बेझबरुआ, लक्ष्मीनाथ: (१ नोव्हेंबर १८६८ – २६ मार्च १९३८). आधुनिक असमियातील एक श्रेष्ठ साहित्यिक. काव्य, नाटक, लघुनिबंध, विनोद, चरित्र-आत्मचरित्र, कथा-कादंबरी, वृत्तपत्रीय लेखन यांसारख्या विविध तत्त्वचतुटष्यीप्रकारांत लेखन करून आधुनिक असमिया साहित्याचा पाया त्यांनी घातला. लक्ष्मीनाथांचे वडील दीनानाथ हे वरिष्ठ सरकारी अधिकारी होते व आई प्रख्यात वैष्णव संत कवी अनंत कंदली (पंधरावे शतक) यांच्या वंशातील होती. त्यामुळे लक्ष्मीनाथांवर वैष्णव साहित्याचा खोल संस्कार झाला. दीनानाथांना बदली निमित्त आसामात विविध ठिकाणी जावे लागे. कुटुंबियांसमवेत ब्रह्मपुत्र नदीतून बोटीने नौगाँगवरून बरपेटा येथे जात असता आहतगुरी येथे बोटीवर लक्ष्मीनाथांचा जन्म झाला.

लक्ष्मीनाथ बेझबरुआ

त्यांचे शालेय शिक्षण गौहाती व सिबसागर येथे बंगालीतून झाले. त्यावेळी आसामात बंगाली ही राजभाषा म्हणून प्रचलित होती. १८८६ मध्ये ते प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मिळवून उत्तीर्ण झाले. नंतर ते उच्च शिक्षणासाठी कलकत्त्यास गेले. कलकत्ता येथून बी. ए. झाल्यावर त्यांनी एम्. ए. (इंग्रजी) व कायद्याच्या बी. एल्. पदवीसाठी कलकत्ता विद्यापीठात नाव नोंदविले व अभ्यासही केला तथापि ते शिक्षण ते पुरे करू शकले नाही. १८११ मध्ये त्यांचा रवींद्रनाथ टागोरांच्या कुटुंबातील प्रज्ञासुंदरी देवी (देवेंद्रनाथ टागोरांची नात) नावाच्या मुलीशी विवाह झाला. कलकत्त्यास विद्यार्थी दशेतच त्यांनी ब्राह्मो समाजाचे अनुयायित्व स्वीकारले. अत्यंत सुसंस्कृत व साहित्याची आवड असणाऱ्या वातावरणात ते वाढले. त्यांचा इमारती लाकडांचा व्यापार होता व त्यानिमित्ताने ते कलकत्ता व संबळपूर (ओरिसा) येथे राहत.

कलकत्ता येथे शिकत असतानाच त्यांनी त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने असमिया भाषासाहित्याच्या अभिवृद्धयर्थ एक मंडळ स्थापन केले तसेच असमिया साहित्याला वाहिलेले जोनाकि (१८८९) हे मासिकही सुरू केले. लक्ष्मीनाथांचे सुरुवातीचे लेखन जोनाकीतून प्रसिद्ध झाले. जोनाकीमुळे असमिया साहित्यात स्वच्छंदतावादी युगाची सुरुवात झाली. १९०९ मध्ये त्यांनी बांहि (बांसरी) हे स्वतंत्र स्वतःचे मासिक काढले. बांहि मासिक १९४० पर्यंत अखंडपणे प्रसिद्ध झाले. असमिया साहित्याचा सर्वांगीण कायापालट घडवून त्याला आधुनिक स्वरूप देण्यात ह्या दोन मासिकांचा वाटा फार मोठा आहे.

 लक्ष्मीनाथांची कविता प्रामुख्याने स्वच्छंदतावादी मनोवृत्तीची निदर्शक आहे. भावकविता, निसर्गकविता, देशभक्तीपर गीते, कथाकाव्ये व वीरगीते त्यांनी लिहिली. त्यांची पराक्रमभक्तीपर गीते फार लोकप्रिय आहेत. ‘ओ मोर अपोनर पराक्रम’ हे त्यांची गीत तर श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या महाराष्ट्र गीताप्रमाणेच आसामात सर्वतोमुखी आहे. ‘अमर जन्मभूमि’, ‘असम-संगीत’, ‘बीन-बरागी’ इ. त्यांची गीते ओजस्वी व सरस आहेत. भारताच्या तसेच आसामच्या इतिहास-संस्कृतीची व वैभवाची ओजस्वी गीते त्यांनी लिहिली. देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात त्यांच्या गीतांची दलित-पीडितांत अस्मिता, आत्मविश्वास, नवचैतन्य निर्माण केले. त्यांनी असमिया काव्यात स्वच्छंदतावादाची सुरुवात करून असमिया काव्यक्षेत्र विस्तृत तर केलेच पण त्यात नवे काव्यप्रकार व नवी शब्दकळाही आणली. त्यांनी आसाममधील लोकगीते संकलित करून त्या घाटाची स्वतंत्र जानपदगीतेही लिहिली. त्यांतील ‘बदन बरफूकन’ हे त्यांचे गीत उत्कृष्ट मानले जाते. बदन बरफूकन हा आसामचा मंत्री होता व त्याच्याच निमंत्रणावरून १८१६ मध्या ब्रह्मी लोकांनी आसामवर आक्रमण केले, ह्या पार्श्वभूमीवर ते रचले आहे. त्यातील निराशा, दुःख, असहायता, उदासीनता अत्यंत हृद्य व परिणामकारक आहे. कदम्कलि (१९१३) हा त्यांच्या कवितांचा एकमेव संग्रह. अत्यंत दुःखद अशा आशयासही एक प्रकारचा गोडवा असतो आणि रंग व ध्वनी यांचे सौंदर्य जगात ओतप्रोत भरून आहे, ही दोन सूत्रे त्यांच्या कवितेत सर्वत्र जाणवतात.


त्यांनी तीन ऐतिहासिक नाटके व चार विनोदी सुखान्त प्रहसने लिहिली. त्यांची नाटके व प्रहसने रंगमंचावरही अतिशय लोकप्रिय ठरली. त्यांच्या नाट्यलेखनावर-विशेषतः नाट्यतंत्रावर-शेक्सपिअरचा प्रभाव आहे. जयमंती कुंवरी (१९१३), चक्रध्वज सिंह (१९१३) व बेलिमार (१९१६) ही त्यांची ऐतिहासिक नाटके असून त्यांत असीम पराक्रम प्रेम, अतुल पराक्रम, कमालीचा त्याग इ. गुणांचा कलात्मक आविष्कार आहे. चक्रध्वज सिंह हे नाटक तर आसाम प्रदेशाचे पाच अंकी राष्ट्रगीतच म्हणावे लागेल. ऐतिहासिक सत्यास काडीमात्रही धक्का न लावता त्यांनी या टकातून आपल्या प्रतिभेचे विलोभनीय दर्शन घडविले.

 लिटिकाइ (१८९०), नोमल (१९१३), चिकरपति-निकरपति (१९१३) व पाचनि (१९२३) ही त्यांची विनोदी प्रहसने होत. या  प्रहसनांच्या प्रयोगांनाही अफाट लोकप्रियता लाभली.

 असमियातील पहिली ऐतिहासिक कादंबरी पदुम्‌ कुंवरी (१९०५) लक्ष्मीनाथांनीच लिहिली. ही त्यांची एकमेव कादंबरी. तीत आहोम राजवटीच्या पार्श्वभूमीवर पदुम् व सूर्य यांच्या विफल प्रेमाची कथा चित्रित केली आहे.

 आधुनिक असमिया लघुकथेचे जनकही लक्ष्मीनाथच मानले जातात. त्यांनी कथेच्या आशयात व तंत्रात नावीन्य आणले. त्यांच्या कथा आजही मोठ्या आवडीने वाचल्या जातात. त्यांचे वाङ्मयीन मूल्यही मोठे आहे. लक्ष्मीनाथांनी आसाममधील लोककथांचे संकलन-संपादन करून त्या प्रसिद्ध केल्या. सुरभि (१९०९), साधुकथार कुकि (१९१०), बुरि आइर साधू (१९१२), काक देवता आरु नतिलोर (१९१२) आणि जोनबिरि (१९१३) हे त्यांचे लघुकथा-लोककथा संग्रह होत. विविध व व्यापक विषयांवर त्यांनी कथा लिहिल्या. समाजातील व मानवी स्वभावातील विसंगती हेरून त्यांतील हास्यात्मकता त्यांनी उपरोधिक-विनोदी शैलीने प्रकट केली.

 त्यांनी पाश्चात्त्य साहित्याच्या प्रेरणेतून उत्कृष्ट लघुनिबंध लिहिले. उपरोधाचे शस्त्र त्यांनी सामाजिक सुधारणेसाठी त्यात कौशल्याने वापरलेले आहे. त्यांनी त्यात निर्माण केलेले ‘कृपाबर बरबरुआ’ हे काल्पनिक विनोदी पात्र तत्कालीन समाजातील दंभ, दुष्ट रूढी, दुर्गुण इत्यादींचे विदारक दर्शन घडविते. त्यांचे हे विनोदी निबंध बरबरुआर काकतर तोपोला (१९०४) व ओहतानि (१९०९) मध्ये संग्रहित आहेत.

 वैष्णव धर्म, तत्त्वज्ञान व साहित्य हे लक्ष्मीनाथांच्या सखोल व्यासंगाचे विषय होत. विशेषतः ⇨ शंकरदेव (सु. १४४९- सु. १५६९) व ⇨ माधवदेव (१८४९-१५९६) यांच्या साहित्याचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता. शंकरदेव (१९१२) व श्री शंकरदेव आरु माधवदेव (१९१४) हे दोन चरित्रपर पण चिकित्सक वृत्तीने लिहिलेले ग्रंथ तसेच तत्त्वकथा (१९६२) हा वैचारिक स्वरूपाचा त्यांचा ग्रंथ मौलिक आहे. लक्ष्मीनाथांच्या डोळस, प्रगल्भ व संवेदनशील धार्मिक वृत्तीचा प्रत्यय या ग्रंथांतून येतो. लक्ष्मीनाथांची मोर जीवन सोषर्ण हे आत्मचरित्र लिहिले असून त्याचे वाङ्मयीन मूल्य मोठे मानले जाते.

 लक्ष्मीनाथांनी असमिया साहित्यात घातलेली सर्वात मोलाची भर विनोद व उपरोधाच्या क्षेत्रांतील होय. भावी पिढ्या एक श्रेष्ठ कवी व नाटककार म्हणून त्यांचे स्मरण तर करतीलच पण त्याहीपेक्षा एक श्रेष्ठ विनोदी लेखक म्हणून त्यांचे चिरंतन स्मरण केले जाईल. त्यांचे ललित निबंध व विनोदी व्यक्तिरेखा हा असमिया साहित्याचा अमोल ठेवा आहे.दिब्रुगड येथे त्यांचे निधन झाले.

 लक्ष्मीनाथांच्या जीवनावर व साहित्यावर १९३९ मध्ये कमलेश्वर बरुआंनी विश्वरसिक बेझबरुआ आणि गौहाती साहित्य सभेने १९६१ मध्ये बेझबरुआर साहित्य प्रतिमा (संपादित) हे असमिया ग्रंथ लिहून त्यांच्या साहित्यसेवेचा यथोचित गौरव केला. साहित्य अकादेमीच्या वतीने हेम बरुआंनी त्यांच्यावर १९६७ मध्ये एक इंग्रजी ग्रंथ लिहिला आहे.

संदर्भ : Barua, Hem, Laxminath Bezbaroa, New Delhi, 1967.

 सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)