काकिनाडा : आंध्र प्रदेश राज्यातील महत्त्वाचे बंदर आणि पूर्व गोदावरी जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,६४,२०० (१९७१). हे विशाखापटनमच्या दक्षिणेस ११७ किमी. आणि मद्रासच्या उत्तरेस ४४३ किमी. आहे. गोदावरीच्या मुखाचा काकिनाडा हा फाटा येथे समुद्रास मिळाला असून, गोदावरी पॉइंट या समुद्रात घुसलेल्या भूशिरामुळे काकिनाडा सुरक्षित बंदर बनले आहे. पूर्वीपासून काकिनाडा अंतर्गत भागाशी कालव्याने जोडलेले असल्याने ही महत्त्वाची उतारपेठ बनली. शहरात कापड, मोटारीचे सुटे भाग, साखर, शार्क तेल, बोटी इत्यादींचे कारखाने असून मच्छीमारीचे हे मोठे केंद्र आहे. इतिहासकालात काकिनाडाचा अतिपूर्वेकडे मोठा व्यापार असला, तरी सध्या हे भारतातील दुय्यम प्रतीचे बंदर मानले जाते.  

शाह, र. रू.