नदी अपहरण : नद्या आपल्या खोऱ्यांचा विकास करताना आपल्या उगमाकडील भागाचे शिरःक्षरण करतात. एखाद्या प्रदेशातील मुख्य नदीच्या उपनद्या त्याच प्रदेशातून वाहणाऱ्या दुसऱ्या मुख्य नदीच्या उपनद्यांच्या उगमस्थानाकडे अधिक झीज करून शेवटी दुसऱ्या मुख्य नदीच्या उपनद्यांच्या उगमापर्यंत खोदत जाऊन त्यांचे पाणी आपल्या खोऱ्यात घेऊन येतात. या क्रियेला नदी अपहरण किंवा जलापहरण किंवा नदी-चौर्य म्हणतात. ज्या नदीचे जलापहरण होते, त्या नदीतील पाणी जलापहरण करणाऱ्या नदीत वाहून आल्यामुळे जलापहरण झालेल्या नदीचे पात्र कोरडे पडते. तेथे त्याला वातखिंड म्हणतात. तिचा उपयोग दळणवळणासाठी करता येतो. या क्रियेत ज्या नद्यांच्या प्रवाहांचे अपहरण होते, त्या नद्यांना शिरच्छेद झालेले प्रवाह किंवा अपस्थानी प्रवाह म्हणतात.

नदी अपहरण अवस्था : अ, ब- मुख्य प्रवाह उ१ उ२ – उपप्रवाह उ१ हा उपप्रवाह उ२ व ब यांचे अपहरण करतो.

डोंगराळ भागात डोंगराच्या विरुद्ध उतारांवरून वाहणाऱ्या नद्यांबाबत कधीकधी जलापहरण घडते. या क्रियेत त्या नद्यांदरम्यानच्या जलविभाजकाची झीज होऊन त्याचे स्थलांतर होते. अशा जलविभाजकाला स्थलांतरित जलविभाजक म्हणतात. डोंगराच्या एका बाजूला पावसाचे प्रमाण जास्त असल्यास किंवा त्या बाजूचा उतार जास्त असल्यास किंवा त्या उताराच्या भागातील खडक दुसऱ्या बाजूकडील उतारावरील खडकाच्या मानाने जास्त मृदू असल्यास, अशा उतारावरून वाहणाऱ्या नद्या विरुद्ध बाजूच्या उतारावरून वाहणाऱ्या नद्यांपेक्षा जास्त क्रियाशील असतात. परिणामतः जास्त क्रियाशील नद्यांच्या शिरःक्षरणामुळे जलविभाजक पुढे पुढे सरकतो. कालांतराने क्रियाशील नदीचे उगमस्थान दुसऱ्या बाजूवरून वाहणाऱ्या नदीच्या उगमस्थानाला येऊन मिळते व तेथील जलविभाजकाचा भाग नाहीसा होतो आणि दुसऱ्या बाजूवरील नदीच्या पाण्याचे अपहरण होते. जेथे अपहरण होते, तेथे प्रवाहाला बहुधा काटकोनी वळण मिळालेले दिसते. भारतात गंगा व तिच्या उपनद्यांबाबत जलापहरण झालेले आढळते. गंगा नदीच्या अनेक उपनद्यांनी तिबेटमधून वाहणाऱ्या नद्यांचे अपहरण केले आहे. काही भूगोलशास्त्राज्ञांच्या मताप्रमाणे पूर्वी बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या एका नदीने तिबेटच्या पठारावरून वाहणाऱ्या साँपू नदीचे अपहरण केल्याने सध्याच्या ब्रह्मपुत्रा नदीची निर्मिती झाली आहे. भारत आणि ब्रह्मदेश यांच्या उत्तर सीमावर्ती प्रदेशात चिंद्‌विनच्या काही उपनद्यांचे जलापहरण ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहाने केलेले आहे. महाराष्ट्रात कोयना खोऱ्यात जलापहरणाचे पुरावे आढळतात. तसेच दीर्घ कालावधीनंतर पश्चिमेकडे वाहणारा एखादा जोरदार प्रवाह कोयनेचेही अपहरण करण्याचा संभव आहे. वैतरणेने दारणेच्या काही शीर्षप्रवाहांचे अपहरण केल्याचे दिसून आले आहे.

दाते, संजीवनी