भेकर"

भेकर: स्तनी वर्गातील मृग कुलात भेकरांचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव म्यूंटिॲकस म्युंटजॅक असे आहे. नेपाळ, भारत, श्रीलंका, जावा, बोर्निओ, चीन, तैवान आणि जपान या प्रदेशांत हा आढळतो. दाट रानात आणि डोंगारांवरील गर्द जंगलांत हा राहतो. हिमालय आणि दक्षिण भारतात हा १,५०० – २, ४५० मी. उंचीपर्यंत — कधीकधी त्यापेक्षाही जास्त उंचीवर – आढळतो. हे एकेकटे, जोडप्याने किंवा आपल्या परिवारासह असतात. बहुधा दाट जंगलातच हे असतात पण चरण्याकरिता जंगलाच्या सीमेवर किंवा जंगलाबाहेरच्या उघड्या प्रदेशात येतात.

भेकर साधारणपणे लहानसर आणि सडपातळ असतात त्यांची डोक्यासकट शरीराची लांबी ८०-१०० सेमी. शेपटाची ११-१८ सेंमी खांद्यापाशी उंची ४५-५८ सेंमी. असते. शरीराचा रंग गर्द तपकिरी किंवा पिवळसर तपकिरी असतो. अंगावरचे केस आखूड, मऊ आणि दाट असतात पण कानावरचे फार विरळ असतात. मृगशृंगे [मृगाच्या ललाटस्थींपासून-कपाळाच्या हाडांपासून – उत्पन्न होणारी शिंगे ⟶ मृगशृंगे आणि शिंगे] फक्त नरालाच असतात. ती दरवर्षी मे किंवा जून महिन्यात गळून त्यांच्या जागी नवी उगवतात. लांब, अस्थिमय आणि केसांनी झाकलेल्या देठांवर ती असतात त्यांची लांबी १२-१५ सेंमी.पेक्षा क्वचितच जास्त असते. नराचे वरचे रदनक (कुरतडण्याचे दात व उपदाढा यांच्या मध्ये असणारे दात) लांब व वाकडे होऊन त्यांचे सुळे बनलेले असतात. त्यांचा स्वसंरक्षणाकरिता उपयोग होतो. नराची मृगशृंगे डोक्यावर ज्या ठिकाणी असतात, त्याच ठिकाणी मादीला हाडाच्या दोन गाठी असून त्यांवर रोमांचे (राठ केसांचे) झुबके असतात. मादीचे सुळे नराच्या सुळ्यांपेक्षा लहान असतात.

संकटाच्या वेळी किंवा प्रजोत्पादनाच्या काळात भेकर कुत्र्याच्या भुंकण्यासारखा एक प्रकारचा आवाज काढतो म्हणून इंग्रजी भाषेत, याला ‘बार्किंग डिअर’ असे लौकिक नाव पडलेले आहे. हा बराचसा दिनचर आहे. साधारणपणे पाण्याच्या जवळपासच हे वावरत असतात.संकटाचे यत्किंचित चिन्ह दिसताच एकदम पळता यावे म्हणून चालताना भेकर आपले पाय बरेच वर उचलून चालतो. गवत, पाने, कोवळे कोंब व रानटी फळे हे याचे खाद्य होय.

प्रजोत्पादनाचा काळ ठराविक नसला, तरी हिवाळ्यात तो मुख्यतः असतो. गर्भधारणेपासून १८० दिवसानंतर मादीला एक (क्वचित दोन) पिल्लू होते. पिल्लू मोठे होऊन आईबरोबर हिंडू फिरू लागेपर्यंत मादी त्याला लपवून ठेवते. भेकर सु. १० वर्षे जगतो. वाघ आणि बिवळ्या हे याचे नैसर्गिक शत्रू होत.

जमदाडे, ज. वि.