कांडोळ : (कराई,सालढोर हिं.कतिरा, गुलर गु.कडायो क.केंपुदोळे, भुतली इं.कतिरा गम स्टर्क्युलिया लॅ.स्टर्क्युलिया यूरेन्स कुल-स्टर्क्युलिएसी). कोकण व उत्तर कारवार येथील समुद्र किनाऱ्याजवळच्या खडकाळ जमिनीत नेहमी आढळणारा हा मोठा पानझडी वृक्ष दख्खनचे पठार, हिमालयाच्या पायथ्यास गंगेच्या पूर्वेस, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, ब्रह्मदेश इ. प्रदेशांतील पानझडी जंगलांत आढळतो. उंची १८—२१ मी. व घेर २⋅४—३ मी. साल जाड, गुळगुळीत व पांढरी तिचे मोठे पातळ तुकडे निघून जातात. पाने संयुक्त, चिवट, मोठी व फांद्यांच्या टोकास गर्दीने राहणारी, पंचखंडी, हस्ताकृती. पाने नसताना फांद्यांच्या टोकांस असंख्य, व्दिलिंगी, पिवळया फुलांच्या गर्द परिमंजऱ्या डिसेंबर-फेब्रुवारीत येतात एकलिंगी फुले फार कमी फुलांची सर्वसाधारण संरचना ⇨ स्टर्क्युलिएसी कुलवर्णनाप्रमाणे. फुलाच्या आत दहा केसरदले, तळाशी किंजधराभोवती लहानसे वलय करतात ⇨ [→फूल ]. घोसफळातील प्रत्येक पेटिकाफळ पिंगट वा नारिंगी रंगाचे असून दाहक व साध्या केसांनी आच्छादलेले असते. बिया तीन ते सहा, काळ्या, लालसर पिंगट. लाकूड उग्र व अप्रिय वासाचे, ओलसर व तेलकट वाटते त्यापासून दारे, होडकी, खेळणी, सतारी, प्रतिकृती (मॉडेल्स), थाळ्या (पराती, काटवटी) बनवितात. सालीपासून मिळणारा पांढरा (कतिरा) गोंद औषधी गोंदाप्रमाणे (घशाच्या विकारांवर) उपयुक्त. मध्य प्रदेशातील गोंड लोक बिया भाजून खातात. पाने व कोवळ्या फांद्या भिजवून ठेवल्यावर मिळणारा बुळबुळीत द्रव गुरांच्या फुप्फुसावर विकारावर देतात.
पराडकर, सिंधु अ.