कांग्रा चित्रशैली : कांग्रा खोऱ्यातील पहाडी प्रदेशात अठराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत विकसित झालेली एक भारतीय लघुचित्रण शैली. भारतात बौद्ध धर्माच्या ऱ्हासानंतर सामाजिक उत्तेजनाच्या अभावी चित्रकलेच्या क्षेत्रात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. मध्ययुगात वैष्णव पंथ उदयास आला. या पंथाच्या अनुयायांनी कृष्ण, विष्णू यांच्यावर कवने रचली. तुलसीदास, कबीर, कमल, जयदेव असे अनेक कवी होऊन गेले. त्यांच्या काव्यविषयांवर अनेक कलावंतांनी चित्रे काढली. ही प्रथमतः राजस्थान व उत्तर भागांतील कलेतून निर्माण झाली. कांग्रा खोऱ्यातील गुलेर राज्यात या कलेला आश्रय मिळाला. पुढे मंडी, सुकेत, टेहरी गढवाल इ. केंद्रातही या कलेची जोपासना झाली. कांग्राच्या खोऱ्यात ही शैली उत्कर्षास पोहोचली, म्हणून तिला कांग्रा (कांग्डा) चित्रशैली हे नाव प्राप्त झाले.

कांग्रा खोऱ्यातील पहाडी प्रदेश, नद्या, झाडे, वेली यांसारखे निसर्गसौंदर्य बहुतेक चित्रांचा विषय बनले आहे. मुक्ती हे भारतीय संस्कृतीत मानवाचे अंतिम ध्येय मानले जाते ते साध्य करण्याच्या अनेक मार्गांपैकी कला हे एक महत्त्वाचे साधन. कदाचित उत्तम कलाकृतीपासून मिळणारा निर्भेळ आनंद म्हणजे मुक्ती होय, असे आपणास म्हणता येईल. हा आनंद कांग्रा कलेत मनमुराद लुटता येतो.

कांग्रा चित्रशैलीवर तत्कालीन ⇨बसोली चित्रशैलीचा प्रभाव आढळतो. बसोली चित्रशैलीतील तांबड‌्या रंगाचे प्राधान्य, विशिष्ट प्रकारची झाडे, वास्तू व व्यक्ती या गोष्टी कांग्रा चित्रांतही आढळतात. प्राचीन कलेत आढळणारे चैतन्य, रंगातील रसरसलेपणा या चित्रांतून आढळतो. मोगल राजवटीच्या ऱ्हासानंतर मोगल कलावंतांना या खोऱ्यात उत्तेजन मिळाले. साहजिकच मोगल चित्रशैलीची छाप या शैलीवर पडली. मोगल चित्रशैलीच्या मानाने कांग्रा चित्रकला अधिक कल्पनाप्रवण आहे. वास्तव चित्रणाचा वरपांगी हव्यास या शैलीत नाही. मोगल शैलीच्या तुलनेने कांग्रा चित्रांतील रेषा अतिशय नाजुक व हळुवार आहेत. प्रेम, वात्सल्य, भक्ती यांसारख्या भावनांची अभिव्यक्ती कांग्रा चित्रांत आढळते, तर मोगल चित्राकृतींत लढाया, शिकारी असे वास्तव विषय आढळतात. कांग्रा चित्रांत यथादर्शनाचा मांडणीसाठी फार कुशलतेने उपयोग करून घेतलेला आढळतो.

कृष्णसंप्रदायाला अनुसरून भागवतपुराण व विशेषतः राधाकृष्णांवरील प्रसंग यांना कांग्रा चित्रकलेत महत्त्व प्राप्त झाले.‘अष्टनायिका’, ‘रागमाला’ यांवर या शैलीत काढलेली चित्रे प्रसिद्ध आहेत. वसंत, ग्रीष्म, इ. ऋतूंचे चित्रण करताना नायक-नायिकांना महत्त्व देऊन पार्श्वभूमीला फुले, पक्षी यांव्दारा निसर्गचित्रण केले आहे. आनंद, दुःख, मोह इ. भावना प्रभावीपणे दाखविल्या आहेत.

ही चित्रे तपकिरी कागदावर लाल रंगाने काढली जात (हा कागद सियालकोटी पेपर म्हणून प्रसिद्ध आहे). नंतर चित्रावर पांढऱ्या रंगाचा लेप दिला जाई. तो घासून गुळगुळीत केल्यावर त्यावर काळ्या किंवा तपकिरी रंगाने चित्राकृती काढल्या जात. पार्श्वभूमी रंगविल्यानंतर व्यक्ती व इतर वस्तू रंगविल्या जात. या आकृतींना उठावासाठी बाह्यरेखा काढल्या जात. मूळ रेखन, रंगांकन, अंतिम रेखांकन ही कामे बहुधा वेगवेगळ्या कलावंतांनी केलेली असत.

कांग्रा चित्रांचा आशय आहे प्रेम. परंतु राधाकृष्णाच्या रूपाने हे प्रेम भक्तिमय बनते. ते चित्रित करण्यात कांग्रा चित्रशैलीचे चित्रकार यशस्वी झाले आहेत. त्यांच्या हळुवार रेषेतील सहजता, लय, डौल यांना तोड नाही.

कुशन लाल, हस्तू व पुरखू हे या शैलीचे प्रसिद्ध कलावंत होत. आजच्या रसिकाच्या दृष्टीने पहाता ही चित्रे अभिव्यक्तीपेक्षाही सुंदर सुबक रचनेमुळे अधिक वेधक वाटतात. राजेरजवाड‌्यांच्या ऐषारामी जीवनाशी ती विशेष निगडित होती, त्यामुळे त्यांत अभिव्यक्तीपेक्षा रंजनक्षमता प्रभावी ठरली. दुरून ती केवळ सुबक व सुशोभित दिसतात मात्र बारकाईने पाहिल्यावर त्यांत नाट्यात्मक पद्धतीने केलेले भावनाचित्रण आढळते.

डब्ल्यू. पी. आर्चर, आनंद कुमारस्वामी, एम्‌.एस्‌. रंधावा यांनी या चित्रकलेचे संशोधन करून रसिकांना तिचे दर्शन घडविले. परंतु त्यांच्या भूमिका मुख्यतः ऐतिहासिक आहेत. आजच्या रसिकाला कांग्रा चित्रांतील रंगांचा रसरशीतपणा व आकारांची सुंदर मांडणी कौतुकास्पद वाटतात.

या शैलीतील विरहिणी, वर्षाऋतूतील निवारा, उत्कंठिका, अभिसारिका ही चित्रे विशेष उल्लेखनीय वाटतात. विरहिणी या चित्रातील स्त्री विरहाने व्याकुळ झाली असून स्वतःला गायनवादनात विसरू पहात आहे. या चित्रातील सर्व रेषा उभ्या असून त्या स्त्रीच्या हातात असलेल्या तिरप्या सतारीमुळे चित्राचा तोल चांगला सांभाळला गेला आहे. चित्राची रंगसंगती स्त्रीच्या त्या मनःस्थितीला अनुरूप ठरते. वर्षाऋतूतील निवारा या चित्राची रंगसंगती-विशेषतः कृष्णाने धरलेल्या छत्रीचा तांबडा रंग-फार परिणामकारक वाटते. उत्कंठिता या चित्रातील स्त्री प्रियकरासाठी फुलांची शय्या सजवून त्याची आतुरतेने वाट पाहणारी आहे. तिच्या नजरेतील व्याकुळता व प्रत्येक रेषेतून ओसंडणारी आतुरता परिणामकारक आहे. रंगांच्या कमीअधिक छटांनी चित्राला परिणामकारक गहिरेपणा आणला आहे. अभिसारिका हे एक असेच वेधक चित्र आहे. जिला स्वतःची काही शुद्ध नाही साप, भूत यांचे भय नाही अशी एक स्त्री चंद्रप्रकाशात प्रियकराला भेटण्यासाठी निघाली आहे, असे मनोज्ञ चित्रण त्यात आहे.

जुन्या लोककलेची आठवण करून देणारी, रेषांचा नाजुकपणा व डौल मनावर ठसविणारी ही एक सुंदर शैली आहे. 

पहा : पहाडी चित्रशैली राजपूत चित्रकला.

संदर्भ : 1. Archer, W. G. Kangra Painting, London, 1952.

          2. Coomaraswamy, A. K. Rajput Painting, 2.Vols., Oxford, 1916.

            3. Khandalvala, Karl, Pahari Miniature Painting, Bombayh, 1958.

            4. Randhawa, M. S. Kangra Paintings of The Bhagaata Purana, Delhi. 1960.

            5. Randhawa, M. S. Kangra Paintings on Love, Delhi, 1962.

            6. Randhawa, M. S. Kangra Valley Painting, Delhi, 1954.

धुरंधर, नयनतारा


वर्षाऋतूतील निवारा
गोपालक श्रीकृष्ण व बलराम