काकाकुवा : या पक्ष्याचे काकाकुवा हे नाव मूळ `काकातुआ’ या मलायी नावापासून आलेले आहे. पोपट ज्या पक्षिकुलातले आहेत त्याच सिट्टॅसिडी कुलातला हा आहे. इंडोनेशिया, टॅस्मेनिया, ऑस्ट्रेलिया, न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील बऱ्याच बेटांत हा आढळतो. ऑस्ट्रेलिया आणि टॅस्मेनियात याच्या अकरा जाती आहेत. त्यांपैकी पिवळसर तुरा असलेली पांढऱ्या काकाकुव्याची जातही जास्त आढळणारी आणि विशेष माहिती असलेली होय. हिचे शास्त्रीय नाव कॅकॅटोई गॅलेरिटा असे आहे. गुलाबी रंगाचा काकाकुवा हा एक फार सुंदर पक्षी आहे.

काकाकुवा

काकाकुवा मोठा वृक्षवासी पक्षी असून पांढऱ्या रंगाचा असतो. डोक्यावर मोठा तुरा असून तो उभारता व पसरता येतो. पायावर पुढे दोन व मागे दोन बोटे असतात. चोच पोपटाच्या चोचीसारखी असते. शेपटी तुलनेने आखूड असते. यांचे थवे असून ते एकसारखे गोंगाट करतात. वनस्पतींचे मुळे, कांदे, फळे बी व किडे हे यांचे मुख्य भक्ष्य होय. कधीकधी हे गव्हाच्या शेतांवर हल्ला चढवून बरेच नुकसान करतात.

हे पक्षी बुद्धिमान आणि दूरदर्शी असतात. थवा भक्ष्य टिपीत असताना धोक्याची सूचना देण्याकरिता जवळपासच्या झाडावर पहारेकरी ठेवलेले असतात. काकाकुवा दुसऱ्या प्राण्यांच्या आवाजाची नक्कल करतो. शिकविले तर हा चारदोन वाक्ये बोलू शकतो. पुष्कळ लोक काकाकुवा पाळतात. हा सु.८० वर्षे जगतो असे म्हणतात.

कर्वे, ज. नी.