कांचन : (बोहीनिया). ह्या वनस्पतीच्या अनेक जातींपैकी पुढील तीन जाती महत्त्वाच्या आहेत.

(१) रक्त कांचन : (देवकांचन हिं. खैरवाल, सोना क.सरुल, कांचिवला सं. वनराज, रक्तपुष्प्, कोविदार इं.पर्पल बौहीनिया, मौंटन एबनी लॅ. बौहीनिया पुर्पुरिया कुल-लेग्युमिनोजी उपकुल सीसॅल्पिनिऑइडी). हा सु.६–९ मी. उंच, सरळ, ताठ, सदापर्णी व शिंबावंत (शेंगा येणारा) वृक्ष ब्रह्मदेश, चीन व भारत येथे आढळतो. उपहिमालयात १,२४० मी. उंचीपर्यंत, आसाम, खासी टेकडया, कोकण व दख्खन येथील पानझडी जंगले इ. ठिकाणीही आढळतो. बागांतून शोभेकरिता विशेषेकरुन लावलेला दिसतो. याची साल राखी किंवा पिंगट असून फांद्या भरपूर असतात. पाने साधी, सोपपूर्ण (उपपर्णासह), आपटयाच्या पानाप्रमाणे अर्धवट विभागलेली  [→ आपटा] , पण त्यापेक्षा मोठी (१०–१३ सेंमी. लांब व ह्यापेक्षा थेडी कमी रुंद) फुले सुवासिक, मोठी (प्रत्येक पाकळी ४ सें २ सेमी.), गुलाबी जांभळी असून सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये फांद्यांच्या टोकास गुलुच्छासारख्या मंजरीत येतात. संवर्ताचे दोन मुख्य भाग असून पाकळ्या सुट्या, पाच व तळाशी अरुंद असतात जननक्षम केसरदले तीन किंवा चार व वंध्य एक किंवा दोन किंजपुट लांब देठावर आणि किंजल्क छत्राकृती  [→ फूल] . शिंबा सु.१५–३० ग २ सेंमी., सपाट, पिंगट, कठीण व एकदम तडकणारी बिया पिंगट, लंबगोल, चपटया व १२–१६ असतात.

या वृक्षाचे लाकूड साधारण मजबूत व हलके असून साध्या घरबांधणीत व शेतीच्या अवजारांकरिता वापरतात. साल कातडी कमाविण्यास व रंगविण्यास आणि पाला गुरंना खाऊ घालण्यास उपयुक्त. फुलांची भाजी किंवा लोणचे करतात. सालीपासून धागा व गोंद मिळतो. साल स्तंभक (आकुंचन करणारी) मूळ वायुनाशी व फुले सारक बियांत १५ टक्के स्थिर तेल असते. मुळाची साल विषारी. बियांपासून नवीन लागवड होते. संस्कृत वाङ्मयात ‘कोविदार’ या नावाने या वृक्षाचा उल्लेख आढळतो.

(२) सफेद कचनार : (इं.शार्प-लीव्हड बौहीनिया, लॅ. बौहीनिया ॲक्युमिनॅटा). ह्या हिंदी नावाने ओळखले जाणारे हे क्षुप (झुडूप) सु.२-५ मी. पर्यंत सरळ वाढते. ते चीन, इंडोचायना, मलाया, श्रीलंका, मध्य भारत इ.ठिकाणी आढळते. परंतु महाराष्ट्रात व इतर राज्यांत शोभेकरिता बागांतून लावलेले दिसते. फांद्यांवर बारीक लव असून त्या पिंगट लाल दिसतात. पाने साधी व टोकास अर्ध्यापर्यंत विभागलेली असून प्रत्येक भाग टोकदार असतो, त्यामुळे तशा अर्थाची नावे आहेत व ते झुडूप इतरांपासून वेगळे ओळखता येते ती पातळ, ७⋅५–१५ सेंमी. लांब व एकाआड एक असून रात्री मिटतात. मंजऱ्यांचे झुबके जून-जुलैमध्ये येतात व त्यांवर मोठी, ५ ते ८ सेंमी. व्यासाची पांढरी, सुवासिक फुले येतात. सामान्य रचना आपटा व रक्तकांचन यांप्रमाणे. जननक्षम केसरदल एक व लांब इतर नऊ वंध्य व आखूड. शिंबा लहान (१०–१२ ग २⋅२५ सेंमी.), लोंबती व तिच्या एका शिवणीवर दुहेरी जाड शीर असते. बिया ८–१२. वियांपासूनच नवीन लागवड होते. झाड लहान असतानाच फुले येण्यास सुरुवात होते. पाल्याचा रस थोडी साखर घालून सांजसकाळ सर्दीवर देतात. पूर्व जावात मुळांचा रस सर्दीवर घेतात. पेराकमध्ये (मलेशिया) नाकातील व्रणाकरिता पानांचे पोटीस वापरतात.

(३) कोविदार : (सं.व.गु.कांचनार हिं.कचनार क.कांजिवला, उतिपे सं. अशांतक इं.व्हॅरिगेटेड बौहीनिया, कॅमल्स फूट लॅ. बौहीनिया व्हॅरिगेटा). कांचनाच्या या जातीचे इतरांशी अनेक लक्षणांत साम्य असून काही फरकही आहेत. ‘कोविदारा’ चा जुन्या संस्कृत ग्रंथांत उल्लेख आहे, हे मागे सांगितलेच आहे. सु.६ मी (क्वचित १० मी.) उंचीचा हा भारतीय वृक्ष ब्रह्मदेश, चीन, कुमाऊँ, सिक्कीम, आसाम, मध्य प्रदेश, पूर्व व पश्चिम भारत, हिमालय प्रदेश (पायथा व बाहेरचा भाग) इ. ठिकाणी वसरलेला असून बागांतून व कोठे कोठे रस्त्यांच्या दुतर्फा लावलेला आढळतो. साल पिंगट व खरबरीत पाने साधी व टोकास मध्यापेक्षा कमी विभागलेली प्रत्येक भाग टोकास गोलसर साधारणतः फेब्रुवारी ते मार्चअखेर ती गळून पडल्यावर फुले येतात. ती मोठी, १० सेंमी. व्यासाची, सुवासिक, गुलाबी व लाल रंगाच्या सुंदर मिश्रणाची असून मंजरीवर किंवा गुलुच्छावर येतात [पुष्पबंध] यावेळी हा वृक्ष फार शोभिवंत दिसतो. संवर्त व पुष्पमुकुट रक्त कांचनाप्रमाणे केसरदले पाच व लांब शिंबा सु.३० सेंमी. (क्वचित अधिक) लांब व अरुंद असून तीवर पिंगट रेषा आणि आत १०–१५ बिया असतात. ह्या वृक्षाचा पांढऱ्या फुलाचा एक प्रकार (कॅंडिडा) आढळतो तो सु.३ ते ४ मी. उंच असून इतर बाबतीत कोविदाराप्रमाणे असतो.

कोविदाराची साल पौष्टिक, स्तंभक व कृमिनाशक तिचा काढा जखमा, उपदंश, कुष्ठ व चर्मरोग यांवर देतात. मुळांचा काढा अग्निमांद्य, उदरवायू, मेदवृध्दी इत्यादींवर गुणकारी पाला सफेद कचनारप्रमाणे उपयुक्त. कळ्या, पाने व कोवळ्या शिंबा भाजीकरिता वापरतात. फुले साखरेबरोबर सारक म्हणून घेतात सुकलेल्या कळ्या अतिसार, आमांश, कृमी, मूळव्याध इत्यादींवर गुणकारी सालीपासून गोंद व पिंगट रंग मिळतो. लाकूड कठीण, जड व लालसर पिंगट असून शेतीची अवजारे व जळण यांकरिता वापरतात. साल कातडी कमाविण्यास व रंगविण्यास आणि पाने बिड्या बांधण्यास वापरतात. ‘मौंटन एबनी’ हे इंग्रजी नाव या वृक्षालाही दिलेले आढळते.

कांचनाच्या कोणत्याही जातीची पाने ‘सोने’ म्हणून दसरा सणाच्या वेळी वापरलेली आढळतात.

पहा : आपट चंबळ-२ लेग्युमिनोजी.

परांडेकर, शं. आ.

कांचन : (१) कोविदाराची पान व फुलांसह फंदो ,(२) शिंवा ,(३) बी ,(४) रक्तकंचननाची पान व फुलांसह फंदी.