बृहदांत्रशोथ : आंत्रमार्गाच्या [⟶ आंत्र] मोठ्या व रूंद भागाला मोठे आतडे अथवा बृहदांत्र म्हणतात व या शरीर भागाच्या दाहयुक्त सूजेला बृहदांत्रशोथ म्हणतात. ⇨ पचन तंत्राच्या विकृतीपैकी ही एक विकृती असून तिचे दोन प्रकार आढळतात : (१) तीव्र (५ टक्के) आणि (५) चिरकारी (दीर्घकालिक, ९५टक्के).

तीव्र बृहदांत्रशोथ : ही विकृती अनेक संसर्गोत्पादक रोगकारकांमुळे उद्भवू शकते. यांमध्ये व्हायरस ,सूक्ष्म जंतू व पर जीवींचा (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणाऱ्या सजीवांचा) समावेश असतो. खालच्या पोटात दुखणे, ज्वर व⇨अतिसार ही लक्षणे उद्भवतात. शिगेला वंशातील अचल सूक्ष्म जंतू बहुधा या विकृतीस कारणीभूत असतात. गंभीर विकृतीत मलामध्ये रक्त जाते व ते डोळ्यांना सहज दिसते. रोगाचे कारण शोधण्याकरिता मलाची सूक्ष्मदर्शकीय तपासणी रोगकाराचे प्रयोगशालीय संवर्धन व बुहदात्रांच्या अवग्रहाकारी (इंग्रजी S अक्षराच्या आकाराच्या) भागाची विशिष्ठ दर्शक उपकरणातून तपासणी आवश्यक असते. रोगकारक निश्चित ठरल्यावर योग्य इलाज करणे सोपे असते.

रोगकारकाचा शोध करण्यापूर्वी रोग्यास कोणते उपचार चालू होते याविषयी माहिती मिळविणे आवश्यक असते, कारण इतर रोगांकरिता चालू असलेली काही औषधे (उदा. ॲम्पिसिलीन, टेट्रासायक्लीन वगैरे) तीव्र बृहदांत्रशोथास कारणीभूत असतात. या प्रकाराला औषधिजन्य बृहदांत्रशोथ म्हणतात. याप्रकाराचे निश्चित कारण अजून अज्ञात असून चालू असलेले औषध ताबडतोब बंद करणे, अतिसाररोधी औषधे देणे, निर्जलीभवनावर (शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्यावर) इलाज करणे इ. उपचार करतात.

 इतर कारणामुळे उद्भव णाऱ्या तीन बृहदांत्रशोथवर रोगकारकनुरूप इलाज योजितात. त्याशिवाय अतिसाररोधी औषधी व निर्जलीभवनावरील इलाजही महत्वाचे असतात.

चिरकारी बृहदांत्रशोथ : या विकृतीचे दोन प्रमुख उपप्रकार आहेत. (अ) चिरकारी अविशिष्ठ बृहदांत्राशोथ व (आ) बी. बी. क्रॉन या अमेरिकन शरीरक्रिया वैज्ञानिकांच्या नावावरून ओळखण्यात येणारा क्रॉन रोग.

 चिरकारी अविशिष्ठ बृहदांत्रशोथ : संप्राप्ती : या विकृतीला ‘व्रणोत्पादक बृहदांत्रशोथ’ या नावानेही ओळखतात. तिचे कारण अजून अज्ञात आहे. पुष्कळ सुक्ष्मजंतुशास्त्रीय परीक्षा करूनही कोणत्याही सूक्ष्मजंतूचा किंवा व्हायरसाचा रोगकारक म्हणून संबंध प्रस्थापित करण्यात यश आलेले नाही आणि म्हणूनच त्यास ‘अविशिष्ठ’ ही उपाधी लावतात. हा रोग बहुधा भावनिक तणावाशी संबंधित असावा, कदाचित तो आत्मप्रतिरक्षाविषयक रोगाचा प्रकार असावा शरीरात स्वनिर्मित ⇨ प्रतिपिंडे ज्या विकृतीत शरीरातील ऊतकहानीस (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या – पेशींच्या – समूहास हानीस) कारणीभूत होतात त्या विकृतीला आत्मप्रतिरक्षाविषयक विकृती म्हणतात. काही रोग्यांमध्ये दूध व दुधाच्या पदार्थांची (विशेषेकरून त्यातील प्रथिनांची) अधिहर्षताही (ॲलर्जीही) आढळली आहे. ज्या रोग्यामध्ये व्रणोत्पादन अधिक प्रमाणाम असते. त्यांमध्ये दुय्यम सुक्ष्मजंतूसंसर्ग महत्वाचे परिणाम करतो. काही कुटुंबातून ही विकृती पिढीजात स्वरूपात आढळते. यामागे आनुवंशिकीय प्रवृत्तिकारकता आहे की अज्ञात परिसरीय कारणे आहेत, हे स्पष्ट झालेले नाही.

आ. १. बृहदांत्रशोथातील रोग्याची अवस्था.


रोगप्रादुर्भाव : सर्वसाधारणपणे पुरूषापेक्षा स्त्रियांमध्ये ५ :७ या प्रमाणात ही विकृती अधिक आढळते. ज्यू जमातीतही तिचे प्रमाण अधिक आहे. आफ्रिकन व अमेरिकन निग्रो जमातीत ती आढळत नाही पाश्चात्य देशातून ती पौर्वात्य देशांपेक्षा अधिक आढळते. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विभागातील एका अलीकडील पाहणीत एक लक्ष व्यक्तींमध्ये फक्त ८० व्यक्तीतच ही विकृती आढळली होती. अमेरिकेत अंदाजे २ ते ४लक्ष व्यक्ती या रोगाने पछाडलेल्या असाव्यात. आर्थिक व सामाजिक दृष्ट्या वरच्या वर्गातील लोकांत रोगप्रमाण अधिक आढळते.

भारतात आर्थिकदृष्ट्या कमकुवत समाजात हा रोग सहसा आढळत नाही. मुंबईतील एका धर्मदाय रुग्णालयात हजारात एक असे प्रमाण आढळले होते, तर तेथील खाजगी वैद्यकीय व्यवसायात ते हजारात पंधरा ते वीस एवढे आढळले होते.

रोग लक्षणे : सर्वसाधारणपणे २० आणि४० वर्षे वयाच्या दरम्यान हा रोग होतो व कदाचितच तो बालवयात आढळतो. साठीनंतर हा सहसा आढळत नाही. पाण्यासारखे पातळ जुलाब रात्रंदिवस होणे हे सुरुवातीचे लक्षण असते. आठवडा, महिना आणि सौम्य विकृतीत वर्षाच्या अंतराने लक्षणांचा जोर होतो. कालांतराने रोगी निर्जलीभवन व रक्तनाश होऊन अतिकृश व रक्तक्षयी बनतो.

आ. २. विरामी शूल : (अ) प्राकृतिक (सर्वसाधारण परिस्थितीतील) वृहदांत्र (आ) विरामी शूल उत्पन्न होऊन अल्पकालीन उद्भावणारे आकुञ्चन.

पुनःपुन्हा होणारे जुलाब आणि दुर्बलतेचे प्रमाण एकमेकांवर अवलंबून असतात. ज्वराचे प्रमाण, जुलाबांची संख्या व नमुन्यादाखल घेतलेल्या रक्तातील तांबड्या कोशिका तळाशी बसण्याचा दर (ई. एस. आर.) या गोष्टी ढोबळपणाने रोगाचे गांभीर्य दर्शवितात. तोंड येणे, जिव्हाशोथ, त्वचाबदल इ. लक्षणे जीनवसत्वाची न्युनता दर्शविणारी असतात. कधी कधी विकृती बृहदांत्राच्या छोट्या भागात मर्यादित असते, तर कधीकधी उजव्या अर्ध्या भागात मर्यादित असते. संपूर्ण वृहदांत्राची विकृती रोग्यास अंथरुणात खिळवून ठेवते.प्रत्येक जुलाबाच्या अगोदर पोटात विरामी शूल (राहून राहून वेदना होणे)उत्पन्न होतो. पुष्कळ वेळा मल अर्धवट बांधलेला, रक्त व श्लेष्मा (बुळबुळीत पदार्थ) मिश्रित असतो. पोट चाचपडून पाहिले असता डाव्या श्रोणिखाचेत (धडाच्या तळाशी असणाऱ्या द्रोणीसारख्या भागातील खाचेत) हाताला किंचित वाढलेले व दाबले असता दुखणारे ब्रुहदांत्र लागते. रोगाचे सौम्य व अति गंभीर प्रकारही आढळतात. सौम्य प्रकारात काहीसे पातळ मलविसर्जन होऊन त्यात नुसत्या डोळ्याने न दिसणारे रक्त किंवा श्लेष्मा असतो. अशा वेळी मलाची सूक्ष्जदर्शकीय तपासणी व गुददर्शनी या विशेष प्रकारच्या उपकरणातून गुदाशयाची तपासणी उपयुक्त असतात. अति गंभीर प्रकारात दिवसातून अनेक जुलाब, गंभीर रक्तक्षय व विषाक्तता (हृदयाच्या गतीत प्रमाणाबाहेर वाढ होणे), सतत ज्वर व थकवा ही लक्षणे आढळतात.

विकृतिविज्ञान : (विकृतीच्या स्वरूपाचा विशेषतः विकृतीमुळे ग्रस्त ऊतकांच्या वा इंद्रियांच्या संरचनेवर व कार्यावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास). रोगाची सुरुवात बहुधा गुदाशयात होते व तो बृहदांत्राच्या उंडुक भागाकडे (सुरुवातीच्या पिशवीसारख्या भागाकडे) म्हणजे खालून वर पसरत जातो. गुदाशयात मर्यादित राहणाऱ्या विकृतीला ‘व्रणोत्पादक गुदाशयशोथ’ म्हणतात व सबंध बृहदांत्रात पसरलेल्या विकृतीला ‘व्रणोत्पादक बृहदांत्रशोथ’ म्हणतात. 


बृहदांत्राच्या श्लेष्मकलेमध्ये (पातळ बुळबुळीत अस्तरामध्ये) पसरलेले पृष्ठस्थ अपक्षरण व रक्तस्त्राव, जाडी वाढणे, छोटे छोटे व्रण उत्पन्न होणे व छोट्या व्रणाच्या संमीलनातून मोठा व्रण तयार होणे हे फरक आढळतात. व्रण अधःश्लेष्म भागात शिरताच प्रतिक्षेपीजन्य संकोच उत्पन्न होऊन शूल होतो. चिरकारी प्रकारात रोगट भाग कायमचा अरूंद बनतो.

निदान :बस्तीतून बेरियम देऊन केलेल्या क्ष – किरण तपासणीत रोगाची व्याप्ती समजते. गुददर्शनीतून किंवा अवग्रहाकारी बृहदांत्रदर्शकामधून श्लेष्मकला प्रत्यक्ष डोळ्यांनी तपासता येते. या दोन्ही परीक्षा (म्हणजे बेरियम बस्ती आणि विशिष्ठ दर्शकीय तपासणी) रोगाच्या तीव्रावस्थेत केव्हाही करू नयेत. मलाची सुक्ष्मदर्शकीय तपासणी, प्रयोगशालीय सूक्ष्मजंतु – संवर्धन व रक्त तपासणी निदानास मदत करतात. गुदाशयसातील श्लेष्मल ऊतकाची जीवोतक परीक्षा उपयुक्त असते.

विमेदी निदानात क्रॉन रोग व चिरकारी अविशिष्ठ बृहदांत्रशोथ यांमधील फरक ओळखणे महत्वाचे असते. कोष्टकात या दोहोंतील प्रमुख फरक दिला आहे.

चिरकारी अविशिष्ठ बृहदांत्रशोथ बृहदांत्रशोथ व क्रॉन रोग यांतील प्रमुख फरक

लक्षण 

चिरकारी अविशिष्ठबृहदांत्रशोथ 

क्रॉन रोग 

गुदाशय रक्तस्त्राव 

गुदाशय व गुददावारा भोवती गळू तयार होणे 

अवग्रहाकारी बृहदांत्र- दर्शकातून तपासणी : 

(अ) गुदाशयात रोग फेलाव

(आ) ऊतक सुचूर्णता 

(सहज तुकडे होणे ) 

क्ष-किरण तपासणी : 

(बेरियम बस्ती) 

बृहदांत्र फैलाव 

विकृतिविज्ञान: 

श्लेष्मकलेतील खोली 

कर्करोगोत्पादन 

नेहमी व एकसारखा 

क्वचित 

९५% 

९५% 

एकसंध,उजव्या बाजूस,कधीकधी 

फक्त श्लेष्मकला व अधःश्लेष्म 

कधी कधी 

अधूनमधून 

नेहमी 

५०% 

५०% 

खंडित,उजव्या बाजूस,पुष्कळ वेळा 

स्नायुभित्तीत फैलाव 

क्वचित 

उपद्रव : स्थानीय उपद्रवात पुढील गोष्टींचा समावेश होतो.

(१) छद्मबृहदांत्र मोड (श्लेष्मकलेवर लहान लहान गाठीसारखे उंचवटे तयार होणे),

(२) कर्करोग ३.५%

(३) तत्वीय आकुंचन ६% (तंत्वीय ऊतक उत्पादनाने एकाजागी अरुंदता येणे),


(४) छिद्रण (भोक पडणे) ३%

(५) अतिरक्तस्त्राव ३% . इतर उपद्रवात त्वचा विकृतीचे काही प्रकार १८.५% यकृत विकृती,संधिशोथ व मूळव्याध २०% यांचा समावेध होतो.

उपचार : या रोगावर कोणताही विशिष्ट उपचार उपलब्ध नाही. तसेच अनेक उपचारापैकी कोणता कोणास उपयुक्त ठरेल हेही सांगता यंत नाही. उपचारात सर्वसाधारणपणे पुढील गोष्टींकडे लक्ष देतात :

(अ) निर्जलीभवन होऊ न देणे.

(आ) रक्ताक्षयावर इलाज करणे.

(इ) योग्य आहार व पोषण: कमीत कमी ३,००० कॅलरी दररोज मिळावयास हव्यात. आहारात प्रथिने व काब्रोहायड्रेटे अधिक असावीत आणि वसा (स्निग्ध पदार्थ) अत्यल्प असावीत.

(ई) पोटशूलाकरीता फिनोबार्बिटोन बेलाडोना व कोडीन फॉस्फेट ही औषधे वापरतात.

(ए) सल्फासॅलाझाईन (सॅलॅझोपायरीन) या औषधाच्या ५००मिग्रॅ. मात्रेच्या गोळ्या दर ४ ते ६ तासांनी सात दिवस देतात. ही औषधे ज्वर असलेल्या व विषाक्तता झालेल्या रोग्यास विशेषेकरून उपयुक्त असतात.

(ऐ) कॉर्टिसोन औषधे: [⟶ कॉर्टिसोन]. यांच्या उपयुक्ततेबद्दल तज्ञांमध्ये एकमत नाही कारण त्यात धोके असतात.

(ओ) शस्त्रक्रिया: शस्त्रक्रियेचा अवलंब पुढील वेळी करतात :  

(१) अतिरक्तस्त्राव व छिद्रण (२) स्थानीय उपद्रव, उदा., तंत्वीय आकुंचन : (३) कर्करोगाची शक्यता भासल्यास (४) लहान मुलातील किंवा कुमारावस्थेतील रोगाची सुरुवात (५) चिरकारी व अपंगत्व आणणारी विकृती. १५ ते २०% रोग्यांना त्यांचे कौटुंबिक वैद्य शस्त्रक्रियेचा उपचार करून घेण्याचा सल्ला देतात. शस्त्रक्रियांचे निरनिराळे प्रकार उपलब्ध आहेत.

(औ) मानसोपचार : वैद्य व रोगी यांनी आपसात जवळीक उत्पन्न केल्यास रोग्यामध्ये विश्वास उत्पन्न करणे व त्याला  दिलासा देणे या गोष्टी साधता येतात.

क्रॉन रोग : हा रोग भारतात क्वचित आढळतो. एका भारतीय विशेषज्ञास आपल्या पंचवीस वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीत ह रोग झालेले फक्त बाराच रोगी आढळले होते. काही रोगलक्षणे वर दिलीच आहेत. संपूर्ण लहान व मोठे आतडे यांमध्ये विकृती असू शकते परंतु पुष्कळ वेळा लहान आतड्याच्या शेवटच्या ३/५ भागात म्हणजे शेषांत्रात ती मर्यादित असते व ती खंडित स्वरूपात असते. आतड्याच्या संपूर्ण भित्तीत म्हणजे श्लेष्मकला, अधःश्लेष्म व स्नायू यांमध्ये रोग जलद पसरतो. भारतात शेषांत्राच्या खालच्या भागात बहुतकरून क्षयरोगज्य विकृती अधिक आढळते म्हणून निदान कठिण असते. विशिष्ट भागात आढळत असल्यामुळे या विकृतीला ‘शेषांत्रशोथ’, ‘विभागीय आंत्रशोथ’ किंवा ‘विभागीय आत्र-बृहदांत्रशोथ’ अशी दुसरी नावेही आहेत.

 या विकृतीत वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया या दोन्हींचा उपयोग होतो. वैद्यकीय उपचाराची तत्वे जवळजवळ चिरकारी अविशिष्ट बृहदांत्रशोथाप्रमाणेच आहेत. शस्त्रक्रिया बहुधा आंत्ररोध उत्पन्न झाल्यानंतरच करतात. शस्त्रक्रियेनंतर रोगी वर्षापेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकतो.

पहा: आंत्र पचन तंत्र.

संदर्भ:1.Datey K.K. Shah, S.J.Ed., A.P.I. Textbook of Medicine, Bombay, 1979.

           2. Rains, A.J.H.: Ritchie, H.D. Balley and Love’s Short Practice of Surgery, London, 1977.            

           3. Thorn, G.W. and others Ed., Harrison’s Principles of Internal Medicine, Tokyo,1977.

 

कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य. त्र्यं.