुग्गुलू : गुग्गुळाचे द्रवात चूर्ण घालून तयार केलेल्या कल्पास गुग्गुलू म्हणतात. हा गुटिकादी स्वरूपात असतो. हा चंद्र, सूर्य, अग्‍नी ह्यांच्या उष्णतासाहाय्यानुसार तयार करतात, म्हणून याचे तीन पाकप्रकार संभवतात. उदा., (अ) सोमपाक, (आ) सूर्यपाक आणि (इ) अनलपाक. (अ) सोमपाक : चूर्णे व गुग्गुळ समभाग घेऊन ती धृतादी स्‍नेहांत खलून चांदण्यात ठेवून तयार केलेला तो सोम अथवा चंद्रपाकी गुग्गुलू होय. (आ) सूर्यपाक : चूर्णे व गुग्गुळ वारंवार द्रवात एकत्र खलून उन्हात ठेवून सुकविणे ह्याला सूर्य अथवा हंसपाकी गुग्गुलू म्हणतात. (इ) अनलपाक : द्रवात गुग्गुळाचा पाक करून तो चुलीवरून खाली उतरवून लागलीच त्यात चूर्णे मिसळून ते मिश्रण गरम गरम असतानाच त्याच्या गोळ्या वळणे व त्या सुकू देणे ह्याला अनल अथवा अग्‍निपाकी गुग्गुलू म्हणतात. (१२) मंडूर : गुग्गुलू कल्पाशी याचे सादृश्य आहे. औषधी चूर्णात मंडूर मिसळून ते मिश्रण गोमूत्रात, उसाच्या रसात अथवा दुधात शिजवितात व त्याचे वटक करून ते उन्हात सुकवितात. त्यांना तत्तयोगपरत्वे तार, पुनर्नवा, भीम, भौम, मधू, शतावरी, हंस, क्षीर वा मंडूर असे म्हणतात. (१३) उद्वर्तन : उटणे – हे एक सुगंधी चूर्ण आहे. ते अभ्यंगानंतर, स्‍नानापूर्वी अगर नंतर उपयोगात आणतात. (१४) धूम : कास, श्वास, मूळव्याध, व्रण, डास, चिलटे, उवा, लिखा, जंतू, भूत, पिशाच नाशनार्थ किंवा हवा शुद्ध व आल्हाददायक करण्याकरिता उपयोगात आणतात. हा कल्प चूर्ण, सोंगटी अगर वर्ती या स्वरूपात असतो.

गट क्रमांक ३ : ह्या गटातील प्रत्येक कल्पात मधुर द्रव्य प्रचुर आहे आणि प्रत्येकाला अग्‍निसंस्कारही आहे. (१) सुधारस : लिंबाच्या रसात साखर कढवून मधाप्रमाणे तयार केलेला घन पाक. (२) मधू : कोहळा, जांभूळ, डाळिंब, द्राक्षे इ. ओल्या फळांच्या रसात साखर घालून कढवून तयार केलेल्या पाकास मधू म्हणावे. (३) खंड : आंबा, आले, आवळा, कोहळा, बिही, सफरचंद इ. ओले पदार्थ अखंड अथवा फोडी स्वरूपात वाफवून साखरेच्या पाकात घालून कढवून तयार केलेल्या पदार्थास खंड अथवा मुरंबा म्हणतात. (४) लेह : पाच वनस्पतींच्या काढ्यात साखर घालून, कढवून मधाप्रमाणे तयार केलेल्या पाकास लेह म्हणावे. (५) अवलेह : साखरेच्या तंतुपाकात औषधिद्रव्यांचे चूर्ण इ. द्रव्ये घालून, ते मिश्रण कढवून चिखलाप्रमाणे घन करतात त्यास अवलेह म्हणतात. (६) प्राश : साखरेच्या तंतुपाकात औषधिद्रव्याचे चूर्ण इ. घालून कढवून घन तयार करतात व जो खाद्य म्हणून खावयाचा असतो त्याला प्राश म्हणावे. (७) पाक : साखरेच्या बिंदुपाकात औषधिद्रव्यांचे चूर्ण इ. द्रव्ये घालून विविध आकारांच्या ज्या चापट वड्या पाडतात, त्याला वडी, पाक अगर पर्पटी म्हणतात. (८) सिद्धशर्करा : वनस्पतीच्या काढ्यात प्रचुर साखर घालून तिचा पक्का पाक करून प्रथम खंडे तयार करतात व मागाहून ते खंड दळून, बारीक करून, चाळून जो कल्प तयार करतात, त्याला सिद्धशर्करा म्हणावे. (९) गुड : गुळाच्या पक्क्या पाकात वनौषधींची चूर्णे घालून ती कढवून त्याच्या मोठ्या मोठ्या गोळ्या तयार करतात ह्या कल्पप्रकाराला गुड म्हणतात. (१०) मोदक : साखरेच्या पक्क्या पाकात उडीद इत्यादींचे पीठ व औषधी चूर्ण घालून ते मिश्रण कढवून भोवऱ्याच्या आकाराच्या तयार केलेल्या पदार्थास मोदक व चेंडूसारख्या गोल आकाराच्या पदार्थास लाडू म्हणतात. (११) खल : अडुळसा, गुलाब, मोगरा, शेवंती इत्यादींच्या उमलत्या कळ्या व रवाळ साखर एकत्र कुसकरून उन्हात ठेवून जो कल्प सिद्ध करतात, त्याला खल अथवा गुलकंद म्हणतात.

गट क्रमांक ४ : (१) सत्त्व : सत्त्वांचे मुख्य प्रकार दोन. (अ) उद्‍‍भिज्‍ज, (आ) खनिज. उद्‍‍भिज्‍ज सत्त्वांतही (क) कंद, (ख) कांड आणि (ग) धान्य असे तीन पोटभेद आहेत. (क) कंदसत्त्व काढण्याचा विधी : कंद स्वच्छ धुवावा. त्यावरील साल हळूच काढून घ्यावी. नंतर त्याच्या गोल आकाराच्या पातळ चकत्या काढाव्यात. त्या २४ तास पाण्यात भिजत ठेवाव्यात. नंतर ते मिश्रण रवीने घुसळावे. म्हणजे सर्व सत्त्व पाण्यात उतरते. मग ते मिश्रण गाळावे. सत्त्व पाण्याबरोबर वस्त्रान्तरित होते. चोथ्यात काही सत्त्वांश राहिला असेल, तर तो चोथा पुन्हा पाण्यात घालून घोळून घुसळून गाळावा. नंतर ते पाणी २४ तास उन्हात दादरा बांधून ठेवावे म्हणजे पिष्टमय भाग तळाशी बसतो. वरचे पाणी पिचकारीने हळूच ओढून घ्यावे आणि खाली बसलेला साका उन्हात सुकवावा. सुकलेले स्वच्छ धवल चूर्ण त्याचे नाव सत्त्व. सत्त्वनिष्कासनविधीत लोहसंपर्क टाळावा. (ख) कांडसत्त्व-विधी : कंदसत्त्वाच्याच विधीने हेही सत्त्व काढावे. (ग) धान्यसत्त्व-विधी : धान्य प्रथम स्वच्छ करावे, धुवावे आणि मग ते गरम पाण्यात भिजत ठेवावे. ते चांगले फुगले की, पाट्यावरवंट्यावर जोरजोराने वाटावे व तो कल्क फडक्यात घालून पिळून दाबून चोथा अलग करावा. चोथ्यात सत्त्वांश राहिला असेल, तर तो पुन्हा वाटावा व फडक्यातून गाळून घ्यावा म्हणजे सर्व सत्त्व पाण्यात उतरते. पुढील, उन्हात ठेवणे इ. विधी कंदसत्त्वाप्रमाणे करावा (खनिजसत्त्वनिष्कासनविधी पुढे गट क्रमांक११ मध्ये पहा). (२) सार (शुष्क) : उदा., कात. खैराच्या लाकडाचे छोटे छोटे तुकडे करून आठपट पाण्यात २४ तास भिजत ठेवावेत. मग ते मिश्रण खूप उकळावे. म्हणजे त्यातील सार भाग–कात–पाण्यात उतरतो. तो संपूर्णपणे पाण्यात उतरला आहे असे पाहून ते मिश्रण गाळावे व पाणी निवळत ठेवावे. म्हणजे कात पाण्याच्या तळाशी बसतो. मग वरचे निव्वळ पाणी हलकेच अलग करावे व मग साका सुकवावा तोच कात होय. सार (नीर) : उतार जमिनीमध्ये असलेले खैराचे झाड, किड्यांनी वगैरे बाधा न केलेले, चांगले जुनाट असे पाहून त्याच्या सभोवार खणून त्याची मधली मुळी छेदून तिच्याखाली एक लोखंडाची घागर अशा बेताने ठेवावी की, त्या मुळीतून गळणारा सर्व रस त्या घागरीत येईल. नंतर गाईचे शेण व माती ही त्या झाडास लिंपून त्याच्या सभोवार गाईच्या शेणी व इतर जळण यांचा ढीग करावा व ते अशा बेताने पेटवून द्यावे की, त्या झाडाचा सर्व रस खाली उतरून त्या घागरीमध्ये येईल. याप्रमाणे त्या रसाने ती घागर भरेपर्यंत हा विधी करावा. घागर भरल्यावर ती काढून त्यातील रस दुसऱ्या भांड्यात गाळून घ्यावा व तोंड बांधून गुप्त ठिकाणी ठेवावा. (३) क्षार : हे चूर्ण वा घन स्वरूपातही असू शकतात. चूर्णस्वरूप क्षाराचा सामान्य विधी : क्षार काढावयाचा असेल अशा क्षारी वृक्षाचे पंचांग आणावे. चांगले वाळवावे. स्वच्छ जागेवर ढीग करून जाळावे. पांढरी राख होऊ द्यावी. मग ती राख सहापट पाण्यात मृत्पात्रात मिसळावी. राख चांगली कोळावी. रात्रभर ते मिश्रण स्थिर होऊ द्यावे. सकाळी वरची निवळ काढून घ्यावी, खालचा भाग पुन्हा पूर्ववत पाण्यात घोळावा. राखेतला बुळबुळीतपणा गेला की सर्व क्षार पाण्यात उतरला असे समजावे व ते सर्व पाणी काचलिप्त शरावात मंदाग्‍नीवर आटवावे म्हणजे पांढरा स्वच्छ क्षार तयार होतो. घनस्वरूपी क्षारविधी : ह्या क्षाराचे मृदू, मध्यम व तीक्ष्ण असे तीन प्रकार आहेत. काळा मोखा, बाहवा, केळ, देवदार, राळेचा वृक्ष, त्रिधारी निवडुंग, पळस, मांदार, नांदरूखी, कुडा, रुई, घाणेरा करंज, करंज, कण्हेर, काकजंघा, आघाडा, ऐरण, चित्रक व लोध्र ही झाडे ओली असताना मुळे, शाखा, पाने इत्यादिकांसहित सबंध उपटून आणून त्यांचे बारीक बारीक तुकडे करून ठेवावे. त्याचप्रमाणे दुसरीकडे कडू दोडकी, कडू घोसाळी, कडू तुंबी व देवडांगरी आणि जवाचा कडबा व तूस यांच्या यांच्या, वारा नसेल अशा जागी, दगडावर निरनिराळ्या राशी करून ठेवाव्या. नंतर चुन्याचे खडे मोखाच्या राशीत टाकून तिळाच्या दांड्यांनी त्या राशी पेटवाव्या, सर्व जळून जाऊन विस्तव विझला म्हणजे चुन्याची राख निराळी काढावी आणि इतर सर्व झाडांची राख दहाशे चोवीस तोळे घेऊन व मोख्याची राख झाली असेल तेवढी घेऊन पाणी चार हजार तोळे व गोमूत्र चार हजार तोळे एकत्र मिळवून, त्यात एका मोठ्या वस्त्रातून ती राख बुळबुळीत, लाल, पातळ व तीक्ष्ण होईपर्यंत गाळीत बसावे. नंतर ते क्षारोदक एका लोखंडी कढईत घालून विस्तवावर ठेवून पळीने घोटावे. ते आटू लागल्यावर त्यातूनच बत्तीस तोळे पाणी दुसऱ्या एका लोखंडाच्या भांड्यात निराळे काढून घेऊन त्यात मोख्याच्या राशीत काढून ठेवलेले चुन्याचे खडे, शिंप, खडू व शंखाच्या आतील भाग हे वरचेवर लाल होईपर्यंत तापवून बुडवावे. त्याच पाण्यात वाटून नंतर ते मोठ्या कढईतील पाण्यात टाकावे. याशिवाय त्यात कोंबडा, मोर, गिधाड, कंक व पारवा यांची विष्ठा बारीक वाटून घालावी. तसेच पशुपक्ष्यांचे पित्त, हरताळ, मनशीळ व सैंधव ही बारीक करून त्यात घालावी आणि मग पळीने चांगले चोहोकडून ढवळावे. त्यातून वाफेबरोबर वर बुडबुडे येऊ लागले आणि तो लेहासारखा दाट झाला म्हणजे खाली उतरावा आणि थंड झाल्यावर लोखंडाच्या भांड्यात ठेवून जवाच्या राशीत पुरून ठेवावा. हा मध्यम क्षार झाला. तोच सौम्य करावयाचा असल्यास चुना वगैरे पदार्थ वरचेवर तापवून फक्त त्या पाण्यात विझवावे. वाटून घालू नयेत. तीक्ष्ण करावयाचा असल्यास सर्व कृती मध्यम क्षाराप्रमाणेच करून शिवाय त्यात कळलावी, दंती, चित्रक, अतिविष, वेखंड, सज्‍जीखार, पिसोळा, हिंग, घाणेऱ्या करंजाची पाने, काळी मुसळी व बिडलोण ही औषधे वाटून घालावी. सात दिवसपर्यंत जवांच्या राशीत पुरून ठेवून नंतर कोणताही क्षार वापरावा. (४) द्राव : सामान्य विधी पुढीलप्रमाणे : सज्‍जीखार, जवखार, खड्या टाकणखार, पत्र्या टाकणखार, सोराखार, शंखभस्म, रुईचा क्षार, शेराचा खार, पळसाचा खार, तुरटी, आघाड्याचा क्षार, सैंधव, संचळ, बिडलोण, समुद्रमीठ, औद्‍‍भिद लवण, रोमक मीठ व सांभरलोण ही सर्व औषधे एकत्र घ्यावी आणि त्याला लिंबाच्या रसाच्या एकवीस भावना द्याव्या. नंतर ते मिश्रण काचेच्या मातकापड केलेल्या कुपीमध्ये घालून त्यात त्याच्या विसांश भागाइतका लिंबाचा रस घालावा आणि ते मिश्रण ओले झाले म्हणजे ती कुपी वाळूने भरलेल्या मातीच्या मडक्यात ठेवावी.त्या मडक्याच्या बुडाला बारीक छिद्र पाडलेले असावे. नंतर ते मडके चुलीवर ठेवल्यावर दुसरी एक लांब तोंडाची कुपी घेऊन ती थंड पाण्याने भरलेल्या एका थाळीमध्ये ठेवून चुलीवरच्या मडक्यातील कुपीचे तोंडव त्या कुपीचे तोंड ही एका नळीने जोडावी आणि त्या नळीचे एक टोक मडक्यातील कुपीच्या तोंडाला मातकापडाने घट्ट बसवावे व दुसरे टोक त्या दुसऱ्या कुपीच्या तोंडाला मातकापडाने घट्ट बसवावे. त्या कुपीच्या खालच्या थाळीतले पाणी तापणार नाही अशी खबरदारी घ्यावी आणि मडक्याच्या खाली चुलीत पाच प्रहरपर्यंत प्रहराप्रहराने अनुक्रमाने विस्तव वाढवावा. म्हणजे आतील क्षारांच्या मिश्रणाचा अर्क निघतो. त्याला शंखद्राव असे म्हणतात. अस्थि, मांस, शंख, शिंपी इ. पदार्थ त्यात घातले असता ते या शंखद्रावामध्ये विरतात. (५) अर्क : अर्कयंत्र व विधी द्रावाप्रमाणेच. द्रव्ये मात्र उद्‌भिज्‍ज, गुळवेल, गुलाब, बडीशेप इ. असतात.


गटक्रमांक ५ : लोहादिरसायन : पोलादाचे (तीक्ष्ण लोहाचे) चार अंगुळे लांब व तिळाएवढ्या जाडीचे तुकडे करून ते तापवून (अग्‍निवर्णाचे) लाल करावे आणि अनुक्रमे त्रिफळ्याचा काढा, गोमूत्र, लवणक्षार (टंकण) जल, हिंगणबेटक्षारजल व पळसक्षारजल यांत बुडवावे. याप्रमाणे करून त्यावर अंजनाचा (काजळाचा) रंग आला म्हणजे त्याचे बारीक चूर्ण करावे. ते चूर्ण मध व आवळ्याच्या रसात मिळवून अवलेहाप्रमाणे जाड करून तुपाने राबलेल्या मडक्यात भरून ते मडके एक वर्षपर्यंत जवाच्या राशीत पुरून ठेवावे. दर महिन्यास मडके बाहेर काढून त्यातील औषधे चांगली ढवळावी. एक वर्षानंतर त्या अवलेहाचे, दररोज सकाळी आपल्या शक्तीच्या मानाने मध व तुपाबरोबर सेवन करावे. औषधे पचल्यावर प्रकृतीस मानवणारे भोजन करावे. हा लोहरसायनाचा प्रयोग सांगितला. याच विधीने सोने व रुप्याचेही रसायन बनवून सेवन करावे.

(१) अयस्कृति-चूर्ण : पोलादाचे अतिशय पातळ पत्रे करून त्यांना लवणवर्गातील औषधांचा लेप करून ते पत्रे गाईच्या शेणीच्या अग्‍नीमध्ये तापवून त्रिफळा व शालसारादिगणातील औषधे यांच्या काढ्यामध्ये सोळा वेळा बुडवावे. नंतर निखाऱ्यामध्ये लाल करून तसेच निवू द्यावे. नंतर त्याचे बारीक चूर्ण करून ते वस्त्रगाळ करून घ्यावे. नंतर त्यातून शक्तिमानाप्रमाणे तूप व मध यांतून ते योजावे.

(२) अयस्कृति – लेह : निशोत्तर, वरधारा, टाकळीचे मूळ, शिकेकाई, केंबुक (सुपारी), शंखवेल (शंखिनी), लोध्र, त्रिफळा, पळस व शिसवा या वनस्पतींचे स्वरस तयार करून एका पळसाच्या डोणीमध्ये ओतून त्यामध्ये खैराच्या निखाऱ्यांमध्ये तापवून लाल केलेले पोलादाचे गोळे एकवीस वेळा बुडवावेत. नंतर ते गोळे एका परळामध्ये घालून गाईच्या शेणींच्या अग्‍नीवर ठेवून त्याजवर वरील स्वरस पुन्हा ओतून पचन करावे. चतुर्थांश रस उरल्यावर तो गाळून घेऊन पुन्हा त्यामध्ये तेच लोखंडाचे तुकडे अग्‍नीत तापवून बुडवावेत. नंतर पिप्पल्यादिगणातील औषधांचे चूर्ण एक भाग (लोहपत्रांइतके) व (निवल्यावर) मध दोन भाग व मधाइतकेच तूप घालावे. नंतर हे तयार झालेले औषध एका लोखंडाच्या भांड्यामध्ये घालून पुरून ठेवावे. काढल्यावर शक्तिमानाप्रमाणे दोन तोळे अगर चार तोळे मात्रा योजावी.

(३) अयस्कृति-अरिष्ट : शालसारादिगणातील औषधांचा काढा एका पळसाच्या डोणीत भरून त्यामध्ये पोलादाचे तापविलेले गोळे विझवावेत. नंतर तुपाने राबलेल्या मातीच्या घागरीला पिप्पल्यादी चूर्णादिकांचा संस्कार करून तीमध्ये लोहाच्या गोळ्यांसकट तो काढा भरून पिप्पल्यादिगणातील औषधांचे चूर्ण एक भाग, आणि मध व गूळ योग्य प्रमाणात घालून तोंड बांधून पुरून ठेवावे. (उन्हाळ्यात) १५ दिवसांनी वा (हिवाळ्यात) एका महिन्याने काढून शक्तिप्रमाणे योजावे.

गट क्रमांक ६ : (१) सिद्धक्षीर : वनस्पतिकल्क एक भाग, दूध आठ भाग व पाणी बत्तीस भाग एकत्र करून हे मिश्रण केवळ दूध शिल्लक राहीपर्यंत मंद विस्तवावर शिजवावे व मग दूध गाळून घ्यावे. (२) सिद्धस्‍नेह : एक भाग कल्क, चार भाग  स्‍नेह (घृत, तैल, वसा, मज्‍जा) आणि सोळा भाग द्रव (रस, पाणी, काढा इ.) एकत्र करून केवळ स्‍नेह शिल्लक राहीपर्यंत मंद विस्तवावर शिजवून स्‍नेह गाळून घेणे. (३) अभ्यंजन : पिंडतैल मलम : औषधिद्रव्यांनी स्‍नेह व मेण एकत्र सिद्ध करून शेवटी केवळ स्‍नेह व मेणाचे घन मिश्रण तयार होते ते. (४) उपनाह : वेखंडचूर्ण, किण्व, बडीशेपीचे चूर्ण, देवदार इत्यादींचे चूर्ण मिश्रण करून एकत्र शिजवून शेक देण्याकरिता तयार केलेला लगदा (पोटीस).

गट क्रमांक ७ : मद्यकल्प प्रचलित असताही अरिष्ट व आसवकल्पांच्या  प्रक्रिया रचिल्या तेव्हा मद्यदोषप्रतिबंध उत्तम साधले गेले. आणि याचे लक्षणच असे सांगितले की, हा कल्प सेवन केला असता ह्याचे प्रधान कार्य ह्यातील प्रमुख औषाधिद्रव्यांचे तर होईलच, शिवाय ह्याच्या सेवनाने मन, तन आणि अग्‍नी ह्यांना बल प्राप्त होईल आणि अस्वप्‍न, अरुची, शोक ह्यांचा नाश होईल. ह्या कल्पांचे दुसरे वैशिष्ट्य असे की, ह्यात अम्‍लरस अत्यल्प, अल्कोहॉल अल्प व मधुर रस प्राधान्याने असतो. (१)अरिष्ट-प्रक्रिया : प्रधान द्रव्याच्या काढ्यात चातुजातादी प्रक्षेपद्रव्ये व मधुरद्रव्य घालून हे मिश्रण एका घटात भरून त्याच्या तोंडावर परळ झाकून ठेवून ह्याचा संधी लेपाने  बंद करून तो लेप सुकल्यावर तो घट धान्यराशीत अगर तळघरात दोन ते चार आठवडे ठेवून नंतर ते मिश्रण खूप ढवळून गाळून घेतात त्या कल्पास अरिष्ट म्हणतात. (२)आसव : काढ्याऐवजी स्वरस, रस, हिम, फांट ह्यांपैकी एक द्रव घेऊन उपरोक्त विधीने तयार केलेल्या कल्पास आसव म्हणतात.

गट क्रमांक ८ : ह्या गटातील पदार्थ मुद्राबंद भांड्यात घालून तो घट धान्यराशी अथवा तळघरात १५ ते ३० दिवस ठेवून फसफसू व आंबू देतात व मग ते मादक, अम्‍ल पेय गाळून घेतात. ही या कल्पांची सामान्य प्रक्रिया होय. ह्या कल्पात अल्प अल्कोहॉल व प्रचुर अम्‍लद्रव असतो.

(१)सूक्त : कंद, मुळे, फळे, स्‍नेह, लवण पदार्थ, पाणी अथवा विशिष्ट रस अथवा काढा यांपैकी एखाद्या द्रवात मिसळून वरील प्रक्रियेने तयार करतात. प्रकार : सूक्त तयार करण्याकरिता गुडोदक, शर्करोदक, मधूदक, उसाचा रस इ. द्रवांचा उपयोग केल्यास त्या त्या सूक्तास त्या त्या द्रवानुसार नाव देतात. उदा., गुडसूक्त, शर्करासूक्त इत्यादी. (२)मधुशुक्त : ६४ तोळे लिंबूरस, १६ तोळे मध, व ४ तोळे पिंपळीचूर्ण ह्यांपासून पूर्वोक्त विधीने तयार केलेल्या द्रवास मधुशुक्त म्हणतात. (३)तुषांबु : कच्च्या जवाच्या तुसांत पाणी घालून त्यापासून पूर्वोक्त विधीने तयार केलेला द्रव. (४)सौवीर : पाणी व निस्तुष जवांपासून पूर्वोक्त विधीने तयार केलेला द्रव. (५)आरनाल : पाणी व निस्तुष गहू एकत्र शिजवून त्यापासून पूर्वोक्त विधीने तयार केलेला द्रव. आरनाल कच्च्या निस्तुष गव्हांचाही करतात. (६)कांजी : कुळीथ अथवा तांदूळ व पाणी एकत्र शिजवून त्याचा मंड तयार करतात. त्यात सुंठ, मिरे, पिंपळी, मोहरी, जिरे, सैंधव, हळद, सांडगे वगैरे घालून पूर्वोक्त विधीने तयार केलेला द्रव. (७) संडाकी : मुळ्याचे काप, मोहरी, हिंग, हळद, जिरे, सैंधव, सुंठ इ. पाण्यात भिजवून हा कल्क पूर्वोक्त विधीने ठेवून एक विशिष्ट प्रकारचा कल्प तयार करतात व मग त्यात डाळीचे पीठ मिसळून त्याचे लहान वटक तेलात तळतात, ह्याला सांडगे म्हणतात. (८)चुक्र : मध किंवा इतर संधित द्रव आंबला तर त्या अम्‍ल द्रवात प्रक्षेपचूर्ण घालून ह्या मिश्रणापासून पुन्हा पूर्वोक्त विधीने जो द्रव तयार करतात तो. (९)सीधू : उसाचा रस अथवा इतर मधुर द्रवापासून पूर्वोक्त विधीने जो द्रव तयार करतात तो. ह्याला शिर्काही म्हणतात. हा उन्हात ठेवूनही तयार करतात. कच्च्या व पक्क्या इक्षुरसापासून तयार करतात तो अनुक्रमे शीत व पक्वरससीधू होय.

गट क्रमांक ९ : ह्या गटातील कल्पांची पहिली प्रक्रिया गट क्रमांक आठप्रमाणे परंतु ह्यातला विशेष असा की, हे द्रव अग्‍निसाहाय्याने विशिष्ट यंत्रातून (वारुणी यंत्र, मोचक यंत्र, मयुर यंत्र, नाडी यंत्र इ. यंत्रांतून) उडवून घेतात. त्यामुळे यात कोहल (अल्कोहॉल) चे प्रमाण प्रभूत होते. ह्यांत मधुर, अम्‍ल हे रस जरुर तर मागाहून यथेच्छेनुरूप मिसळतात. हे कल्प फार तीव्र मादक असतात. (१)सुरा : तंडुलादी धान्यादिकांच्या मंडापासून उपरोक्त विधीने तयार केलेली दारू. (२) वारुणी : ताड, माड, खजूरी ह्यांच्या द्रव्यापासून उपरोक्त विधीने तयार केलेली दारु.


गट क्रमांक १० : (१)कज्‍जली : पारा व गंधक खलात एकत्र खलल्याने त्यांचे एक चमकरहित, काजळासारखे काळेभोर चूर्णमिश्रण तयार होते त्यास कज्‍जली म्हणतात. (२)खल्वीरसायन : कज्‍जली, हिंगूळ, रससिंदूर युक्त औषधी मिश्रणे खलात घालून खलतात. त्या मिश्रणास औषधी द्रवाची भावना देतात ती भावना खलून सुकवितात व औषधी कल्प तयार करतात, त्याला खल्वी म्हणतात. (३) पर्पटी : कज्‍जली व अन्य पदार्थ बोरीच्या मंद विस्तवावर पातळ करतात व ते मिश्रण लागलीच शेणावर बसविलेल्या केळ इत्यादींच्या घृताक्त पानावर ओतून लागलीच दुसऱ्या घृताक्त केळीच्या पानाने तो रस दाबून पातळ चिपट्या तयार करतात त्यांना पर्पटी अथवा पापडी अथवा चिप्पटी म्हणतात. (४)पोट्टली : पारा, गंधक व इतर पदार्थ कोरफडीच्या रसात खलून त्याची शिखराकार अथवा कोनाकार मात्रा तयार करावी. ती उन्हात पक्की सुकवावी. तीवर रेशमी वस्त्र रेशमी धाग्याने बांधावे किंवा शिखराकार रेशमी वस्त्राच्या पिशवीत (पोटली-पोट्टली) कज्‍जली भरावी. नंतर तिचे तोंड रेशमी धाग्याने बांधावे. मग ही पोट्टली (पुरचुंडी), करंज्या तुपात तळतात त्याप्रमाणे गंधकात तळावी. मात्रेत गंधक पूर्ण प्रमाणात शिरला म्हणजे ती पोट्टली दांडीला टांगून ठेवावी व स्वांगशीत होऊ द्यावी. तदनंतर तीवरील कापड अलग करून तिचा पृष्ठभाग घासून घासून गुळगुळीत करावा, म्हणजे उत्तम मात्रा तयार होते. (५)सिंदूरकल्प-रससिंदूर : पारागंधकाच्या मिश्रणापासून विशिष्ट प्रक्रियेने, शेंदूर इ. प्रमाणे, लाल रंगाचा एक पदार्थ तयार करतात त्याला रससिंदूर म्हणतात. कृती : पारा, गंधक इ. पदार्थ प्रथम एकत्र खलून त्यांचे एकरंगी, ऐनजिनसी स्वरूपाचे एक मिश्रण तयार करतात. मग घुमटाच्या आकाराचे बूड, मधला गोल डेरा प्रशस्त रुंद व तोंडाकडील भाग निमुळता व लांबलचक असलेल्या बाटलीस मातकापड करून तीत ही कज्‍जली एक तृतीयांश भाग भरतात व ती बाटली युक्तीने वालुकायंत्रात तोंडातोंड पुरतात. हे यंत्र भट्टीवर ठेवून यंत्राच्या बुडास चढत्या-उतरत्या क्रमाचा अग्‍नी बराच वेळ देतात व मग हे यंत्र आपोआप थंड होऊ देतात. दरम्यानच्या काळात बुडाशी असलेल्या मिश्रणाचा परिपाक उत्तम होऊन त्याचे रूपांतर सिंदूर कणांत होऊन ते कूपीच्या कंठाशी रससिंदूररूपाने लागून बसतात. यंत्र थंड झाल्यावर त्यातील बाटली व तीमधील रससिंदूर युक्तीने काढून घेतात. ह्या कल्पातील काही रसायने केवळ गळ्याशी, तर काही केवळ तळाशी, तर काही अंशतः गळ्याशी व अंशतः तळाशीही अशा उभयविध ठिकाणी लागतात. तसेच सर्वांचा रंग लालच असतो असे नाही. उदा., समीरपन्नगाचा रंग हळदी, उजळ तांबूस पिवळा तर वंगेश्वराचा रंग एकदम सोन्यासारखा लाल कांतियुक्त पिवळाधमक. पण अशांची बनावट (प्रक्रिया) आणि यंत्रसामग्री रससिंदूरवत असल्याने ह्यांचाही समावेश सिंदूरकल्पातच केला गेला आहे.

गट क्रमांक ११ : (१) भस्म, भूती किंवा रक्षा म्हणजे राख, अस्थी, चर्म व शंखादी प्राणिज पदार्थ, हरीतकी इ. उद्‌भिज्‍ज पदार्थ हे एकदा जळले की, त्यांची काळी किंवा पांढरी राख तयार होते व मग त्यात मूळ पदार्थांचा मागमूसही राहत नाही. तरी पण त्यांचे थोडेसे गुण मात्र मिळतात. अशी गोष्ट खनिजांबाबत असू शकत नाही. सुवर्णादी धातू व अभ्रकादी असंस्कृत अथवा उपधातू यांची भस्मे म्हणजे सूक्ष्मातिसूक्ष्म स्वरूपात त्यांची रूपांतरे होत. पण त्यात मूळ पदार्थाचे सर्वचे सर्व गुण सुरक्षित असतात आणि त्यांचा प्रत्ययही येतो. म्हणून प्राणिज व उद्‌भिज्‍ज भस्मांहून यांचा वर्ग भिन्न मानावा लागतो अर्थात व्याख्याही बदलते. भस्माची व्याख्या : सहजसात्म्य नसलेले द्रव्य, विविध संस्कार व युक्ती यांच्या साहाय्याने, सहज पचनीय आणि पुन्हा अबाधाकर असा बनविणे ह्या विधीस भस्मविधी असे म्हणतात व ह्याच्या साहाय्याने तयार केलेल्या चूर्णस्वरूपी कल्पास भस्म म्हणतात. (२) सत्त्व : अभ्रकादी उपधातू इत्यादींमध्ये एक मौल्यवान व प्रधान पदार्थ किंवा धातू असतो. तो अलग करण्याकरिता ह्या उपधातू इत्यादींमध्ये क्षार व अम्‍ल मिसळतात आणि हे मिश्रण चांगले सुकवून ते कोष्ठी यंत्रात घालून त्याला व्यवस्थित अग्‍नी देतात. ह्यामुळे ह्यातील प्रधान धातू द्रव किंवा वाफ रूपाने अलग होतो व थंड झाल्यावर घन होतो. ह्याला खनिजसत्त्व म्हणतात. (३) द्रुती : तुषादी किंवा धान्यादी पदार्थ व द्रावण वर्गातील औषधांच्या साहाय्याने सुवर्णादी धातू व उपधातू आणि मल्लौषधी अग्‍नीवर भात्याने फुंकून त्यांचे द्रव तयार करतात. ह्या द्रवरसांवर इतर द्रव्यांचे विविध संस्कार करून ते द्रवरस सर्वसामान्य उष्णतामानातही पातळ अगर द्रव स्थितीतच राहू शकतील  असे त्यांचे स्थित्यंतर घडवितात. ह्या स्वरूपास त्या त्या मूळ द्रव्याची ‘द्रुती’ म्हणतात.

गट क्रमांक १२ : शलाका : सळई, डोळ्यात औषध घालण्याचे एकउपकरण. ही धातू, दगड आणि हाडे ह्यांपैकी कशाचीही करतात. सुवर्णादी धातूंपैकी शिशाची सळई फार प्रचलित आहे. पण रोगमान पाहून एक वा अनेक धातू, दगड अगर हाड यांची करतात. ही आठ किंवा दहा अंगुळे लांब, वाटाण्याएवढी जाड, गोल, दोन्ही टोकांस निमुळती अशी करतात. हिची टोके बोथट असतात व ही घोळून घोळून अत्यंत गुळगुळीत केलेली असते.

गट क्रमांक १३ : अंगधारक : (१) जलौका, (२) पेटिका, (३) मुद्रिका आणि (४) वलय.

(१)जलौका : म्हणजे जळू. ही पाऱ्याची, विशिष्ट प्रक्रियेने, केलेली असते. हिचा आकार, रूप इ. जळूप्रमाणे असतात म्हणून तिला जलौका म्हणतात. (२)पेटिका : म्हणजे गळ्यात घालावयाचा ताईत इत्यादी. (३)मुद्रिका : म्हणजे आंगठी. (४) वलय : म्हणजे कडे अथवा वाळा. पेटिका, मुद्रिका आणि वलय तयार करण्याकरिता घ्यावयाचे धातू विशिष्ट ठिकाणचे व विशिष्ट प्रक्रियेने काढून घेतलेले असतात. त्यांवर मंत्रतंत्रादी संस्कारही केले जातात.

औषधनिर्मितीचे कारखाने : आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये औषध तयार करण्याचे तपशीलवार तंत्रही सांगितले आहे. आयुर्वेदाच्या पूर्वापार पद्धतीमध्ये सर्व प्रकारची औषधे हात पद्धतीने तयार करतात. पोटात घेण्याचे काढे दररोज ताजे तयार करण्याची वहिवाट आहे. साधारण काढ्याचे मुख्य गुण एक दोन दिवसांपेक्षा जास्त टिकत नाहीत हे खरे आहे परंतु काढा तयार करण्याचे काम साधारण माणसाला फार कष्टाचे व वेळ मोडण्याचे असल्याने त्याला बाटलीत मिळणारा तयार काढा वापरणे सोईचे वाटते. कोणत्याही काढ्यात टिकाऊ गुण देणारे योग्य द्रव्य मिसळले, तर तो काढा बाटलीत भरून कित्येक वर्षे उत्तम स्थितीत ठेवता येतो. हे तंत्र समजल्यामुळे व त्याला गिऱ्हाईक मिळू लागल्यामुळे भारतात आयुर्वेदिक औषधे यांत्रिक शक्तीच्या मदतीने तयार करणारे अनेक कारखाने सुरू झाले. ह्या प्रकारचा धूतपापेश्वर हा पहिला कारखाना १८७२ साली पनवेल येथे सुरू झाला व १९१० साली झंडु फार्मास्युटिकल वर्क्स हा कारखाना मुंबई येथे सुरू झाला. यानंतर भारतातील बहुतेक सर्व राज्यांत आयुर्वेदीय औषधांचे कारखाने सुरू झाले. त्यांपैकी महाराष्ट्रात आयुर्वेद रसशाला, पुणे आयुर्वेदीय अर्कशाला, सातारा आयुर्वेदिक फार्मसी, अहमदनगर व आयुर्वेद सेवा संघ, नाशिक. गुजरातमध्ये गोंडल रसशाला, गोंडल ऊंझा आयुर्वेदिक फार्मसी, ऊंझा गुजरात आयुर्वेदिक फार्मसी, अहमदाबाद आत्मानंद सरस्वती सहकारी फार्मसी, सुरत. मध्य प्रदेशात गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज फार्मसी, रायपूर व ग्वाल्हेर वैद्यनाथ आयुर्वेद भवन, नागपूर राजकुमार आयुर्वेद कॉलेज फार्मसी व ख्यालीराम आयुर्वेद फार्मसी इंदूर, प. बंगाल येथे बेंगॉल केमिकल ॲंड फार्मास्युटिकल वर्क्स वैद्यनाथ आयुर्वेद भवन लि. ढाकाशक्ति औषधालय बिर्ला लॅबोरेटरीज साधना औषधालय कल्पतरू आयुर्वेदिक फार्मसी विश्वनाथ आयुर्वेद भवन सी. के. सेन ॲंड कं. लि. मारवाडी रिलीफ सोसायटी कलकत्ता केमिकल डाबर (एस्. के. बर्मन) आर्य औषधालय धन्वंतरी आयुर्वेद भवन हावडा कुष्ठकुटीर देवेंद्रनाथ आयुर्वेद फार्मसीअष्टांग आयुर्वेद कॉलेज फार्मसी. बिहारमध्ये गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेज फार्मसी व वैद्यनाथ आयुर्वेद भवन, पाटणा. ओरिसात गोपबंधु आयुर्वेद विद्यापीठ फार्मसी, पुरी. उत्तर प्रदेशात वैद्यनाथ आयुर्वेद भवन लि., अलाहाबाद स्टेट फार्मसी ऑफ आयुर्वेद ॲंड युनानी मेडिसिन, लखनौ बनारस हिंदु युनिव्हर्सिटी आयुर्वेद फार्मसी, वाराणसी गव्हर्मेंट ड्रग फॅक्टरी, रानीखेत देशरक्षक औषधालय, कनखल बाबा कमलीवाले आयुर्वेद फार्म, ऋषिकेष. तामिळनाडूमध्ये मद्रास स्टेट इंडियन मेडिकल प्रॅक्टिशनर को-ऑपरेटिव्ह फार्मसी व नाबी, आर. आयुर्वेद फार्मसी. आसाममध्ये गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेज फार्मसी, गौहाती. केरळमध्ये गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेज फार्मसी, त्रिवेंद्रम केरल वर्मा आयुर्वेद फार्मसी, त्रिचूर आर्य वैद्यशाला, कोटाकल. आंध्रमध्ये गव्हर्मेंट आयुर्वेद फार्मसी, हैदराबाद. कर्नाटकमध्ये निखिल कर्नाटक सेंट्रल आयुर्वेद फार्मसी, म्हैसूर. पंजाबमध्ये पंजाब आयुर्वेद फार्मसी भरद्वाज आयुर्वेद फार्मसी श्रीकृष्ण आयुर्वेद फार्मसी, अमृतसर पतियाला आयुर्वेद फार्मसी, सरहिंद डी.ए.व्ही. फार्मसी, जालंधर. दिल्लीमध्ये पुष्करणा आयुर्वेद फार्मसी, सुखदाता आयुर्वेद फार्मसी दिल्ली आयुर्वेद फार्मसी वर्क्स मजूमदार आयुर्वेद फार्मास्युटिकल वर्क्स मुलतानी आयुर्वेद फार्मसी कंपनी, नवी दिल्ली. राजस्थानमध्ये गव्हर्मेंट आयुर्वेद फार्मसी, जयपूर गव्हर्मेंट आयुर्वेद फार्मसी, जोधपुर गव्हर्मेंट आयुर्वेद फार्मसी, भरतपूर गव्हर्मेंट आयुर्वेद फार्मसी, उदयपूर मोहता रसायनशाला, बिकानेर मोहता आयुर्वेद साधना, हिंदी विश्वविद्यालय आयुर्वेद सेवाश्रम, उदयपूर राजस्थान आयुर्वेद औषधालय, अजमीर. असे प्रमुख कारखाने आहेत व त्यांचे  वार्षिक उत्पादन सु. सहा कोटी रुपयांच्यावर आहे.

धामणकर, पु. वि.