औषधासक्ति: अमली पदार्थांचे सेवन ही सवय बनणे किंवा व्यसन होणे म्हणजे औषधासक्ती होय. शारीरिक वेदना कमी करण्याकरिता किंवा मनाला हुषारी वाटावी, म्हणून अमली किंवा मादक औषधींचा उपयोग करण्याची वहिवाट सर्व समाजांत सर्व काळी आढळते. तथापि त्यांची आसक्ती संबंधित व्यक्तीच्या व समाजांच्या दृष्टीने अपायकारक असते.

या अवस्थेची प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे सांगता येतील : इष्ट अमली पदार्थ न मिळाल्यास वाटेल ते करून ते मिळविण्याच्या इच्छेने व्यक्ती बेचैन होते, नेहमीचा डोस धुंदी आणण्यास पुढे पुढे कमी पडल्याने तो वाढवत नेण्याची इच्छा होते. व्यक्तीचे मानसिक व पुष्कळ वेळा शारीरिक स्वास्थ्यही औषधी द्रव्यांवरच अवलंबून राहते. औषधासक्तीने व्यक्ती पछाडली गेली, की तिला ताळ्यावर आणणे जड जाते.

औषधासक्ती उत्पन्न करणाऱ्या मादक वा अमली औषधी द्रव्यांचे दोन वर्ग पडतात : (१) अफू, भांग, गांजा, चरस, कोकाची पाने, मारिजुआना अशा वनस्पतिजन्य अमली द्रव्यांचा (‘हशिश’ ही अरबी संज्ञा अशा पदार्थांची निदर्शक आहे) व (२) रासायनिक पद्धतीने बनविलेल्या हेराईन, कोडीन, कोकेन इ. औषधांचा. यांशिवाय वेदना कमी करणाऱ्या संश्लेषक औषधींचा एक वर्ग आहे. त्यांतील थेडिन गट व तदोद्‍भव मेथॅडीन गट व तदोद्‍भव मार्फीन गट ही औषधेही सवयीने आसक्ती जडवणारी आहेत. ‘एल्. एस्. डी.’ (लायसर्जिक डायएथिलामाइड) हे अमेरिकेत विशेष लोकप्रिय आहे. निरनिराळ्या अमली पदार्थांचे शारीरिक व मानसिक परिणाम निरनिराळे होतात. याशिवाय झोपेच्या गोळ्या किंवा औषधे, मद्यार्क इ. आसक्ती उत्पन्न करणाऱ्या औषधिवर्गात येत नाहीत पण सवयीने त्यांचा इतका दुरुपयोग होऊ लागला आहे, की १९५७ च्या आंतरराष्ट्रीय कमिशनने त्यांवर नियंत्रण घालण्याची शिफारस केली आहे.

खाणे, पिणे, चघळणे, ओढणे अशा विविध प्रकारांनी अमली पदार्थ सेवन केले जातात. पुष्कळदा तंबाखूत मिसळून किंवा विडी, चिलीम, सिगारेट यांतून अमली पदार्थ घेतले जातात.

अफू, भांग, गांजा, चरस यांसारखी नैसर्गिक अमली द्रव्ये विशेषत: खालच्या वर्गातून जास्त वापरली जातात तर रासायनिक पदार्थ वरच्या वर्गात वापरले जातात. पहिल्या महायुद्धानंतर आपल्याकडे कोकेन वगैरे द्रव्ये येऊ लागली पण त्यांवर लगेच निर्बंध घालण्यात आले.

औषधासक्ती अनेक कारणांनी जडते : व्यसनी लोकांची संगत, अमली पदार्थांविषयीचे फाजील कुतूहल, व्यक्तीला कारणपरत्वे येणारे भावनिक अस्थैर्य किंवा तिचा होणारा मानसिक प्रक्षोभ, शारीरिक वा मानसिक वेदना झटपट दूर करण्याची इच्छा इ. कारणे औषधासक्तीमागे संभवतात. तथापि खुल्या बाजारात अगदी सहजपणे अमली पदार्थ उपलब्ध असल्यानेही औषधासक्ती जडते. या कारणांशिवाय औषधासक्ती होणाऱ्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा विचारही महत्त्वाचा आहे. काही व्यक्ती वैद्यकीय सबबींवर औषधे घेऊ लागतात पण बरेचसे लोक प्रथम गंमत म्हणून तसेच अमली पदार्थसेवनाने प्राप्त होणारी सुखद भावना अनुभवावी, म्हणून ती घ्यावयाला सुरुवात करतात. बहुसंख्यांच्या औषधासक्तीमागे मानसिक आणि सामाजिक कारणे असतात. अशा व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व कमीअधिक प्रमाणात विघटित झालेले असते. अनेकदा समाजाशी आपले काहीतरी बिनसल्याची भावनाही त्यांच्यात प्रभावी असते. कित्येक वेळा कुटुंबात होणारी हेळसांडही व्यक्तीला औषधासक्तीकडे वळविते.

खडतर जीवन विसरण्याकरिता विरंगुळा म्हणून खालच्या थरातील लोक व्यसनासक्त होत असतील, तर अशा द्रव्यांनी येणारी धुंद गुंगी अनुभवण्याकरिता श्रीमंत वर्ग ती घेत असेल. एवढे मात्र खरे, की शिक्षण वाढले, राहणीमान उंचावले आणि सामाजिक परिस्थिती सुधारली, की काही ठिकाणी ही औषधासक्ती कमी होते, असे दिसते. ह्या आसक्तीचे प्रमाण बायकांपेक्षा पुरुषांत जास्त सापडते. पण रासायनिक औषधांच्या सुटसुटीतपणामुळे बायका व मुले यांतही तिचे प्रमाण वाढत असलेले पश्चिमी देशांतून दिसते.

आजच्या औद्योगिक समाजात धर्म, विवाह, कुटुंब इ. सामाजिक संस्था कमीअधिक प्रमाणात विस्कळित झाल्या आहेत. शिवाय प्रचंड गर्दी, जीवनाचा वाढता वेग, सामाजिक नियंत्रणातील शैथिल्य, निसर्गापासून माणसांची झालेली फारकत, चित्रपट व दूरचित्रवाणी यांसारख्या करमणुकीच्या बहुजन साधनांचे होणारे काही विपरीत परिणाम, जीवनातील यांत्रिकता आणि समूहात राहूनही येणारे एकाकीपण इ. प्रश्नही आधुनिक समाजात निर्माण झाले आहेत. या सर्वांमुळे जे ताण निर्माण होतात, तेही काही व्यक्तींना औषधाधीन करण्यास कारणीभूत होतात. आजच्या भोगवादी समाजाचा निषेध म्हणून पश्चिमी समाजांतील संतप्त तरुण किंवा हिप्पींचा वर्ग जाणूनबुजून व तात्त्विक भूमिकेवरून औषधासक्त होत असल्याचे दृश्य दिसत आहे. सर्वांगीण भौतिक समृद्धी व सांस्कृतिक ध्येयवादाचा अभाव यांमुळे पश्चिमेकडील प्रगत समाजात औषधासक्तीचे प्रमाण वाढत आहे, असेही काहींचे मत आहे.

औषधासक्तीने औषधाचे प्रमाण वाढविता वाढविता अखेर व्यक्ती मनाने कमालीची दुर्बल व काम करण्यास असमर्थ होते. तिचे शरीरही ती घेत असलेल्या द्रव्यानुसार पोखरून निघते. अमली पदार्थ मिळविण्यासाठी अखेर ती व्यक्ती कोणताही गुन्हा करण्यास प्रवृत्त होते. याशिवाय व्यसनाची वाढ होत राहिल्याने सारा पैसा त्यात खर्च होतो व कुटुंबाची धुळधाण होते.

औषधासक्तीला प्रतिबंध करण्यासाठी व त्या दृष्टीने वनस्पतिजन्य अमली पदार्थांचे उत्पादन, संश्लेषक अमली पदार्थांची निर्मिती आणि त्यांचे वितरण यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रयत्‍न करण्यात येत आहेत. या संदर्भात १९१२ मधील हेगचे आंतरराष्ट्रीय अफू अधिवेशन त्या अधिवेशनाने १९२५ मध्ये स्थापन केलेले स्थायी केंद्रीय अफू मंडळ, तसेच औषध पर्यवेक्षी संस्था व जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रांचा मादक औषधीसंबंधीचा आयोग वगैरे संस्थांचे कार्य उल्लेखनीय आहे. पॅरिस येथील ‘इंटर पोल’ (इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन) ही संस्था घातुक औषधांच्या बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवते. भारतात १८५७ व १८७८ चा अफू अधिनियम, १९३० मधील घातुक औषधी अधिनियम, १९४०चा औषधविषयक अधिनियम व १९५० चा औषधे (नियंत्रण) अधिनियम इ. अधिनियमांनी समाजातील औषधासक्ती कमी करण्यास हातभार लावला आहे.

पहा : मादक पदार्थ.

संदर्भ : 1. Chopra, R. N. Chopra, I.  C. Drug Addiction with Special Reference to India, New Delhi, 1965.

     2. O’Donnell, John A. Ball, John C., Ed., Narcotic Addiction, New York, 1966.

मोटे, कृष्णाबाई