कॅसाब्लांका : (अरबी अल् बीदा) मोरोक्कोचे अटलांटिक किनाऱ्यावरील महत्वाचे बंदर व सर्वात मोठे शहर. लोकसंख्या १५,०६,३७३ (१९७१). राबात व मॅझागॅन ह्यांमधील लहानशा उपसागराच्या तोडांशी हे वसले आहे. तेराव्या शतकात हे मच्छीमारी खेडे होते. यूरोपीयास सतावणाऱ्या आफ्रिकेतील चाचे लोकांचे हे केंद्र बनले, म्हणून पोर्तुगीजांनी १४६८ मध्ये बंदराचा ताबा घेतला. अठराव्या शतकात मोरोक्कोच्या सुलतानाने खुले बंदर बनवून बंदराला उर्जितावस्था आणली. हे एक आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र बनले. १९०८ पासून कॅसाब्लांका फ्रेंचांच्या ताब्यात गेले.
बंदरांच्या थोडे पुर्वेकडे जुने कॅसाब्लाका किंवा मदीना शहर आहे. जुन्या शहरात जुन्या पद्धतीची विटा, माती व पांढरा चुना लावलेली घरे असून येथेच बहुसंख्य यूरोपीय, मुसलमान व यहुदी वस्ती असे. गेल्या ४० वर्षापासून यूरोपीय लोक पश्चिमेकडील बंदर भागात आधुनिक व अलिशान इमारतीत राहू लागले.
पहिल्या महायुद्धानंतर कॅसाब्लाका व त्याचा परिसर हा लहान मोठया निरनिराळया उत्पादक धंद्यांनी भरभराटला आहे. साखर, तंबाखूचे पदार्थ, सिमेंट कापड वगैरे मोठे उद्योग आणि विटा, लाकूड कापणे, डबाबंद मासळी, सतरंज्या वगैरे लघुउद्योग येथे आहेत. मोरोक्कोच्या परदेशी व्यापाराचा तीन चतुर्थांश व्यापार कॅसाब्लांकामधून चालतो. कॅसाब्लांकापासून माराकेश, राबात तँजिअर,फेज, औज्दा, ओरान, अल्जिअर्स, ट्यूनिस वगैरेकडे लोहमार्ग व मोठमोठया सडका असून २१ किमी. वरील कॅंपकासेस येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. दुसऱ्या महायुद्धातील कॅसाब्लांका परिषद रुझवेल्ट व चर्चिल हयांच्यात १९४३ मध्ये येथेच भरली होती.
लिमये, दि. घ.