काकडशिंगी : (हिं.काकरसिंगी सं.शृंगी, कक्कटशृंगी इं. क्रॅब्स क्लॉ, जॅपॅनीज वॅक्स ट्र लॅ. ऱ्हस सक्सिडॅनिया कुल-ॲनाकार्डिएसी). या नावाने बाजारात वाकड्या शिंगासारख्या, साधारण जाड, पोकळ, हलक्या व काळ्या काड्या मिळतात. काकराच्या [एका जातीच्या हरिणाच्या, भेकर] शिंगासारख्या आकारामुळे वरील नाव पडले आहे. यांची पीटिकासारखी (पुळीसारखी) वाढ ज्या वृक्षाच्या पानांवर (माव्याच्या दंशामुळे) होते तो पानझडी वृक्ष (उंची ९-३० मी.) समशीतोष्ण हिमालयात काश्मीर ते सिक्कीम, खासी टेकडया, भूतान तसेच पाकिस्तान, चीन, जपान इ. प्रदेशांत निसर्गतः आढळतो व त्याची लागवडही करतात. पाने मोठी, संयुक्त विषमदली, पिच्छकल्प (पिसासारखी रचना असलेली), गुळगुळीत दले ९-१५ फुले लहान, पिवळट हिरवी व पानांच्या बगलेत परिमंजरीत येतात. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळे लहान, काहीशी चपटी व वाटाण्याएवढी, पातळ सालजीची व अनियमितपणे तडकणारी आठळी चपटी, कठीण व मेणाने वेढलेली. पानाच्या रसाने कातडीवर फोड येतात. वृक्ष विषारी फळांचा उपयोग क्षयावर होतो. काकडशिंगी तुरट, कडवट व कफनाशक असून मुलांना अतिसार व आमांशावर देतात. फळाच्या मगजापासून (गरापासून) मिळणारा द्रव रोगणे, मलमे, सजावटी सामानास आवण्याचे पॉलिश इत्यादींकरिता वापरातात. बियांतील मेणापासून जपानात मेणबत्त्या करतात. ह्या व ऱ्हस व्हर्निसिफेरा (इं.लॅकर ट्री) ह्या दुसऱ्या जातीच्या झाडाच्या सालीतील स्त्रावापासून रोगण बनवितात. काकडशिंगीपासून मिळणाऱ्या टूनिनाचा उपयोग कातडी कमावण्यास होतो. काकडशिंगी या नावाखाली ⇨कक्कटशिंगीही विकली जाते व ती तशीच वापरलीही जाते.

पहा : ॲनाकर्डिएसी सुमाक.

परांडेकर, शं. आ.