काकतुंडी : (कुरकी, इं.बॅस्टर्ड-वाइल्ड-इपेकॅकुन्हा, लॅ.ॲस्क्लेपिआस कुरॅसाविका कुल-ॲस्क्लेपीएडेसी). हे लहान रोपटे मूळचे वेस्ट इंडीजमधले पण आता ते भारतात शोभिवंत, लालसर पिवळ्या फुलांमध्ये बागेत व पदपगृहात काचगृहात मुद्दाम लावतात तसेच पाण्याच्या आसपास अथवा सावलीत सहज उगवलेलेही आढळते. हे चीकयुक्त, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) असून पाने साधी, संमुख (समोरासमोर), चिंचोळी व भाल्यासारखी असतात फुलोरे चवरीसारखे व फुले (ऑगस्ट-फेब्रुवारीमध्ये) व्दिलिंगी व लहान प्रत्येक केसरतंतूला बाहेरील बाजूस असणारे एक पिशवीसारखे उपांग परागकोशाला वेढून टाकते. उपांगाच्या आतील बाजूस असणारे शिंगासारख्या अवयवात मध असतो [→ फूल] . पेटिकाफळे उभी व दोन्ही टोकांस निमुळती मुलांची व इतर सामान्य लक्षणे ⇨ ॲस्क्लेपीएडेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. याचे मूळ रेचक व स्तंभक (आकुंचन करणारे असून) मूळव्याधीसाठी व प्रमेहावर उपयुक्त पानांचा रस कृमिनाशक म्हणून वापरतात. पानांचे व फुलांचे चूर्ण जखमांवर लावतात. खोडापासून निघणारा धागा कापसाच्या धाग्याबरोबर कापडाकरिता वापरण्यास योग्य आहे. बियांवरचे केस उशा भरण्यास वापरतात.
हर्डीकर, कमलाश्री.
“