कॅश्गार : (चिनी शूफू किंवा सूफू). चीनच्या सिंक्यागं ऊईगुर स्वायत्त विभागातील व कॅश्गार मरूद्यानातील व्यापारी शहर. लोकसंख्या १,७५,०००(१९७० अंदाज). पामीरमधून आलेल्या तिएनशान व मुझताघ आता ह्या पर्वतरांगा मिळतात, तेथे सु. १२२० मी. उंचीवर कॅश्गार नदीकाठी, तारीम खोऱ्याच्या पश्चिमेस हे वसलेले आहे. या सु. ६,७०० मी. उंचीच्या रांगांदरम्यान ३,७८० मी. उंचीवरील तूरूगार्त खिंडीमार्गे ते रशियाच्या फरगाना खोऱ्यातील ॲरिझन या लोहमार्ग स्थानकाशी आठ दिवसांच्या लमाणमार्गाने जोडलेले आहे. दक्षिणेस खोतान मरूद्यानमार्गे कॅश्गारहून काश्मीरमध्ये ५,५७५ मी. उंचीवरील काराकोरम खिंडीतून जाता येते. तिएनशानमधील सु. ९०० मी. उंचीवरील दोन खिंडीतून कॅश्गारहून ऊरूमचीला व झुंगेरिया खोऱ्यात जाता येते. कॅश्गार मरूद्यान लोएस मातीमुळे सुपीक झालेले असून नदी व विहिरी यांपासून पाणीपुरवठा होतो. शहरापासून आठ किमी. वरच दगडगोट्यांचा रुक्ष प्रदेश सुरू होतो. कॅश्गारचे जानेवारीचे सरासरी तापमान –६से असते. व जुलैचे २७ से. असते. पाऊस सात–आठ सेंमी., अनियमित असतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत बर्फामुळे पाणीपुरवठा करता येत नाही. ताल्का माकान वाळवटंतील धुळीने आकाश सदैव व्याप्त असते. उन्हाळ्याच्या सुरुवातीस व शरद ऋतूच्या अखेरीसच फक्त ते स्वच्छ असते. कॉलरा, टायफस, प्लेग हे रोग येथे नाहीतमात्र मुदतीचा ताप, देवी व सौम्य हिवताप यांच्या साथी येतात. डास व वाळवंटी माशा तापदायक असतात. कॅश्गार हे सिंक्यांगमधील कापूस उत्पादनाचे केंद्र आहे.याशिवाय या भागात गहू,मका,बार्ली,तांदूळ,भरडधान्ये व डाळी यांची पिके येतात. पीच,जरदाळू,चेरी,तुती,द्राक्षे,कलिंगडे ही फळे विपुल होतात. रेशमाचे उत्पादन होते व तुमन आणि किझिल दर्या नद्यांवर थोडी मासेमारीही चालते. १९४० मध्ये शहराच्या उत्तरेस डोंगरात तांब्याच्या समृद्ध खाणी सापडल्या. हातसुताचे कापड. लोकरी रंग, फेल्ट, केसाळ कातडी, कातडीसामान, सोन्याचांदीचे अंलकार, मातीची भांडी हे व्यवसाय येथे चालतात. लोकर, कच्चे रेशीम, कातडी, मेंढयांची आतडी, चीज, सुकी फळे, रग, घोडयाचे व उंटाचे केस वगैरे पदार्थ मुख्यतः रशियाकडे निर्यात होतात. सुती व लोकरीचे कापड, साखर, लोखंड, पेट्रोलियमच्या वस्तू, आगपेटया, तंबाखूच्या वस्तू, कमावलेली कातडी, कागद, मद्ये व रेशीम किड्यांची अंडी इ. वस्तू आयात होतात.

कॅश्गारचे लाइ निंग हा चिनी भाग व शूफू हा ऊईगूर शहराचा मोठा भाग असे दोन भाग आहेत. कॅश्गार म्हणजे विविधरंगी विटांची घरे. तिसऱ्या शतकात इंडो-सिथियनांची एक शाखा युएची ही कान्सूमधून पश्चिमेकडे रेटली गेली.तिने शकांना घालवून देऊन कॅश्गार मरूद्यान व्यापले. चिन्यांनी इ.स.पू. पहिल्या शतकात चिनी तुर्कस्तान आणि कॅश्गार जिंकले. युएचींनी ते पुन्हा जिंकून तेथे बौद्ध धर्म आणला. अनेक शतके येथे तुर्की आणि मोगल धाडी येत राहिल्या. दहाव्या-अकराव्या शतकात कॅश्गार हे तुर्की ऊईगुर राज्यात होते. १२१९ मध्ये चंगीझखानाने ते आपल्या साम्राज्यास जोडले. १२७५ मध्ये कुब्लाईखानाच्या राजवटीत मार्कोपोलो कॅश्गारला आला होता. चौदाव्या शतकात तैमूरलंगाने कॅश्गारची धुळधाण केली व पुढे अनेक शतके त्यावर हल्ले होत राहिले. १७५५ मध्ये चिन्यांनी ते पुन्हा जिंकले. १८६१—७८च्या याकूब बेगच्या बंडानंतर ते चिन्याकडेच होते. १९२८ मध्ये मुस्लिम जनरल मा चुंग मिंगने तारीममध्ये बंड केले ते रशियाच्या मदतीने १९३७ मध्ये पूर्णपणे शमले. १९४३ मध्ये संपूर्ण चिनी अंमल येईपर्यंत येथील आर्थिक व राजकीय कारभारात रशियाचे वर्चस्व होते.१९४९ मध्ये चिनी कम्युनिस्ट फौजांनी मुस्लिमांचा पाडाव करून येथे आपली सत्ता जारी केली आर्थिक आणि राजकीय घडीची संपूर्ण फेररचना केली आणि १९५५ मध्ये सिंक्यांगची सिंक्यांग ऊईगुर स्वायत्त विभाग म्हणून व्यवस्था लावली.

कुमठेकर, ज. ब.